कोलकात्याच्या उत्तरेकडच्या अगदी अरुंद बोळांमध्ये हातगाडीसुद्धा किंवा हाताने ओढायची रिक्षा कशीबशी जाते. ही आहे कुमारांची म्हणजे कुंभारांची गल्ली. या शहरातले मूर्तीकार इथे राहतात. कोलकात्यात दर वर्षी दुर्गापूजेसाठी तयार होणाऱ्या दुर्गेच्या मोठाल्या मूर्ती इथनंच अख्ख्या शहरभर पोचतात.

कार्तिक पॉल यांची कार्यशाळा इथेच आहे. कार्यशाळा म्हणजे खरं तर बांबू आणि प्लास्टिकची शेडच म्हणा ना. तिचं नाव आहे ‘ब्रजेश्वर अँड सन्स’ (त्यांच्या वडलांच्या नावे). एक मूर्ती बनवण्याच्या वेगवेगळ्या पायऱ्या आणि त्यातले अनेक पदर ते आम्हाला उलगडून दाखवतात. त्यासाठी लागणारी वेगवेगळ्या प्रकारची माती, उदा. गंगा माटी (नदीकाठची ओली माती), पाट माती (ताग आणि गंगा मातीचं मिश्रण) मूर्ती तयार करत असताना वेगवेगळ्या टप्प्यांवर वापरल्या जातात.

Karthik Paul at his workshop in Kumartuli

कार्तिक पॉल आपल्या मूर्तीशाळेत

आम्ही बोलत असतानाच कार्तिक दा कार्तिकदेवाचा मुखवटा तयार करतायत, ओल्या मातीचा. आणि त्यांचे निष्णात हात चियाडी म्हणजे बांबूपासून हाताने तयार केलेल्या एका अवजाराच्या मदतीने अगदी सफाईने त्याला आकार देतायत.

दुसऱ्या एका मूर्तीशाळेत गोपाल पॉल यांनी एक खळ तयार केलीये. मूर्तीला त्वचेचा पोत यावा म्हणून पंचासारखं एक कापड चिकटवलं जातं त्यासाठी ही खळ लागते. गोपाल कोलकात्यापासून १२० किमी दूर नडिया जिल्ह्यातल्या कृष्णानगरचे आहेत. इथे काम करणारे सगळे पुरुष कारागीर नडियाचेच आहेत. मूर्तीशाळेच्या जवळ मालकांनी दिलेल्या खोल्यांमध्ये ते एकत्र राहतात. उत्सव सुरू होण्याच्या काही महिने आधी त्यांना कामावर बोलावलं जातं. आठ तासांच्या पाळीत ते काम करतात. मात्र दुर्गापूजा सुरू होण्याआधी मात्र त्यांना अगदी दिवस रात्र काम करावं लागतं. त्यासाठी त्यांना ओव्हरटाइमचे पैसेही दिले जातात.

असं सांगतात की कृष्णानगरहून सुमारे ३०० वर्षांपूर्वी अगदी पहिल्यांदा कुंभार इथे कुमारटुलीमध्ये काम करण्यासाठी आले. बागबझार घाटजवळ तेव्हा कुमारटुली नुकतीच वसवली जात होती, काही महिने त्यांनी तिथे काम केलं. इथून नदीकाठची माती आणणं सोपं होतं. ते जमीनदारांच्या घरच्या ठाकूरदालोन म्हणजेच जमीनदारांच्या वाड्यातल्या देवघरांमध्ये मूर्ती तयार करण्याचं कामही करत असत. दुर्गापूजेच्या काही आठवडे आधी हे काम चालायचं.

व्हिडिओ पहाः कुमारटुलीची सैर

१९०५ साली बंगालची फाळणी झाली आणि बांग्लादेशातल्या ढाका, बिक्रमपूर आणि फरीदपूरसारख्या भागातले अगदी निष्णात कारागीर कुमारटुलीत येऊन वसले. भारत स्वतंत्र झाला आणि जमीनदारी व्यवस्था हळूहळू लोप पावली. शोर्बोजनिन म्हणजेच सार्वजनिक पूजो लोकप्रिय व्हायला लागल्या. याच स्थित्यंतराचा एक भाग म्हणजे मा दुर्गा छोट्याशा ठाकूरदालोनमधून मोकळ्या प्रशस्त मांडवांमध्ये आली. आणि मग दुर्गा आणि इतर देवतांसाठी मोठाले सुबक देखावे तयार होऊ लागले.

दुर्गा पूजा हा पश्चिम बंगालमधला फार मोठा सण आहे. सप्टेंबर सरता सरता आणि ऑक्टोबरच्या सुरुवातीला महालयापासून सण सुरू होतो. त्या दिवशी हजारोंच्या संख्येने लोक गंगेच्या म्हणजेच इथे हुगळी नदीच्या काठी आपल्या पितरांचं स्मरण करत तर्पण विधी करतात. चतुर्थी, पंचमी आणि षष्टीला मूर्तीची स्थापना होते. मुख्य पूजा – महा-शोप्तोमी, महा-ओष्टोमी आणि महा-नोबोमी या तीन दिवशी होते. पूजाविधी मोठा काळ चालतात आणि फार सविस्तर पार पाडले जातात. तीन दिवसांनंतर दशमीला म्हणजेच शेवटच्या दिवशी कोलकात्यात हुगळीच्या किनाऱ्यावर बाबुघाट आणि इतर घाटांवर दुर्गेच्या मूर्तीचं विसर्जन केलं जातं आणि हजारोंच्या संख्येने लोक आपल्या देवीला भावपूर्ण निरोप देतात.

कुमारटुलीतल्या या मूर्तीशाळेत कार्तिक दा मूर्तीवरून शेवटचा हात फिरवतायत. ते सांगतात की मूर्तीसाठी लागणारे रंग ते आणि त्यांचे कारागीर स्वतःच तयार करतात. खोरी माटी (समुद्रफेसापासून तयार केलेली खास माती), चिंचोक्याचं पीठ आणि रंगाच्या रसायनांचं मिश्रण करून खळ तयार केली जाते. चिंचोक्याच्या पिठामुळे मूर्तीवर रंग जास्त काळ टिकतो.

काही वेळात मूर्ती तयार होतात आणि शहरातल्या मांडवांमध्ये जायला अगदी सज्ज आहेत असं भासतं. कुमारटुलीच्या अंधाऱ्या गल्ल्या लवकरच त्यांचा निरोप घेतील आणि या मूर्ती कोलकात्यातल्या लखलखत्या मांडवांमध्ये विराजमान होतील.

The artisans prepare a clay called ‘path mati’ by mixing jute particles with ‘atel mati’ from the Ganga

मूर्तीकार हुगळीच्या इटेल माटीमध्ये ताग मिसळून त्याची पाट माटी तयार करतात

Once the bamboo structure is ready, straw is methodically bound together to give shape to an idol; the raw materials for this come from the nearby Bagbazar market

डावीकडेः मूर्ती तयार करण्याची सुरुवात बांबूचा सांगाडा म्हणजे काठमो तयार करण्यापासून होते. उजवीकडे या बांबूच्या सांगाड्यावर हव्या त्या आकारात पेंढा भरला जातो. हा सगळा कच्चा माल बागबझार मार्केटमधून येतो

An artisan applies sticky black clay on the straw structure to give the idol its final shape; the clay structure is then put out in the sun to dry for 3 to 4 days

पेंढा भरलेल्या मूर्तीच्या सांगाड्यावर काळ्या चिकण मातीचा थर दिला की मूर्तीला तिचा आकार मिळतो. त्यानंतर मातीची मूर्ती सुकण्यासाठी ३-४ दिवस उन्हात ठेवली जाते

चेहऱ्यावरचं कोरीव काम करण्यासाठी रंगाचा कुंचला आणि बांबूच्या एका अवजाराचा वापर केला जातो

At another workshop nearby, Gopal Paul uses a fine towel-like material to give idols a skin-textured look

शेजारच्याच एका मूर्तीशाळेच गोपाल पॉल मूर्तीवर त्वचेचा पोत यावा यासाठी पंचासारखं कापड वापरतो

Half painted Idol of Durga

महालयाच्या शुभदिनी दुर्गेचे डोळे रेखाटले जातात आणि त्यानंतर मूर्तीत प्राण फुंकला जातो

‘कुमारटुलीची सैर’ फोटो अल्बम पहा

हा व्हिडिओ आणि वृत्तांत सिंचिता माजी हिने आपल्या २०१५-१६ पारी फेलोशिपदरम्यान केला आहे.

Sinchita Parbat

ସିଞ୍ଚିତା ପର୍ବତ ପିପୁଲ୍ସ ଆର୍କାଇଭ୍‌ ଅଫ୍‌ ରୁରାଲ ଇଣ୍ଡିଆର ଜଣେ ବରିଷ୍ଠ ଭିଡିଓ ସମ୍ପାଦିକା ଏବଂ ଜଣେ ମୁକ୍ତବୃତ୍ତିର ଫଟୋଗ୍ରାଫର ଓ ପ୍ରାମାଣିକ ଚଳଚ୍ଚିତ୍ର ନିର୍ମାତା। ପୂର୍ବରୁ ସିଞ୍ଚିତା ମାଜୀ ନାମରେ ତାଙ୍କର କାହାଣୀଗୁଡ଼ିକ ପ୍ରକାଶ ପାଇଛି।

ଏହାଙ୍କ ଲିଖିତ ଅନ୍ୟ ବିଷୟଗୁଡିକ Sinchita Parbat
Text Editor : Sharmila Joshi

ଶର୍ମିଳା ଯୋଶୀ ପିପୁଲ୍ସ ଆର୍କାଇଭ୍‌ ଅଫ୍‌ ରୁରାଲ ଇଣ୍ଡିଆର ପୂର୍ବତନ କାର୍ଯ୍ୟନିର୍ବାହୀ ସମ୍ପାଦିକା ଏବଂ ଜଣେ ଲେଖିକା ଓ ସାମୟିକ ଶିକ୍ଷୟିତ୍ରୀ

ଏହାଙ୍କ ଲିଖିତ ଅନ୍ୟ ବିଷୟଗୁଡିକ ଶର୍ମିଲା ଯୋଶୀ
Translator : Medha Kale

ମେଧା କାଲେ ପୁନେରେ ରହନ୍ତି ଏବଂ ମହିଳା ଓ ସ୍ଵାସ୍ଥ୍ୟ କ୍ଷେତ୍ରରେ କାମ କରିଛନ୍ତି । ସେ ମଧ୍ୟ PARIର ଜଣେ ଅନୁବାଦକ ।

ଏହାଙ୍କ ଲିଖିତ ଅନ୍ୟ ବିଷୟଗୁଡିକ ମେଧା କାଲେ