नबो कुमार मैतींच्या कारखान्यात सगळीकडे बदकाची पिसंच पिसं विखुरली आहेत. स्वच्छ, मळकी, छाटलेली, विविध आकाराची आणि पांढऱ्या रंगाच्या वेगवेगळ्या छटांची पिसं. उघड्या खिडक्यांमधून वाऱ्याची झुळुक येते आणि पिसं हलकेच हवेत उडतात आणि तरंगत तरंगत पुन्हा एकदा जमिनीवर पडतात.
उलुबेडियामध्ये नबो कुमारांचं तीन मजली घर आहे. आम्ही तळमजल्यावर होतो. खोलीत कात्र्यांचा आणि लोखंडी पात्यांचा आवाज भरून राहिला होता. याच कारखान्यात भारतातली बॅडमिंटनची फुलं म्हणजेच शटलकॉक तयार होतात. “बदकाची पांढरी शुभ्र पिसं, लाकडी किंवा कृत्रिम कॉर्क, नायलॉन आणि सुताचा मिश्र धागा आणि डिंक. असं सगळं साहित्य असलं की झालं शटल तयार,” ते सांगतात. हातात सहा शटल भरलेला, विक्रीसाठी तयार असलेला बॉक्स असतो.
सकाळचे आठ वाजले होते. २०२३ चा ऑगस्ट महिना सरत आला होता. सोमवारची सकाळ आणि हवा बरीच दमट होती. तेव्हा आम्हाला कल्पना नव्हती, पण त्यानंतर पाचच आठवड्यात भारताच्या बॅडमिंटनपटूंनी आशियाई स्पर्धांमध्ये दक्षिण कोरियाच्या खेळाडूंना २१-१८, २१-१६ असं हरवून देशासाठी पहिलं वहिलं सुवर्ण पदक मिळवलं.
इथे उलुबेडियामध्ये या कारखान्याच्या दारात कारागिरांच्या सायकली आणि स्लिपर एका रांगेत लागलेल्या आहेत. इस्त्री केलेला गडद मरून रंगाचा सदरा आणि विजार परिधान केलेले नबो कुमार कामाला सज्ज आहेत.
“मी १२ वर्षांचा होतो तेव्हापासून आमच्या बानिबान गावामध्ये मी ‘हांशेर पालोक’ [बदकाच्या पिसां] पासून बॅडमिंटनचे ‘बॉल’ तयार करतोय,” ६१ वर्षीय नबो दा सांगतात. त्यांच्या कामाची सुरुवात पिसांना आकार देण्याचं काम करत करत झाली. लोखंडी कात्रीने तीन इंची पिसाला आकार दिला जातो. हे कारागीर शटलकॉकला बॉल म्हणतात.
“[बंगालमधली] पहिली फॅक्टरी जे. बोस अँड कंपनी होती. पिपुर गावात १९२० मध्ये सुरू झाली होती. हळूहळू जे. बोसच्या कामगारांनी जवळच्या गावांमध्ये त्यांचे स्वतःचे छोटे छोटे कारखाने काढले. तशाच एका कारखान्यात मी ही कला शिकलो,” ते सांगतात.
























