“बिजू असतो ना तेव्हा आम्ही सगळे पहाटे उठतो आणि फुलं वेचायला जातो. त्यानंतर नदीत फुलं सोडायची आणि एक डुबकी घ्यायची. त्यानंतर गावातल्या प्रत्येक घरी जायचं आणि एकमेकांच्या गाठीभेटी घ्यायच्या,” जया सांगतात. पन्नास वर्षं होऊन गेली. पण या आठवणी आजही अगदी ताज्या आहेत.
“मग प्रत्येक घरी एक मूठभर तांदूळ भेट द्यायचा. त्यांनी दिलेली लांगी [तांदळापासून बनवलेली बियर] चाखायची. प्रत्येक घरी अगदी दोन-चारच घोट घ्यायचे. पण इतक्या घरांना भेटी द्यायच्या असतात की दिवसाखेर आम्ही चांगलेच हवेत असतो,” त्या म्हणतात. “त्याच दिवशी गावातली तरुण मंडळी वडिलधाऱ्यांप्रती असलेला आदर व्यक्त करण्यासाठी त्यांना नदीच्या पाण्याने न्हाऊ घालतात.” वर्षाचं स्वागत करण्यासाठीच्या या सणाविषयी बोलताना जयांचा चेहरा खुलतो.
आज दोन देशांच्या सीमेपल्याड, घरापासून शेकडो किलोमीटर दूर राहिलीये ती फक्त लांगी. चकमा आदिवासी असणाऱ्या अनेक निर्वासितांना एका धाग्यात बांधणारी लांगी. “आमच्या संस्कृतीचा भाग आहे ती,” त्या म्हणतात. जया बांग्लादेशच्या रोंगोमतीमध्ये लहानाच्या मोठ्या झाल्या. इथले इतर आदिवासी समूह देखील आपल्या अनेक कर्मकांडामध्ये आणि देवाचा प्रसाद म्हणून लांगी वापरतात.
“माझे आई-वडील लांगी बनवायचे ती मी पाहत असे. माझं लग्न झालं आणि मग मी आणि माझा नवरा सुरेन, आम्ही दोघं लांगी बनवायला लागलो,” त्या सांगतात. या दोघांना तीन प्रकाच्या बियर बनवता येतात. लांगी, मोड आणि जोगोरा.
जोगोरासुद्धा तांदळापासूनच बनते. बंगाली पंचांगानुसार चैत्र हा शेवटचा महिना. त्याच्या पहिल्या दिवशी जोगोरा बनवण्याची तयारी सुरू होते. “आम्ही बिरोइन चाल [उत्तम दर्जाचा चिकट भात] वापरतो. अनेक आठवडे बांबूमध्ये तो आंबवून घेतल्यानंतर त्याचा अर्क काढला जातो. पण आजकाल आम्ही जोगोरा फारशी बनवत नाही,” जया सांगतात. ही बियर करायला एक महिना लागतो आणि त्याला लागणाऱ्या तांदळाचे भावही वाढले आहेत. “पूर्वी आम्ही झूम शेतीत हा तांदूळ पिकवायचो. पण आता मात्र या भाताखालची जमीन कमी व्हायला लागलीये.”
















