तसं मोहम्मद शोएबचं हे दुकान आठवड्याचे सातही दिवस चोवीस तास सुरू असतं, पण त्याने बनवलेल्या खास नाश्त्याची चव चाखायची असेल तर भल्या सकाळी त्याच्या दुकानात पोहोचणं हे सगळ्यात उत्तम!
ग्राटा बल या नवाकदलच्या परिसरात ३५ वर्षीय मोहम्मद गेल्या १५ वर्षांपासून हेरिटेज हरिसा हे दुकान चालवतोय. श्रीनगरच्या मध्यवर्ती भागातला हा परिसर म्हणजे हरिसा बनवून विकणाऱ्या दुकानांचं केंद्रस्थानच! इथली काही दुकानं तब्बल तीन शतकांहून जुनी आहेत. आणि या खाद्य पदार्थाची कथा तर त्याहूनही जुनी आहे.
“माझे वडील सांगायचे की हरिसा बनवण्याची कला शाह-इ-हमदान (इराणमधले १४ व्या शतकातले सूफी संत) यांनी इथे आणली. त्यांनी खोऱ्यातल्या हरिसा बनवणाऱ्या लोकांना या पदार्थाची ओळख करून दिली,’’ हरिसा बनवणाऱ्या चौथ्या पिढीचं प्रतिनिधित्व करणारा मोहम्मद सांगतो.
तांदूळ आणि कोकराच्या मांसापासून बनवलेला हा पदार्थ वर्षातले फक्त सहा महिने – ऑक्टोबर ते मार्च – मिळतो. सोबत मीठी (आतड्यांचा खिमा) आणि गरम तेलाची फोडणी दिलेले कबाब. आणि हे सगळं चाटून पुसून खाण्यासाठी गव्हाच्या कणकेची कांदेर शोट नावाची रोटी. या पदार्थात काळी इलायची, दालचिनी आणि लवंगीचा वापर केला जातो. जमिनीतल्या खोल खड्ड्यात कोळसे पेटवून त्यावर तांब्याच्या किंवा मातीच्या माठ नावाने ओळखल्या जाणाऱ्या भांड्यात हरीसा ठेवला जातो आणि वरून खड्डा झाकून रात्रभर शिजू दिला जातो.












