"हमें पता नहीं हमारा बेटा कैसे मरा, कंपनी ने हमें बताया भी नही” नीलम यादव म्हणतात.
तेहतीस वर्षांची नीलम सोनिपत मधील राई या गावात आपल्या घरी उभी होती. आपल्यावर खिळलेल्या सगळ्या नजरा टाळत बोलत होती. सहा महिन्यांपूर्वी राम कमल हा तिचा पुतण्या खाद्य पदार्थाच्या फॅक्टरीतील एसी रिपेअर युनिट मध्ये काम करत असताना मृत्यू पावला. लग्न झाल्यापासून, म्हणजेच २००७ पासून तिने त्याला अगदी पोटच्या मुलाप्रमाणे वाढवलं होतं.
२९ जून २०२३. नेहमीसारखा निवांत दिवस. स्वच्छ ऊन पडलं होतं. तिच्या दोन मुली आणि एक मुलगा यांच्यासोबत सासरे शोभनाथ यांचं जेवण झालं होतं. त्या दिवशी डाळ -भात बनवला होता. ती स्वयंपाकघर स्वच्छ करत होती आणि सासरे दुपारची वामकुक्षी घेण्यासाठी आडवे पडले होते.
दुपारी एकच्या सुमारास दारावरची बेल वाजली. तिने हात धुतले, दुपट्टा नीट केला आणि कोण आलंय हे बघायला ती दरवाजाकडे गेली. निळ्या गणवेशातील दोन माणसं हातात बाईकच्या चाव्या खेळवत उभे होते. ते दोघे राम कमलच्या कंपनीत काम करणारे आहेत, तिच्या लक्षात आलं. त्यांच्यापैकी एकाने तिला सांगितलं, "रामला इलेक्ट्रिक शॉक लागलाय आणि तुम्ही जिल्हा रुग्णालयात लगेच चला."
“मी त्यांना सारखं विचारत होते की तो बरा आहे ना, शुद्धीत आहे ना? ते फक्त म्हणाले की तो शुद्धीत नाहीये," हे सांगत असताना तिच्या स्वरांत कंप होता. बससाठी वेळ न दवडता त्याच माणसांना बाईकवर रुग्णालयात घेऊन चला अशी विनंती तिने आणि तिचे सासरे शोभराम यांनी केली. वीस मिनिटांत ते तिथे पोचले.











