“सगळ्या गोष्टी दुरुस्त करण्याचे उपाय मी शोधत असतो.”

सुनील कुमार ठठेरा म्हणजेच त्वष्टा-तांबट आहेत. “इतर कुणालाही दुरुस्त करता येत नाहीत अशा वस्तू-भांडी लोक आमच्याकडे घेऊन येतात. कधी कधी तर मेकॅनिक त्यांची अवजारं देखील आमच्याकडे घेऊन येतात.”

स्वयंपाकघरात किंवा घरगुती वापराची तांब्याची, पितळी किंवा काश्याची भांडी किंवा वस्तू तयार करणं हा त्यांचा परंपरागत व्यवसाय. “आजकाल कुणाला आपले हात खराब करून घ्यायचे नाहीयेत,” ४० वर्षीय सुनील कुमार सांगतात. गेली २५ वर्षं ते तांबट व्यवसायात आहेत. “दिवसभर मी ॲसिड, कोळशाचं काम करत असतो. निखारे आणि आगीत. मी करतो कारण मला वेड आहे या कामाचं.”

पंजाबमध्ये ठठेरा (यांना ठठियारही म्हणतात) इतर मागासवर्ग प्रवर्गात मोडतात. लोखंड सोडून इतर धातूंपासून विविध वस्तू तयार करण्याचा त्यांचा परंपरागत व्यवसाय आहे. दाराचे कडी कोयंडे, कुलुपंही ते बनवतात. वडील ६७ वर्षीय केवल क्रिशन यांच्यासोबत ते काम करतात. भंगारमधून लागेल ते साहित्य विकत घेऊन ते दुरुस्तीच्या कामासाठी ते वापरतात.

गेल्या काही दशकांमध्ये स्टीलच्या भांड्यांचा वापर जास्त वाढला आणि हाताने भांडी बनवणाऱ्यांच्या पोटावर पाय आला. आज स्वयंपाकासाठी वापरली जाणारी भांडी जास्तकरून स्टीलची आहेत. तांब्याची आणि पितळेची भांडी महाग असल्याने त्यांची मागणीही झपाट्याने घटली.

Sunil Kumar shows an old brass item that he made
PHOTO • Arshdeep Arshi
Kewal Krishan shows a brand new brass patila
PHOTO • Arshdeep Arshi

सुनील कुमार (डावीकडे) स्वतः तयार केलेली काश्याची शेगडी दाखवतात. त्यांचे वडील केवल क्रिशन (उजवीकडे) यांनी घडवलेलं नवं कोरं पितळेचं पातेलं

पंजाबच्या संगरुर जिल्ह्यातल्या लेहरागागा गावामध्ये सुनील आणि त्यांचं कुटुंब गेल्या अनेक पिढ्यांपासून ही कला जोपासतायत. चाळीस वर्षांपूर्वी ठठेरांची आणखी दोन कुटुंबं होती. “देवळाजवळ आणखी एक असंच दुकान होतं पण त्याला ३ लाखाची लॉटरी लागली आणि त्याने आपला व्यवसाय सोडला आणि दुकान बंद केलं,” सुनील सांगतात. कमाई पुरेशी नसल्याने लोक हा धंदा सोडत असल्याचं सुनील सांगतात.

चार पैसे हातात यावे यासाठी सुनील कुमार यांच्यासारखे ठठेरा स्टीलच्या भांड्यांचंही काम करतात. दुरुस्तीचं आणि भांडी तयार करण्याचं.

लेहरागागामध्ये सुनील यांचं एकच दुकान आहे जिथे पितळेची भांडी साफ करून मिळतात, दुरुस्त होतात आणि त्याला कल्हईदेखील करून मिळते. आणि गावातले किंवा शहरातले लोक इथे भांडी घेऊन येतात. दुकानाला कसलं नाव नाही किंवा पाटीही नाही. पण तरी लोकांना हे ठठेराचं दुकान म्हणून पक्कं माहित आहे.

“आमच्या घरीदेखील पितळेची भांडी आहेत पण ती आम्ही नुसती ठेवून दिली आहेत – भावनिक मूल्य तर आहेच पण पैशाचंही मोल आहेच. रोजच्या वापरात मात्र ती नाहीत,” इथून २५ किमीवर असलेल्या दिरबा गावाहून आलेले एक जण सांगतात. ते पितळेच्या चार वाट्या साफ करण्यासाठी घेऊन आले आहेत. “रोज रोज वापरून स्टीलच्या भांड्यांचं काहीही उरत नाही. विकली तरी त्याचं काही मिळत नाही. पितळेच्या भांड्याचं मूल्य मात्र कमी होत नाही,” ते सांगतात.

पितळेच्या भांड्यांना पूर्वीची झळाळी मिळवून देण्यासाठी सुनील कुमारसारख्या ठठेरांकडे येतात. आम्ही सप्टेंबर महिन्यात त्यांची भेट घेतली तेव्हा ते एका भांड्याचं काम करत होते. जिची भांडी आहेत तिचं लग्न होतं आणि आईकडून मिळालेली भांडी घेऊन ती दुकानात आली होती. किती तरी दिवस वापरात नसल्यामुळे भांडी काळी पडलीयेत. आता ती साफ करून परत चमकवण्याचं काम सुनील कुमार करतायत.

पितळेची भांडी साफ करायची सुरुवात आधी भांड्यावर कुठे कुठे हिरवे डाग दिसतायत तिथपासून होते. पितळेच्या भांड्यांवर ऑक्सिडेशनची प्रक्रिया होते तेव्हा त्यावर असे डाग पडायला लागतात. त्यानंतर एका छोट्या भट्टीवर भांडी गरम केली जातात. आगीत जेव्हा भांडी काळी होतात तेव्हाच ती पातळ केलेल्या आम्लाने धुऊन घ्यावी लागतात. त्यानंतर चिंचेचा कोळ त्यावर घासला जातो. मग ही भांडी एकदम चमकू लागतात. तपकिरी पडलेली भांडी लालसर सोनेरी रंगाची दिसू लागतात.

Sunil Kumar removes the handles of a kadhai before cleaning it. The utensil is going to be passed on from a mother to her daughter at her wedding.
PHOTO • Arshdeep Arshi
Sunil Kumar heats the inside of the kadhai to remove the green stains caused by oxidation
PHOTO • Arshdeep Arshi

सुनील कुमार कढई साफ करण्याआधी तिचे दोन्ही कान काढून ठेवतात (डावीकडे). ही भांडी आईकडून लग्नात तिच्या मुलीला दिली जातील. कढईच्या आतल्या बाजूला पडलेले हिरवे डाग आधी काढले जातात

Sunil rubs tamarind on the kadhai to bring out the golden shine. He follows it up after rubbing diluted acid
PHOTO • Arshdeep Arshi
Sunil rubs tamarind on the kadhai to bring out the golden shine. He follows it up after rubbing diluted acid
PHOTO • Arshdeep Arshi

सुनील चिंचेचा कोळ लावून पितळ चमकवतात. आम्लाच्या पातळ द्रावणाने भांडं साफ केल्यानंतर चिंचेचा वापर केला जातो

भांडी साफ झाल्यानंतर सुनील एक ग्राइंडिंग मशीनचा वापर करून त्याला सोनेरी झळाळी देतात. “जेव्हा आमच्याकडे ग्राइंडर नव्हता तेव्हा आम्ही त्याच कामासाठी रेगमार [सँड पेपर] वापरायचो,” ते म्हणतात.

त्यानंतरचं काम म्हणजे ‘टिक्का’ मारणं म्हणजेच ठोके मारणं किंवा ठसे करणं. भांड्यांवर विशिष्ट पद्धतीने ठोके मारले जातात. कधी कधी लोक फक्त साधं पॉलिश करून द्यायला सांगतात किंवा कधी विशिष्ट नक्षी करायला सांगतात.

सुनील कुमार हातातल्या कढईवर ठोके मारण्यासाठी हातोडी आणि ऐरण तासून घासून घेतात जेणेकरून भांड्यावरचे ठोके साफ आणि टोकदार होतील. पॉलिश केलेली अवजारं अगदी आरशासारखी चमकतात. त्यानंतर ते ऐरणीवर कढई ठेवतात आणि त्यावर गोलाकार ठोके मारायला सुरुवात करतात. चमकत्या सोनेरी धातूवर ठोके चमकायला लागतात.

अनेक वर्षं वापरात नसलेली, नीट न ठेवलेली पितळी भांडी साफ करावी लागतात आणि पॉलिश करावी लागतात. त्यानंतरच ती सोन्यासारखी चमकतात.

The kadhai shines after being rubbed with diluted acid and the green stains are gone .
PHOTO • Arshdeep Arshi
Sunil Kumar then uses the grinder to give a golden hue
PHOTO • Arshdeep Arshi

कढई पातळ सिडने साफ करून चिंचेने घासून त्यावरचे हिरवे डाग काढले जातात. सुनील कुमार त्यानंतर ग्राइंडरचा वापर करून त्याला सोनेरी चमक मिळवून देतात

Sunil Kumar dotting a kadhai with a polished hammer
PHOTO • Arshdeep Arshi
Sunil Kumar dotting a kadhai with a polished hammer
PHOTO • Arshdeep Arshi

सुनील कुमार तासलेल्या हातोडीने कढईवर ठोके मारतायत

भांडी स्वयंपाकासाठी वापरायची असतील तर त्याला आतून कल्हई करावी लागते. कल्हई म्हणजे लोखंड सोडून इतर धातूच्या भांड्यांना आतून कथलाचा मुलामा देण्याची प्रक्रिया. कथलामुळे पितळी आणि तांब्याची भांडी कळकत नाहीत.

‘भांडे कली करा लो!’ अगदी काही वर्षांपर्यंत ही हाळी गल्ल्या-गल्ल्यांमधून ऐकू यायची. कल्हईवाले लोकांना आपापली पितळी भांडी घेऊन यायला सांगतात. सुनील सांगतात की जर ही भांडी नीट वापरली गेली तर पाच वर्षं कल्हई केली नाही तरी चालतात. मात्र काही लोक मात्र वर्षभर भांडी वापरल्यानंतर कल्हई करून घेतात.

कल्हई करण्याआधी पातळ ॲसिड आणि चिंचेने भांडं साफ केलं जातं. त्यानंतर भांडं लालबुंद होईपर्यंत तापवलं जातं. कथलाची एक पातळ पट्टी गरम करून भांड्याला झपाट्याने त्याचा एक मुलामा दिला जातो. सोबत नवसागरची पूड पसरवली जाते. यामध्ये सोडा, अमोनियम क्लोराईड पाण्यात घालून त्याचं द्रावण पसरवलं जातं. यानंतर भरभर कापसाने किंवा चिंधीने हा सगळा माल भांड्याच्या आत सगळीकडे सारखा पसरवला जातो. त्यातून पांढरा धूर निघतो आणि आणि काही मिनिटांमध्ये जादू व्हावी तसं भांड्याची आतली बाजू चंदेरी दिसायला लागतं. त्यानंतर हे भांडं गार पाण्यात बुडवलं जातं.

गेल्या काही दशकांमध्ये स्टीलची भांडी खूपच लोकप्रिय झाली आहेत. धुवायला सोपी, कळकत नाहीत आणि कुठलंही अन्न त्यात शिजवता येतं त्यामुळे त्यांचा वापर सोपा आहे. पितळी भांडी टिकाऊ तर आहेत, त्याचं मोल पण जास्त आहे पण त्यांची काळजी देखील जास्त घ्यावी लागते. वापरल्यानंतर ही भांडी लगेच धुऊन टाका असा सल्ला द्यायला सुनील विसरत नाहीत.

Nausadar is a powdered mix of caustic soda and ammonium chloride mixed in water and is used in the process of kalai
PHOTO • Arshdeep Arshi
Tin is rubbed on the inside of it
PHOTO • Arshdeep Arshi

डावीकडेः नवसागर म्हणजे सोडा, अमोनियम क्लोराईड आणि पाण्याचं द्रावण. कल्हई करताना ते वापरलं जातं. उजवीकडेः कथलाची पातळ पट्टी तापवून भांड्याच्या आतून तिचा मुलामा दिला जातो

The thathera heats the utensil over the flame, ready to coat the surface .
PHOTO • Arshdeep Arshi
Sunil Kumar is repairing a steel chhanni (used to separate flour and bran) with kalai
PHOTO • Arshdeep Arshi

डावीकडेः आतून कथलाचा मुलामा देण्याआधी भांडं तापवलं जातं. उजवीकडेः सुनील कुमार स्टीलच्या चाळणीला कल्हई लावतायत

*****

सुनील कुमार यांचे वडील केवल क्रिशन ५० वर्षांपूर्वी मलेरकोटलाहून लेहरागागाला आले. तेव्हा त्यांचं वय होतं १२. “सुरुवातीला तर काही दिवसांसाठी म्हणून आम्ही आलो. पण त्यानंतर इथेच राहिलो,” ते सांगतात. त्यांचं घराणं तांबटकाम करणारं. केवल यांचे वडील केदारनाथ आणि आजोबा ज्योती राम अगदी कुशल कारागीर होते. पण आपला मुलगा हे काम करेल का नाही याची सुनील यांना खात्री नाहीः “माझ्या मुलाला यामध्ये मजा आली तर तोही हे काम पुढे नेईल.”

सुनील यांच्या सख्ख्या भावाने हे काम सोडलं आणि तो आता खाजगी टेलिकॉम कंपनीत काम करतात. आणि इतर नातोवाइकांनी सुद्धा इतर वस्तूंची दुकानं सुरू केली.

सुनील आपल्या वडलांकडून केवल क्रिशन यांच्याकडून ही कला शिकले. “मी दहावीत असताना माझे वडील जायबंदी झाले होते. तेव्हा मला शाळा सोडावी लागली आणि पोट भरण्यासाठी हा व्यवसाय त्यांनी शिकून घेतला,” हे सगळं सांगत असताना भांड्यावर ठोक्यांचं काम सुरूच होतं. “मी शाळेत होतो तेव्हा मी रिकामा वेळ असेल तेव्हा दुकानात यायचो आणि काही ना काही बनवण्याचा प्रयत्न करायचो. एकदा तर पितळी एअरकूलर बनवला होता,” ते अगदी अभिमानाने सांगतात.

त्यांनी अगदी सुरुवातीला एक पातेलं तयार केलं होतं. ते त्यांनी विकलंसुद्धा. त्यानंतर कामातून थोडी फुरसत मिळाली की ते नवं काही तरी घडवण्याचा प्रयत्न करायचे. “मी माझ्या बहिणीसाठी एक गोलख तयार केला होता, त्याच्यावर एका चेहऱ्याची नक्षीदेखील केली होती,” ते सांगतात. त्यांनी आपल्या घरच्यासाठी एक दोन अशी भांडी तयार केली आहेत की ती पाण्याच्या टाकीत ठेवता येतात. तांबं शरीरासाठी चांगलं असतं त्यामुळे त्याचा असा वापर केला जातो.

गेल्या काही दशकांमध्ये स्टीलची भांडी खूपच लोकप्रिय झाली आहेत. धुवायला सोपी, कळकत नाहीत आणि कुठलंही अन्न त्यात शिजवता येतं

२०१४ साली युनेस्कोने पंजाबच्या जंडियाला गुरू गावातल्या ठठेरा समुदायाची अमूर्त सांस्कृतिक वारसा म्हणून नोंद घेतली आहे. या गावात ठठेरांचं काम आणि व्यवसाय टिकू शकला त्यामध्ये या युनेस्कोच्या नोंदीचं महत्त्व आहे. सोबत अमृतसरच्या गुरुद्वारांमध्ये ही भांडी आजही वापरली जातात त्यामुळे देखील हा व्यवसाय टिकून आहे.

गुरुद्वारांमध्ये स्वयंपाकासाठी मोठ्या डेग आणि वाढण्यासाठी ‘बालटी’ (बादली) आजही वापरल्या जातात. मात्र भांड्यांची जास्त काळजी घ्यावी लागते म्हणून बऱ्याच गुरुद्वारांनी आता पितळी-तांब्याची भांडी वापरणं बंद केलं आहे.

“आजकाल आमच्याकडे फक्त दुरुस्तीचं काम सुरू आहे. नवी भांडी बनवायला वेळच नाहीये,” सुनील सांगतात. मुळातून भांडी तयार करणारे हे लोक आता फक्त दुरुस्ती करतायत. हे मोठं स्थित्यंतर आहे. एखादा कारागीर एका दिवसात १०-१२ पातेली बनवायचे. मात्र मागणीत घट झालीये, किमती वाढल्या आणि वेळेची पण मर्यादा आहे. त्यामुळे भांडी बनवणारे कारागीर आता वस्तू तयार करत नाहीयेत.

“आम्ही जशी मागणी असेल तशा वस्तू तयार करतो. करून ठेवून देण्याचा काळ गेला,” ते म्हणतात. मोठमोठ्या कंपन्या ठठेरांकडून भांडी आणि इतर वस्तू विकत घेतात आणि चारपट किंमत वाढवून विकतात.

भांड्यामध्ये किती पितळ किंवा तांबं वापरलं जातं आणि त्याचा दर्जा आणि तयार भांड्याचं वजन यावर किंमत ठरते. उदाहरणार्थ कढई ८०० रु. किलो भावात विकली जाते. पितळेची भांडी वजनावर विकली जात असल्यामुळे स्टीलच्या भांड्यांपेक्षा त्यांची किंमत कायम जास्त असते.

As people now prefer materials like steel, thatheras have also shifted from brass to steel. Kewal Krishan shows a steel product made by his son Sunil.
PHOTO • Arshdeep Arshi
Kewal dotting a brass kadhai which is to pass from a mother to a daughter
PHOTO • Arshdeep Arshi

डावीकडेः आजकाल लोकांची स्टीलला पसंती असल्याने ठठेरांनीही स्टीलची भांडी बनवायला सुरुवात केली आहे. आपल्या लेकाने सुनीलने तयार केलेलं स्टीलचं एक भांडं केवल क्रिशन दाखवतायत. उजवीकडेः आईकडून मुलीला लग्नात देण्यात येणाऱ्या कढईवर सुनील ठोके मारतायत

Brass utensils at Sunil shop.
PHOTO • Arshdeep Arshi
An old brass gaagar (metal pitcher) at the shop. The gaagar was used to store water, milk and was also used to create music at one time
PHOTO • Arshdeep Arshi

डावीकडेः सुनील यांच्या दुकानातली पितळेची भांडी. उजवीकडेः दुकानातली पितळेची एक जुनी घागर. या घागरीत पाणी आणि दूध भरून ठेवायचे. त्याचा वापर ताल धरण्यासाठीदेखील करतात

“आम्ही इथे नवी भांडी तयार करायचो. पन्नासेक वर्षांपूर्वी आम्हाला जस्त आणि तांबं स्वस्त मिळावं म्हणून शासनाने आम्हाला ठराविक कोटा ठरवून दिला होता. पण आता मात्र सरकार कारखान्यांना हा कोटा देतं, पण आमच्यासारख्या छोट्या व्यावसायिकांना मात्र नाही,” केवल क्रिशन खंतावून सांगतात. साठी पार केलेले क्रिशन दुकानात सगळ्या कामावर लक्ष ठेवून असतात. सरकार त्यांना मिळणारं अनुदान पुन्हा सुरू करेल ही आशा मात्र त्यांनी सोडलेली नाही.

पूर्वी २६ किलो जस्त आणि १४ किलो तांबं एकत्र केलं जात असे. त्याची पारंपरिक पद्धत केवल क्रिशन समजावून सांगतात. “दोन्ही धातू गरम करून एकत्र केले जात आणि त्यानंतर छोट्या छोट्या वाट्यांमध्ये थंड होण्यासाठी ओतून ठेवले जात. त्यानंतर वाटीच्या आकाराच्या या धातूच्या गोळ्यांपासून पातळ पत्रा तयार केला जात असे. त्याला वेगवेगळे आकार देऊन त्यापासून भांडी किंवा इतर वस्तू तयार केल्या जायच्या,” ते सांगतात.

या भागात आता धातूचे पत्रे तयार करून देणारे मोजकेच कारखाने उरले आहेत जिथून ठठेरा भांड्यांसाठी धातूचे पत्रे घेऊन येऊन शकतात. “एक तर आम्हाला अमृतसरमधलं जण्डियाला गुरू (लेहरागागहून २३४ किलोमीटर) किंवा हरयाणात जगधरी (२०३ किमी दूर) या दोन ठिकाणाहून आम्ही पितळेचा पत्रा घेऊन येतो. आणि त्यानंतर गिऱ्हाइकाच्या इच्छेप्रमाणे त्यापासून भांडी तयार करतो,” सुनील सांगतात.

सप्टेंबर महिन्यात प्रधान मंत्री विश्वकर्मा योजना जाहीर झाली त्याचा केवल क्रिशन उल्लेख करतात. या योजनेअंतर्गत लोहार, सुतार, कुंभार अशा एकूण १८ बलुतेदार कारागिरांना कुठल्याही तारणाशिवाय ३ लाखांचं कर्ज मिळण्याची तरतूद करण्यात आली आहे. मात्र यात ठठेरा नाहीत, केवल सांगतात.

भांड्यांच्या दुरुस्तीतून होणारी कमाई बेभरवशाची आहे. काम मिळालं तर कधी दिवसाला सुमारे १,००० रुपये मिळतात मात्र नवी भांडी तयार केली तर त्यांच्या व्यवसायालाच फायदा होईल असं सुनील सांगतात. अलिकडच्या काळात लोक पुन्हा पितळेच्या भांड्यांकडे वळू लागले असल्याचं त्यांना जाणवलं आहे. यातून आपली ही कला आणि व्यवसाय पुन्हा उभारी घेईल असा आशेचा किरण मनात डोकावू लागला आहे.

Arshdeep Arshi

ଅର୍ଶଦୀପ ଅର୍ଶି ଚଣ୍ଡୀଗଡ଼ର ଜଣେ ସ୍ୱାଧୀନ ସାମ୍ବାଦିକ ଏବଂ ଅନୁବାଦକ ଏବଂ ସେ ନ୍ୟୁଜ୍18 ପଞ୍ଜାବ ଓ ହିନ୍ଦୁସ୍ତାନ ଟାଇମସରେ କାମ କରିଛନ୍ତି। ସେ ପାତିଆଲାର ପଞ୍ଜାବୀ ବିଶ୍ୱବିଦ୍ୟାଳୟରୁ ଇଂଲିଶ ସାହିତ୍ୟରେ ଏମ୍.ଫିଲ ଉପାଧି ହାସଲ କରିଛନ୍ତି।

ଏହାଙ୍କ ଲିଖିତ ଅନ୍ୟ ବିଷୟଗୁଡିକ Arshdeep Arshi
Editor : Shaoni Sarkar

ଶାଓନି ସରକାର କୋଲକାତାରେ ରହୁଥିବା ଜଣେ ମୃକ୍ତବୃତ୍ତିର ସାମ୍ବାଦିକ।

ଏହାଙ୍କ ଲିଖିତ ଅନ୍ୟ ବିଷୟଗୁଡିକ Shaoni Sarkar
Translator : Medha Kale

ମେଧା କାଲେ ପୁନେରେ ରହନ୍ତି ଏବଂ ମହିଳା ଓ ସ୍ଵାସ୍ଥ୍ୟ କ୍ଷେତ୍ରରେ କାମ କରିଛନ୍ତି । ସେ ମଧ୍ୟ PARIର ଜଣେ ଅନୁବାଦକ ।

ଏହାଙ୍କ ଲିଖିତ ଅନ୍ୟ ବିଷୟଗୁଡିକ ମେଧା କାଲେ