२० वर्षांपूर्वी घेतलेल्या निर्णयाचे परिणाम असे भोगावे लागतील, ही कल्पना देखील बाळासाहेब लोंढेंनी कधी केली नव्हती. पुण्यातील फुरसुंगीमधे एका अल्पभूधारक शेतकऱ्याच्या घरात लोंढेंचा जन्म झाला आणि लहानपणापासूनच ते कुटुंबियांसोबत शेतात राबू लागले. ते कापसाची शेती करत. वयाच्या १८ व्या वर्षी अधिकच्या कमाईसाठी त्यांनी ट्रक चालवायला सुरवात केली.
"माझ्या
एका मित्राने मला एका मुस्लिम कुटुंबाशी गाठ घालून दिली.
त्यांचा गुरांची ने-आण करायचा व्यवसाय
होता. त्यांना ट्रक चालक हवे होते आणि मी होकार दिला," ४८ वर्षाचे लोंढे सांगतात.
लोंढेनीं खूप
मेहनत घेत धंद्यातल्या खाचाखोचा जाणून घेतल्या आणि जवळपास १० वर्षात त्यांच्याकडे पुरेसा
अनुभव आणि पैसा जमा
झाला.
लोंढे
सांगतात- "मी आठ लाखात एक सेकंड-हँड ट्रक विकत घेतला. तरीही माझ्याकडे दोनेक लाख शिल्लक राहिले. १० वर्षात माझे आजूबाजूच्या शेतकरी आणि व्यापाऱ्यांशी चांगले संबंध
तयार झाले होते."
लोंढेची
मेहनत सफल झाली, त्यांचा धंद्यात जम बसला आणि आणि धंद्यामुळे ते अवकाळी पाऊस, महागाई
आणि कापसाचा कमी बाजारभाव या संकटांमधे देखील
तगून राहिले.
त्यांचा व्यवसाय अगदीच सरळसोट होता. ज्या शेतकऱ्यांना त्यांची गुरे विकायची
आहेत, त्यांच्याकडून आठवड्याच्या बाजारातून गुरे घ्यायची, आणि थोड्या जास्त किमतीत ती खाटकाला किंवा दुसऱ्या शेतकऱ्यांना विकायची. २०१४ साली जवळपास १० वर्षे हा
धंदा केल्यांनतर त्यांनी अजून एक ट्रक विकत घेतला.
पेट्रोलचा खर्च, ट्रकची डागडुजी,
आणि चालकाचा पगार जाऊन लोंढे महिना १ लाख कमवत होते. ते अश्या व्यवसायामधे होते ज्यात
परंपरागत कुरेशी मुस्लिम समाजाचा वरचष्मा होता. "त्याने कधीच फरक पडला नाही, उलट ते मला त्यांच्या ओळखी सांगायचे. माहिती द्यायचे. वाटू लागलं होतं की मी आयुष्यभरासाठी या धंद्यामधे
राहू शकतो"
पण २०१४ मध्ये भाजपच सरकार केंद्रात आले, आणि गोरक्षकांचा उपद्रव वाढला. गाय हिंदू धर्मात पवित्र आणि पूज्य आहे. या भावनेचा वापर करुन गोरक्षेच्या नावाखाली मुस्लिम समाजाला लक्ष करणे आणि त्यांच्याविरुद्ध हिंसा करणे हे ह्या तथाकथित गोरक्षकांचे काम.
या न्यूयॉर्कस्थित संस्थेच्या २०१९ च्या अहवालानुसार भारतात मे २०१५ ते
डिसेंबर २०१८ या काळात
गोमांस
वाहतुकीच्या नावाखाली
गोरंक्षकांकडून १०० पेक्षा जास्त हल्ले झाले, ज्यामध्ये २८०
लोक जखमी आणि ४४ जण मृत्युमुखी पडले. बळी पडलेल्यांमध्ये बहुतांश लोक मुस्लिम होते.
२०१७ साली IndiaSpend या सांखिकी वेबसाइट ने २०१० पासून गोरक्षा आणि बीफसंबंधी
घडलेल्या हत्यांचा अभ्यास करून एक अहवाल प्रकाशित केला. या अहवालानुसार अश्या हल्ल्यांमध्ये
मृत्युमुखी पडलेल्यांपैकी ८६% मुस्लिम आहेत आणि ९७ % हल्ले हे मोदी प्रधानमंत्री झाल्यानंतर
झालेले आहेत. विशेष बाब ही, की हा अहवाल प्रदर्शित झाल्यानंतर IndiaSpend संस्थेने
हा अहवाल त्यांच्या वेबसाइटवरून वरून काढून टाकलेला आहे.
लोंढेंच्या म्हणण्यानुसार अश्या प्रकारच्या हिंसांमध्ये मागील ३ वर्षातच कमालीची
वाढ झालेली आहे, त्यांचा व्यवसाय जो महिना १ लाख फायद्यात होता, तो मागच्या ३ वर्षात
३० लाख तोट्यात आहे. शिवाय हिंसेची भीती रोजचीच.
"हे
एक दुःस्वप्न आहे" लोंढे निराश होऊन म्हणतात.
*****
२१ सप्टेंबर २०२३ रोजी पुण्याच्या गुरांच्या बाजारात जात असताना प्रत्येकी १६ म्हशी घेऊन जाणारे लोंढेचे २ ट्रक 'गोरक्षकांनी' पुण्यापासून अर्धा तासावरच्या कर्जतच्या आसपास अडवले.
महाराष्टात १९७६ पासून गोहत्याबंदी आहे. मात्र
२०१५ मध्ये तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बैल आणि संपूर्ण गोवंशच या
बंदीत आणला. पण या बंदी मधे म्हशी आणि रेड्यांचा समावेश नाही. लोंढे यांच्या ट्रक मध्ये
म्हशी आणि रेडेच होते.
"तरीही दोन्ही ट्रकच्या चालकांना गोरक्षकांद्वारे शिवीगाळ व मारहाण
केली गेली. एक चालक हिंदू होता, तर एक मुस्लिम. माझ्याकडे गुरे वाहतुकीचे सर्व परवाने
आणि कागदपत्रे देखील होती. तरीही माझे ट्रक ताब्यात घेऊन पोलिसांकडे देण्यात आले." लोंढे सांगतात
'गुरं घेऊन ट्रक चालवायचा म्हणजे जिवाची बाजी लावण्यासारखं आहे. फारच टेन्शनचं काम झालंय. ग्रामीण अर्थव्यवस्थेचा या गुंडाराजने नाश केलाय. अच्छे दिन त्यांचेच जे कायदा पायदळी तुडवतायत'
पुणे पोलिसांनी लोंढे आणि त्यांच्या दोन ट्रक चालकांवर 'प्राण्यांना क्रूरतेने वागवण्यास प्रतिबंध करण्याबाबत अधिनियम, १९६०' नुसार गुन्हे दाखल केले. पोलिसांच्या आरोपपत्रानुसार ट्रकमधे कमी जागेत गुरं कोंबली होती आणि त्यांना पुरेसं अन्न -पाणी देखील दिलं गेलं नव्हतं. लोंढेच्या म्हणण्यानुसार 'गोरक्षक' खूपच आक्रमक होते आणि पोलिस मात्र त्यांच्याशी फारच नरमाईचे वागत होते. "हे केवळ आणि केवळ त्रास देण्यासाठीच आहे".
शेवटी पोलिसांनी गुरांना मावळ तालुक्यातील धामणे या गावातील एका गोशाळेमध्ये हलवले आणि लोंढेंना नाईलाजास्तव कोर्टाची पायरी चढावी लागली. गुरांची किंमत ६.५
लाख होती आणि लोंढेंनी चांगला वकील मिळवून केस लढण्यासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा केली.
अखेर दोन महिन्यानंतर २४ नोव्हेंबर २०२३ ला पुण्यातल्या शिवाजीनगर सेशन्स कोर्टाने निकाल दिला. गोरक्षकांना गुरे परत करण्याचे आदेश दिले, आणि पोलिसांना हे काम बजावायला सांगितले. लोंढेंनी सुटकेचा निःश्वास टाकला.
पण
हा आनंद अल्पकाळचा ठरला. निकालाच्या पाच महिन्यानंतरदेखील बाळासाहेबांना अजून त्यांची
गुरे परत मिळाली नाहीत.
"न्यायालयाच्या आदेशानंतर २ दिवसात मला माझे दोन्ही ट्रक परत मिळाले.
ट्रक नसताना माझा सगळा धंदाच बंद पडला होता. मात्र यानंतर जे घडलं, ते जास्त त्रासदायक
होतं."
“मी
'संत तुकाराम' गोशाळेत माझी गुरे परत घ्यायला गेलो, तेव्हा उद्या परत या असे गोशाळेचे
मॅनेजर रुपेश गराडे यांनी सांगितले." लोंढे म्हणतात.
त्यानंतर पुढचे काही दिवस गोशाळे कडून टोलवाटोलवीची उत्तरे देण्यात आली.
पहिल्यांदा गराडे यांनी गुरे सोडण्याआधी त्यांची तपासणी करून घ्यायला पशुवैद्यक उपस्थित
नाही असे सांगितले. नंतर काही दिवसांनी गराडेंनी सेशन्स कोर्टाच्या आदेशाला स्थगिती देणारा आदेश वरच्या न्यायालयाकडून मिळवला. "स्पष्ट दिसत होतं की गोशाळेचे मॅनेजर गराडे वेळकाढूपणा करत होते आणि त्यांना गुरं परत करायचीच नव्हती.
आणि पोलीस मात्र गराडे जे सांगतील, त्यावर विश्वास ठेऊन शांत बसले होते. सगळा सावळा
गोंधळ होता."
पुणे आणि आसपासच्या परिसरातील कुरेशी समाजाशी बोलल्यावर कळले की अश्या
घटना ना नवीन आहेत, ना अपवाद. गोरक्षकांचा हा ठरलेला मार्ग आहे. आणि खूप व्यापाऱ्यांना
नुकसान सोसावे लागलेले आहे. गोरक्षकांच्या म्हणण्यानुसार ते काळजीपोटी गुरे ताब्यात
घेतात, पण कुरेशी समाज याबाबत साशंक आहे.
"या 'गोरक्षकांना' जर खरंच गुरांची एवढी काळजी आणि प्रेम असेल, तर ते शेतकऱ्यांना का विरोध करत नाहीत? ही गुरं तेच तर आम्हाला विकतात ना? आम्ही तर फक्त गुरं विकत घेऊन त्यांची वाहतूक करतो आणि दुसऱ्यांना विकतो. यांचा खरा उद्देश मुसलमानांना छळणं हा आहे." ५२ वर्षीय व्यापारी समीर कुरेशी सांगतात.
२०२३ च्या ऑगस्ट मध्ये समीर यांनाही असाच काहीसा अनुभव आला. त्यांचा ट्रक
अडवून ताब्यात घेतल्याच्या एका महिन्यानंतर जेव्हा ते न्यायालयाचा आदेश घेऊन आपला ट्रक
परत घ्यायला पुरंदर तालुक्यातील झेंडेवाडी इथल्या गोशाळेत गेले, तेव्हा चित्रं वेगळंच होतं.
त्यांना गोशाळेत त्यांची गुरं दिसलीच नाहीत. "माझ्या ट्रक मध्ये
५ म्हशी आणि ११ वासरं होती, सगळं मिळून १.६
लाख बाजारभाव होता."
समीर यांनी कोणी तरी येईल या अपेक्षेने गोशाळेबाहेर जवळपास ७ तास वाट बघितली. शेवटी सोबतच्या पोलीस अधिकाऱ्याने त्यांना उद्या परत येऊया असं म्हणून समजूत काढली आणि परत पाठवलं. "जेव्हा मी दुसऱ्या दिवशी परत गेलो, तेव्हा गोशाळेच्या लोकांनी न्यायालयाच्या आदेशाविरुद्ध स्टे ऑर्डर आणली होती. या गोशाळेच्या लोकांना काही प्रश्न विचारायलाच पोलीस चक्क घाबरतात," कुरेशींच्या बोलण्यात उद्विग्नता जाणवते.
गुरांच्या किमतींपेक्षा कोर्टकचेरीचा खर्च जास्त येईल, शिवाय मानसिक
त्रास वेगळा हा विचार करून समीर यांनी केस लढवायचा विचार सोडून दिला आहे. "पण
मला जाणून घ्यायचंय कि त्या लोकांनी माझी गुरं ताब्यात घेऊन नंतर त्यांचं नक्की
काय केलं? माझी गुरं आहेत तरी कुठे? हे गोरक्षक अशी जनावरं ताब्यात घेऊन त्यांची तस्करी
करतात की काय? का विकून फायदा कमावतात? माझ्या अनेक ओळखीच्या व्यापाऱ्यांचा असाच अनुभव आहे आणि
त्यांची गुरं देखील अशीच गायब आहेत".
आणि जेव्हा गोरक्षक ही ताब्यात घेतलेली जनावरं परत
करतात तेव्हा खाण्या-पिण्यावर झालेला खर्चही मागतात. २८ वर्षीय व्यापारी शाहनवाज
कुरेशी सांगतो कि त्याच्याकडून प्रत्येक गुरामागे दर दिवसाचे ५० रुपये मागितले गेले.
"म्हणजे जर त्यांनी १५ गुरं ताब्यात घेतली, २ महिने त्यांच्याकडे ठेवली, तर आम्हाला त्यांना
४५,००० रुपये द्यावे लागणार. आम्ही अनेक वर्षे या धंद्यात आहोत. हे असे पैसे उकळणं हा निव्वळ खंडणीचा प्रकार आहे."
पुण्यातील सासवड येथे १४ वर्षीय सुमित गावडेने गोरक्षकांचा धुडगूस स्वतःच्या डोळ्याने बघितला होता. वर्ष होतं २०१४.
"मला
खूप मजा आली, अस वाटलं की मी पण असं काहीतरी करायला पाहिजे," तो सांगतो.
८८ वर्षीय धर्मांध हिंदुत्ववादी संभाजी भिडे पुणे आणि पश्चिम महाराष्ट्राच्या भागात खूप प्रसिद्ध आहेत. भिडे,आणि त्यांची संस्था शिवाजी महाराजांच्या इतिहासाचे विद्रुपीकरण करून त्याद्वारे तरुणांमध्ये मुस्लिमांविरुद्ध द्वेष निर्माण करण्यात पटाईत आहे.
"मी त्यांचं भाषण ऐकलं, शिवाजी महाराजांनी मुस्लिम मुघलांना कसं हरवलं त्याविषयी ते बोलत होते. त्यांनी हिंदू तरुणांना आपल्या
धर्माविषयी जागृत केलं आहे," सुमित सांगतो.
१४ वर्षाच्या वयात अशा आक्रमक भाषणांनी सुमित प्रभावित झाला. गोरक्षकांचा
धुमाकूळ त्याला आवडला आणि त्याने संभाजी भिडेंच्या 'शिवप्रतिष्ठान' संस्थेच्या पंडित
मोडकांशी संपर्क साधला.
सासवड
मध्ये राहणारे मोडक कट्टर हिंदुत्ववादी नेते असून ते भारतीय जनता पक्षाशी जवळीक साधून
आहेत. पुणे आणि आसपासच्या परिसरातले गोरक्षक त्यांच्या मार्गदर्शनाखाली काम करतात.
सुमित
गावडे मागील दहा वर्ष मोडकांसाठी काम करतोय आणि गोरक्षणासाठी पूर्ण कटिबद्ध आहे.
"आमची गस्त दररोज रात्री १०.३० ते सकाळी ४ अशी चालते. संशय आला की आम्ही ट्रक
अडवतो, चालकाची चौकशी करतो आणि पोलिसांच्या स्वाधीन करतो. पोलिसांचे आम्हाला नेहमीच
सहकार्य मिळते."
गावडे
दिवसा बांधकाम मजूर म्हणून काम करतो पण जेव्हापासून तो 'गोरक्षक' झालाय, तेव्हापासून
गावात आपल्याला आदर मिळतोय असं त्याचं म्हणणं आहे. "मी काही पैश्यासाठी हे काम
करत नाही, धर्मासाठी करतो आणि त्यामुळेच आपले हिंदू बांधव आदरपूर्वक वागणूक देतात.”
सासवड
ज्या तालुक्यात आहे त्या पुरंदरमधे जवळपास
१५० 'गोरक्षक' कार्यरत आहेत. "आमची माणसं सगळ्या गावात आहेत. सगळे
गस्तीमध्ये सहभागी नसतील होत, पण कुणाला संशयास्पद ट्रक आढळला तर लगेच एकमेकांना कळवतात.”
गायी आणि म्हशी या ग्रामीण अर्थव्यवस्थेचा अविभाज्य भाग आहेत. वर्षानुवर्षे शेतकरी घरात लग्न असेल, दवाखाना आला, पेरणीसाठी लागणारं एकरकमी भांडवल जनावरं विकून उभं करतात. विमा असतो तो त्यांचा.
पण
या गोरक्षकांच्या भीतीमुळे ही व्यवस्थाच मोडून पडली आहे. दिवसेंदिवस हा त्रास वाढतोच आहे. त्याबरोबरच गोरक्षकांचे बळ पण वाढतं आहे.
आजमितीला शिवप्रतिष्ठान सारख्याच ४ संस्था (बजरंग दल, हिंदू राष्ट्र सेना, समस्त हिंदू
आघाडी आणि होय हिंदू सेना) एकट्या पुणे जिल्ह्यात 'गोरक्षणा'चे काम करतात आणि अश्या
प्रकारच्या हिंसा आणि हल्ल्यांना प्रोत्साहन देतात.
"आम्ही
सगळे वेगवेगळ्या संस्थांचे काम करत असलो तरी एकमेकांना मदत करतो, कारण आमचा सगळ्यांचा
अंतिम उद्देश एकच आहे," सुमित गावडे सांगतात.
गावडेंच्या म्हणण्यानुसार एका पुरंदर तालुक्यातच गोरक्षक महिन्याला गुरं वाहून नेणारे सरासरी ५ ट्रक पकडतात. या ४ संस्था पुण्याच्या ७ तालुक्यात आहेत म्हणजे अंदाजे महिन्याला ३५, वर्षाला ४०० ट्रक ताब्यात!
गणित अगदी अचूक जुळतंय.
कुरेशी
समाजाचे ज्येष्ठ लोक सांगतात की २०२३ मध्ये पुणे जिल्ह्यात त्यांचे ४००-४५० ट्रक गोरक्षकांनी
ताब्यात घेतले. प्रत्येक ट्रकमध्ये जवळपास २ लाख किमतीची गुरं होती. गोरक्षकांच्या
या हल्ल्यांमुळे महाराष्ट्राच्या ३६ पैकी पुणे या एका जिल्ह्यातच व्यापाऱ्यांचं कमीत कमी ८ कोटी रुपयांचं नुकसान झालंय, आणि त्यामुळे आता कुरेशी समाज त्यांचा परंपरागत व्यवसाय
सोडायचा विचार करतोय.
"आम्ही
कधीच कायदा हातात घेत नाही, नियमात राहूनच काम करतो," गावडे म्हणतो.
गुरांची वाहतूक करणारे
ट्रक चालक आणि व्यापाऱ्यांचा अनुभव मात्र वेगळा आहे.
*****
२०२३ मधे शब्बीर मुलाणींचा २५ म्हशी घेऊन जात असलेला ट्रक गोरक्षकांनी सासवडनजीक अडवला. ती काळरात्र शब्बीरना व्यवस्थित लक्षात आहे.
"मला
वाटलेलं आज काही मी जगत नाही, मला गोरक्षकांनी खूप शिवीगाळ आणि मारहाण केली. मी त्यांना
सांगितलं की मी गाडीचा फक्त चालक आहे, पण त्यांनी त्याची गुंडगिरी चालूच ठेवली," ४३ वर्षाचे शब्बीर पुण्यापासून दोन तासाच्या अंतरावर साताऱ्यातील
भादळे गावचे आहेत.
मारहाण केल्यानंतर शब्बीर यांना पोलीस ठाण्यात नेऊन त्यांच्यावर 'प्राणी अत्याचार प्रतिबंध' कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला. ज्यांनी मारहाण केली, त्यांना मात्र काहीही झालं नाही. "गोरक्षकांनी तर माझ्या ट्रकमधून २०,००० रुपये पण चोरले. मी पोलिसांना सगळी हकीकत समजावण्याचा प्रयत्न केला. ते सुरवातीला व्यवस्थित ऐकूनही घेत होते, पण नंतर पंडित मोडक स्वतःच्या गाडीतून पोलीस स्टेशनला आले आणि पोलिसांनी माझ्याकडे दुर्लक्ष करून फक्त त्यांचंच ऐकायला आणि खरं मानायला सुरवात केली."
शब्बीर मुलाणींनी एका महिन्यानंतर ट्रक परत मिळवला, मात्र त्यांच्या म्हशी
गोरक्षकांच्या ताब्यातच राहिल्या. "आम्ही जर काही बेकायदेशीर केलं असेल, तर पोलिसांनी
आमच्यावर जरूर कारवाई करावी, पण या गोरक्षकांना आम्हाला रस्त्यात अडवून मारहाण करण्याचा
अधिकार कोणी दिला?" शब्बीर उद्विग्नपणे विचारतात.
शब्बीर मुलाणींचं उत्पन्न महिना १५,००० आहे, दर दिवशी जेव्हा ते कामासाठी बाहेर पडतात, त्यांच्या पत्नी समीना, वय ४० यांच्या जिवाला घोर लागतो. दर अर्ध्या तासाने
फोन करून त्यांची चौकशी करतात. रात्री डोळ्याला डोळा लागत नाही. "त्यात तिची काही चूक नाही,
मला पण हा धंदा सोडून द्यावासा वाटतोय, पण आयुष्यभर मी हेच काम केलंय. हे सोडून
आता या वयात दुसरं काय करू? मला दोन लहान मुलं आहेत, आजारी आई आहे. सगळ्यांचा सांभाळ करायचाय," शब्बीर परिस्थितीसमोर हताश झाले आहेत.
साताऱ्यात वकिली करणारे सरफराज सय्यद शब्बीर मुलाणीसारख्यांच्या
अनेक केसेस कोर्टात लढत आहेत. "हे गोरक्षक नेहमीच ट्रक चालकांना मारहाण करून त्यांच्याकडचे
पैसे लुटतात, पण पोलिसांच्या तक्रारींमध्ये या गोष्टी कधीच नमूद केलेल्या नसतात.
गुरांची वाहतूक हा आपल्या राज्यात आणि देशात पूर्वापार चालत असलेला व्यवसाय आहे. पश्चिम
महाराष्ट्रातील जनावरांचे बाजारदेखील खूप प्रसिद्ध आहेत. गुरे वाहतुकीचे मार्ग देखील
परिचयाचे आहेत आणि सगळे व्यापारी तेच मार्ग वापरतात. पण यामुळेच या 'गोरक्षकांना' गुरांची
वाहतूक आणि विक्री करणाऱ्यांना ओळखणं आणि मग त्यांना आणि ट्रकचालकांना अडवून छळणं सोपं जातं," सय्यद सांगतात.
बाळासाहेब लोंढेच्या म्हणण्यानुसार आता जनावरांच्या वाहतुकीसाठी
ट्रकचालक मिळणं खूप अवघड झालंय. "खूप ट्रक चालक आता मजुरीची कामं करतायत, पैसा कमी मिळतो पण जिवाच्या भीतीपेक्षा तो बरा! गोरक्षकांच्या या गुंडागर्दीमुळे ग्रामीण
अर्थव्यवस्थेची वाट लागली आहे."
आज अशी परिस्थिती आहे की शेतकऱ्यांना त्यांच्या जनावरांचा कमी भाव
मिळतो, व्यापारी अश्या हल्ल्यांमुळे खूप नुकसान सोसतायत, त्यात भीतीपोटी ट्रकचालक
पण मिळत नाहीत.
"'अच्छे दिन' फक्त त्यांचेच आहेत जे कायदा पायदळी तुडवतात."