शशी यांचे पती शिलाईकाम करायचे आणि धंद्यात त्यांचा जरा घाटा झाला होता. तेव्हाच शशी यांनी काम करायला सुरुवात केली. त्यांची तब्येतही हळूहळू साथ देईनाशी झाली आणि मग शशी यांनी काम आपल्या हातात घेतलं. “माझे पती एका यात्रेला गेले होते, तिथून परत आल्यावर त्यांनी पाहिलं की मी दुकानाची सगळी मांडणी बदलून टाकलीये. त्यांना जरा धक्काच बसला,” शशी सांगतात. त्यांचं शिलाई मशीन त्यांनी काढून टाकलं होतं आणि त्या जागी आपले नक्षीकामाचे ठसे, चित्रं आणि धागे आणून ठेवले होते. आणि हे सगळं त्यांनी आपल्या बचत केलेल्या ५,००० रुपयांमधून घेतलं होतं.
आपण भरलेली फुलकारीची वस्त्रं विकण्यासाठी पतियाळाच्या लाहोरी गेटसारख्या वर्दळीच्या भागात गेल्याचं शशी यांना आठवतं. आज त्या फुलकारी भरणाऱ्या अगदी निष्णात कारागीर आहेत. इतकंच काय रेल्वेने ५० किमी प्रवास करून अंबाल्यात जाऊन घरोघरी विक्री केल्याचंही त्यांच्या लक्षात आहे. “माझ्या नवऱ्याच्या मदतीने मी जयपूर, जैसलमेर आणि कर्नालमध्ये फुलकारीची प्रदर्शनं भरवली आहेत,” शशी सांगतात. कालांतराने त्या सगळ्या घाईगोंधळाचा त्यांना कंटाळा आला. आता विक्रीच्या कामात त्या फार लक्ष घालत नाहीत आणि केवळ आवड म्हणून हे काम करतात. त्यांचा मुलगा, दीपांशु रुपेजा, वय ३५ धंदा पाहतो, विक्रीचं आणि पतियाळामध्ये असलेल्या कारागिरांबरोबरचं काम पाहतो.
“मशीनवरची फुलकारी आता सगळीकडे मिळते तरीही हाताने भरलेल्या मालालच आज भरपूर मागणी आहे.” दीपांशु सांगतो. या दोन्ही प्रकारच्या भरतकामातला मुख्य फरक म्हणजे त्यातली सफाई. आणि अर्थात किंमत. हाताने भरलेली फुलकारी २,००० रुपयांपर्यंत विकली जाते आणि मशीनवर भरलेली ५०० ते ८०० रुपयांना.
“किती फुलं भरली आहेत त्यांच्या संख्येवर किंवा नक्षी किती क्लिष्ट आहे त्याप्रमाणे आम्ही कारागिरांना पैसे देतो,” दीपांशु सांगतो. भरतकामाचं कौशल्य किती यावरही मजुरी ठरते. फुलामागे ३ रुपये ते १६ रुपये असा दर असतो.
बलविंदर कौर अशाच एक कारागीर आहेत. दीपांशु त्यांच्यासोबत काम करतो. पतियाळाच्या मियाल गावाच्या रहिवासी असणाऱ्या बलविंदर तिथून ३० किलोमीटरवर असणाऱ्या त्रिपुरीच्या दीपांशुच्या दुकानात महिन्यातून ३-४ वेळा येऊन जातात. रेशीम, धागे आणि फुलकारीची नक्षी छापलेले कपडे भरण्यासाठी त्या घेऊन जातात.