२०२३ साली जून महिन्याच्या मध्यावर औरंगाबादमध्ये विभागीय आयुक्तांच्या कार्यालयासमोर अझीम शेख सलग पाच दिवस उपोषणाला बसला होता.
उन्हाच्या काहिलीतही २६ वर्षांच्या अजिमने पाणी सोडून पाच दिवस अन्नाला स्पर्शही केला नाही. पाच दिवस सलग उपोषण केल्यानंतर तो पूर्ण गळून गेला होता, अंगात कसलीच ताकद उरली नव्हती, गरगरत होतं. सरळ रेषेत चालणंही त्याच्यासाठी अवघड झालं होतं.
त्याच्यावर ही वेळ का आली? त्याला पोलिसात एक तक्रार नोंदवायची होती. बस्स. पण इथून ८० किलोमीटरवर असलेल्या शेजारच्या जालना जिल्ह्यातल्या त्याच्या गावी पोलिस तक्रार लिहूनच घ्यायला तयार नव्हते.
१९ मे २०२३ रोजी त्याच्याच गावातल्या मराठा जातीच्या सोनावणे कुटुंबातले काही लोक रात्री ११ वाजण्याच्या सुमारास अजिमच्या घरात घुसले आणि त्याच्या घरच्यांना काठ्यांनी आणि दगडानी मारहाण केली. त्याचा भाऊ आणि आई-वडील या हल्ल्यात जखमी झाले. “माझी आई म्हातारी आहे. तिला दवाखान्यात दाखल करावं लागतं. बेकार हल्ला केला त्यांनी,” तो सांगतो. “आमच्या घरातून रोकड आणि दागिने मिळून दीड लाखाचा ऐवज चोरलाय त्यांनी.”
नीतीन सोनवणे देखील या हल्ल्यात सामील होता असं अजिमचं म्हणणं आहे. त्याच्याशी संपर्क साधला असता त्याने या विषयावर काहीही बोलायला नकार दिला आणि म्हणाला, “मला या प्रकाराबद्दल काहीही माहित नाही.”
जालन्याच्या भोकरदन तालुक्यातल्या पळसखेडा मुर्तड गावापासून दोन किलोमीटर अंतरावर अजिमची आठ एकर शेती आहे आणि तिथेच रानात त्याचं घर आहे.
“आडवाटेला आहे आणि रात्री एकदम सुनसान असतंय,” तो सांगतो. “मदतीसाठी बोलावणार तर कुणाला?”







