देव कधीकधी त्याच्या भक्तांसोबत प्रवास करतो. म्हणजे माँ अंगारमोती तरी करते.
सुमारे ४५ वर्षांपूर्वी, देवी धाय-चनवर ह्या गावात देवीचे वास्तव्य होते. “माँ अंगारमोती या दोन नद्यांच्या म्हणजे महानदी आणि सुखा नदीच्या मधल्या जागेत वास्तव्य करायची”, असे ईश्वर नेताम म्हणतात. ५० वर्षे वय असलेले ईश्वर एक गोंड आदिवासी असून आदिवासी देवीचे मुख्य पुजारी किंवा बैगा आहेत.
स्थलांतरीत होऊनही, माँ अंगारमोतीची लोकप्रियता कमी झाली नाही. ५०० ते १००० भक्त गावांतून आणि इतर भागांतून अजूनही तिच्या मंदिराच्या ठिकाणी येतात. तिने तिचे मित्रही गमावले नाहीत. दरवर्षी दिवाळीनंतरच्या पहिल्या शुक्रवारी माँ अंगारमती शेजारच्या गावातील देवतांना वार्षिक उत्सवासाठी आमंत्रित करते. या जत्रेला देवतेचं नाव देण्यात आलं आहे. परंतु, हा गांगरेल मडई या नावानेही ओळखला जातो, इथे जवळच असलेल्या धरण आणि गावाच्या नावावरून ही ओळख पडली.
“आम्ही आमच्या पूर्वजांच्या काळापासून जवळपास प्रत्येक आदिवासी गावात ही मडई साजरी करत आलो आहोत”, असे विष्णू नेताम सांगतात. जे गोंड समाजाचे आदिवासी नेते आणि गांगरेल गावातील रहिवासी आहेत. तसेच या काळात दरवर्षी जत्रेचे आयोजन करणाऱ्या संघाचे सदस्यदेखील आहेत.
“मडई ही आमच्या पारंपरिक आदिवासी संस्कृतीचा भाग आहे”, ते पुढे म्हणाले. स्थानिक रहिवासी तसंच गावाबाहेरचे लोक या जत्रेला भेट देतात, चांगल्या कापणीबद्दल कृतज्ञता म्हणून देवांना फुले अर्पण करतात आणि पुढील वर्षासाठी आशीर्वाद मागतात. दरवर्षी जिल्ह्यात आयोजित केल्या जाणाऱ्या ५० मडईंपैकी ही एक मडई आहे. मध्य भारतातील राज्यात या जिल्ह्यात आयोजित केलेल्या मडईपेकी ही पहिली मडई आहे.
स्थानिक रहिवासी तसंच गावाबाहेरचे लोक या जत्रेला भेट देतात, चांगले पीक आले म्हणून देवांना फुले अर्पण करतात आणि पुढील वर्षासाठी आशीर्वाद मागतात.
स्थानिक रहिवासी तसंच गावाबाहेरचे लोक या जत्रेला भेट देतात, चांगले पीक आले म्हणून देवांना फुले अर्पण करतात आणि पुढील वर्षासाठी आशीर्वाद मागतात
१९७८ मध्ये महानदीवर सिंचनासाठी आणि भिलाई स्टील प्लांटला पाणीपुरवठा करण्यासाठी धरण बांधण्यात आले. तथापि, पंडित रवीशंकर धरण म्हणून ओळखल्या जाणाऱ्या या धरणाने देवता आणि तिची पूजा करणाऱ्या गावकऱ्यांना मात्र त्रास दिला.
या धरणाच्या बांधकामाने आणि या दरम्यान
आलेल्या पुराने चनवार गावातल्या रहिवाशांना त्यांची घरे सोडून दुसऱ्या भागात स्थलांतरीत
होण्यास भाग पाडले. सुमारे ५२-५४ गावे पाण्याखाली गेली आणि लोक विस्थापित झाले, ईश्वर
सांगतात.
आणि म्हणून ते त्यांच्या देवीसोबत निघून
गेले आणि धरणापासून १६ किलोमीटर अंतरावर असलेल्या धमतरी येथील गांगरेल गावात स्थायिक
झाले.
जवळपास अर्ध्या शतकानंतर, धरण एक लोकप्रिय
पर्यटन स्थळ बनले आहे. परंतु, अनेक विस्थापित ग्रामस्थ अजूनही सरकारकडून नुकसान भरपाई
मिळण्याच्या प्रतीक्षेत आहेत.
मडई इथे दिवसभर चालणारा उत्सव दुपारी सुरू होऊन संध्याकाळपर्यंत चालतो. देवीला धरणाजवळ ठेवले जाते आणि पहाटेपासूनच पुजकांचे आगमन सुरू होते. त्यांच्यापैकी काही लोक धरणावर फोटो किंवा सेल्फी काढण्यासाठी गर्दी करताना दिसतात.
मडईच्या जागेकडे जाणाऱ्या रस्त्यावर मिठाई आणि खाद्यपदार्थांची दुकाने आहेत. यातली काही दुकाने जुनी तर काही केवळ या उत्सवापुरती थाटलेली आहेत.
मडई सुरू होईपर्यंत जवळपास पाच ते सहा हजार माणसं आसपासच्या गावांतून आलेली आहेत. धमतरी शहरातील रहिवासी असलेल्या नीलेश रायचुरा यांनी राज्यभरात अनेकांना भेटी दिलेल्या आहेत. “मी कांकेर, नरहरपूर, नागरी-सिहावा, चारमा, पखंजूर आणि इतर अनेक ठिकाणांना भेटी दिल्या आहेत,” असे ते म्हणतात, “पण गांगरेल मडई वेगळं आहे.”
मडईतील उपासकांमध्ये गर्भधारणा न झालेल्या महिलांचा समावेश आहे. “मूल न होणाऱ्या महिला माँ अंगरमोतीचा आशीर्वाद घेण्यासाठी येतात. त्यांच्यापैकी अनेकांच्या इच्छा पूर्ण झाल्या आहेत,” असे आदिवासी नेते आणि कार्यकर्ते ईश्वर मांडवी सांगतात.
आम्ही इथे अशा काही महिलांना भेटलो ज्या रायपूर (८५ किमी), जंजगीर (२६५ किमी) आणि बेमेटारा (१३० किमी) येथून आलेल्या होत्या. देवीचा आशीर्वाद मिळावा म्हणून रांगेत उभ्या राहून दर्शनासाठी वाट पहात होत्या.
“माझ्या लग्नाला पाच वर्षे झालीयेत, पण मला मूलबाळ नाही. म्हणून मी देवीचा आशीर्वाद घेण्यासाठी आली आहे”, त्यांच्यापैकी एकजण सांगत होती. तिला तिचं नाव सांगायचं नव्हतं. इथे आलेल्या तीनशे ते चारशे महिला आज देवीसाठी उपवास करत होत्या.
इतर गावांतून आलेले उपासक त्यांचे डांग (देवतांचे प्रतीक असलेले ध्वज लावलेले बांबूचे खांब) आणि अंग (देवता) घेऊन ‘देव नाच’मध्ये (देवतांचे नृत्य) भाग घेण्यासाठी येतात. हे खांब लाकडी पालखी घेऊन ते परिसरात फिरतील आणि भक्त देवतांचा आशीर्वाद घेतील.
नीलेश म्हणतात, “या मडईमध्ये मी आदिवासी संस्कृती आणि आदिवासी जीवन जवळून पाहू शकतो.”