अनिल नारकंडेंनी नेहमीप्रमाणे लग्नाचा मांडव वगैरे टाकला. पुढ्यात काय वाढून ठेवलंय ते काही त्यांना माहित नव्हतं.
भंडाऱ्याच्या अलेसुर गावातल्या ३६ वर्षीय अनिलभाऊने शेजारच्या गावात एका लग्नासाठी मोठा पिवळा शामियाना उभारला होता. शेती करणारा अनिल भाऊ सणासमारंभांना सजावट आणि डीजे, साउंड वगैरे पुरवतो. लग्नस्थळी अनेक प्लास्टिकच्या खुर्च्या लावल्या. वधुवरांसाठी खास गडद लाल रंगाचे सोफे. डीजेसाठी सगळी तयारी आणि रोषणाई तयार ठेवली.
नवऱ्या मुलाच्या साध्याशा विटामातीच्या घराला रंगरंगोटी झाली. नवरी मुलगी सातपुड्यापलिकडच्या मध्य प्रदेशातल्या सिवनीहून येणार होती.
“सगळाच इस्कोट झाला,” अनिलभाऊ सांगतो. या वर्षीच्या लगीनसराईला अशी धडाक्यात सुरुवात झाली म्हणून तो भलताच खूश होता. लग्न लागण्याआधी २७ वर्षांचा नवरा मुलगाच पळून गेला.
“त्याने घरच्यांना फोन केला आणि म्हणाला, हे लग्न आताच्या आता थांबवा नाही तर मी औषध पिऊन घेईन,” अनिल भाऊ सांगतो. “त्याचं दुसऱ्या कुणावर तरी प्रेम आहे म्हणे.”
लग्न मोडलं पण तोपर्यंत नवरी मुलगी आणि तिथलं बिऱ्हाड इथे येऊन पोचलं होतं. आनंदाचा सोहळा होणार होता तिथे आता मुलाकडच्यांसाठी फारच लाजिरवाणी परिस्थिती निर्माण झाली होती.
नवऱ्या मुलाच्या वडलांवर आभाळच कोसळलं होतं. त्यांनी अनिलला सांगितलं की त्याचे पैसे देणं काही त्यांच्याच्याने होणार नाही.








