श्यामलाल कश्यपच्या मृतदेहावरून त्याच्या कुटुंबाला अक्षरशः वेठीला धरण्यात आलं होतं.
मजुरी करणार्या अर्राकोटच्या या वीस वर्षाच्या तरुणाने मे २०२३ मध्ये आपलं आयुष्य संपवलं. मागे राहिली त्याची गर्भार पत्नी, वीस वर्षाची मार्था.
‘‘आत्महत्या होती ती. त्याचा मृतदेह सगळ्यात जवळच्या, म्हणजे गावापासून पंधरा किलोमीटरवर असलेल्या इस्पितळात नेला होता. श्यामलालचा शवविच्छेदन अहवाल हा अपघात किंवा घातपात नसल्याचं सांगत होता.’’ श्यामलालची वहिनी, तिशीची सुकमिती कश्यप सांगते. अर्राकोट गावात असलेल्या माळरानावर एका टोकाला आपल्या अंधार्या झोपडीबाहेर ती बसली होती.
त्या दिवशी श्यामलालच्या घरापाशी अंत्यसंस्काराची तयारी सुरू होती. तरुण श्यामलालच्या मृत्यूच्या धक्क्यातून कुटुंब अद्याप सावरलेलं नव्हतं. सरकारी इस्पितळातून मृतदेह ताब्यात घेऊन गावात नेण्यासाठी त्याचे दोन नातेवाईक इस्पितळाबाहेर थांबले होते.
त्याच क्षणी काही स्थानिक लोक आले आणि श्यामलालच्या कुटुंबियांना त्यांनी सांगितलं की तुम्ही धर्मांतर केलंत, हिंदू धर्म स्वीकारलात, तरच श्यामलालचे अंत्यसंस्कार तुम्हाला गावात करता येतील.
छत्तीसगढच्या बस्तर जिल्ह्यात श्यामलालच्या कुटुंबाची तीन एकर जमीन आहे. तिथे ते भातशेती करतात, पण तो घरच्यापुरता. या संपूर्ण कुटुंबाची मुख्य रोजीरोटी आहे मजुरी. श्यामलाल प्रचंड राबायचा आणि या कामाची त्याला महिन्याला ३,००० रुपये मजुरी मिळायची.
‘‘या अशा दारिद्र्यात मूल वाढवण्याच्या जबाबदारीचं ओझं त्याला असह्य झालं असेल का?... त्याने काही चिठ्ठीही नाही लिहून ठेवली,’’ सुकमिती आपलं मन मोकळं करते.








