“यह बताना मुश्किल होगा कि कौन हिंदू और कौन मुसलमान.”
मोहम्मद शब्बीर कुरेशी म्हणतात. अडुसष्ट वर्षीय कुरेशींचा इशारा स्वतः आणि त्यांचे शेजारी अजय सैनी, वय ५२ यांच्याकडे असतो. हे दोघं अयोध्येचे रहिवासी आहेत. रामकोटच्या दुराही कुआँ परिसरात राहणाऱ्या दोघांनी गेली ४० आपली मैत्री जपून ठेवली आहे.
सैनी आणि कुरेशी कुटुंबातलं सख्य अगदी रोजच्या गोष्टींमधून कळून येतं. अजय सैनी सांगतात, “मी असंच कधी तरी कामावर गेलो होतो. मला फोन आला की माझी मुलगी आजारी पडलीये. मी घरी पोचतो तर माझ्या बायकोने सांगितली की कुरेशींनी माझ्या मुलीला हॉस्पिटलमध्ये दाखल केलं होतं. तितकंच नाही, औषधं देखील विकत घेतली होती.”
दोघं घराच्या परसात बसले होते. आजूबाजूला म्हशी, शेरडं आणि अर्धा एक डझन कोंबड्या हिंडत होत्या. दोन्ही कुटुंबातली बच्चे कंपनी खेळत, गप्पा मारत इथून तिथे हुंदडत होती.
जानेवारी २०२४ सुरू आहे. राम मंदिराच्या भव्य दिव्य उद्घाटनाची तयारी अगदी जोरात सुरू आहे. मंदिराचं कुंपण आणि त्यांच्या घरामध्ये नवे, जाडजूड, दुहेरी बॅरिकेड लावण्यात आले आहेत.
ऐंशीच्या दशकात सैनींचं कुटुंब कुरेशींच्या शेजारी रहायला आलं. तेव्हा सैनी अगदी तरुण होते. सैनी तेव्हा बाबरी मशिदीच्या आवारात असलेल्या रामाच्या मूर्तीचं दर्शन घ्यायला जाणाऱ्या भाविकांना एक रुपयाचे फुलांचे हार विकायचे.
कुरेशी परंपरेने खाटिक. अयोध्या शहाराच्या वेशीवर त्यांचं मटणाचं दुकान होतं. १९९२ साली दंगे झाले आणि त्यामध्ये त्यांचं घर पाडण्यात आलं. त्यानंतर त्यांनी वेल्डिंगचा धंदा सुरू केला.
















