देवेंदर सिंग भांगू हा सोशिओलॉजीचा विद्यार्थी पंजाबचा रहिवासी आहे. १३ फेब्रुवारीला तो आपल्या मित्रांबरोबर शंभू बॉर्डरवर गेला. शेतकऱ्यांच्या आंदोलनात भाग घ्यायला. दुपारी दोन वाजता जेव्हा ते सगळे तिथे पोहोचले तेव्हा हरयाणा पोलीस आणि शीघ्र कृती दलाने कारवाईला सुरुवात केली होती.
देवेंदरचा मित्र तरणवीर सिंग सांगतो, “आम्ही एका गटात शांतपणे उभे असताना एक रबरी बुलेट येऊन त्याच्या डाव्या डोळ्याला लागली. देवेंदर लगेच खाली कोसळला. आम्ही त्याला उचलायला जात होतो, तेवढ्यात पोलिसांनी आमच्यावर तीन ते चार अश्रुधुराची नळकांडी फोडली.” हे सगळं आंदोलनाच्या ठिकाणी पोहोचल्यावर अर्ध्या तासातच, तीन वाजताच्या सुमाराला ही घटना घडली.
१३ फेब्रुवारी २०२४ या दिवशी शेतकऱ्यांनी शांतपणे मोर्चा करून दिल्लीकडे जायला सुरवात केली. पिकाच्या किमान आधारभूत किमतीची (मिनिमम सपोर्ट प्राईस) कायदेशीर हमी ही त्यांची एक मागणी होती. पोलीस आणि शीघ्र कृती दलाने त्यांना पंजाब आणि हरयाणामधल्या शंभू सीमेवर अडवलं. त्यांनी पुढे जाऊ नये म्हणून वाटेत बॅरिकेड उभे केले होते. जेव्हा शेतकऱ्यांनी पुढे कूच करायचा प्रयत्न केला तेव्हा त्यांच्यावर अश्रुधुराच्या नळकांड्या आणि रबरी छर्ऱ्यांचा मारा करण्यात आला. (वाचा ‘शंभू सीमेवर मला कैदेत टाकल्यासारखं वाटतंय’)
अश्रुधुराचा भयानक वास येत असूनही देवेंदरचे मित्र त्याला उचलायला वेगाने पुढे झाले. त्याच्या डोळ्यातून खूप रक्त वहात होतं. त्यांनी त्या बाविशीच्या तरुणाला तिथून २० किलोमीटर वर असलेल्या बाणूर इथल्या सरकारी इस्पितळात अँब्युलन्समधून नेलं. तिथल्या डॉक्टरांनी त्याला चंदीगडच्या सरकारी मेडिकल कॉलेज आणि हॉस्पिटलमधे पाठवलं. १५ फेब्रुवारीला त्याच्या डोळ्याचं ऑपेरेशन झालं. त्याच्या डाव्या डोळ्याला दृष्टी येण्याची शक्यता फारच कमी आहे असे डॉक्टर म्हणाले.
देवेंदरचे वडील मनजित सिंग म्हणतात की त्यांच्या मुलाने परदेशी जाण्याची संधी आली असूनही तिथे न जायचे ठरवलं होतं. इथे राहून तो पोलिसात भरती होण्याची तयारी करत होता.






















