‘विराट कोहली’. सगळ्यात लाडकं नाव. इथे डुंगरा छोटा गावात क्रिकेटच्या या लोकप्रिय खेळाडूचे अनेक चाहते आहेत.
हिवाळा सुरू आहे. सकाळचे १० वाजून गेलेत. अनेक छोटे क्रिकेटपटू खेळात मग्न आहेत. मक्याच्या हिरव्या गार शेतांच्या मधोमध असलेली मोकळी जागा म्हणजे क्रिकेटचं मैदान असेल असं पाहताक्षणी वाटणार पण नाही. पण बांसवाडाच्या सगळ्या क्रिकेटपटूंना या मैदानाचा अगदी कानाकोपरा माहीत आहे. मैदानाची सीमा असो किंवा खेळपट्टीच्या कडा.
क्रिकेटच्या चाहत्यांबरोबर गप्पा मारायच्या असल्या तर त्यांना नुसतं त्यांच्या आवडत्या खेळाडूबद्दल विचारायचं. बास. सुरुवात विराट कोहलीनेच होते. पण लगेचच इतर नावं यायला लागतात – रोहित शर्मा, जसप्रीत बुमरा, सूर्यकुमार यादव, मोहम्मद सिराज.
आणि अखेर १८ वर्षांचा शिवम लबाना म्हणतो, “मला स्मृती मंधाना आवडते.” भारताच्या महिला क्रिकेट संघाची माजी कर्णधार देशात भरपूर लोकप्रिय आहे. स्मृती सलामीची डावखुरी फलंदाज आहे.
पण इथे फक्त तिच्याबद्दल बोलणं सुरू नाहीये, बरं का. आम्हाला जराशाने लक्षात येतं.
क्रिकेटच्या क्षितिजावरच्या या उगवत्या भावी गोलंदाज आणि फलंदाजांमध्ये एकच मुलगी अगदी उठून दिसतीये. फक्त नऊ वर्षांची असणारी हिताक्षी राहुल हरकिशी क्रिकेटचा सगळा जामानिमा म्हणजे पांढरे बूट, बॅटिंग पॅड, मांडी आणि कोपराला संरक्षक पट्ट्या घातलेली ही चिमुकली खेळाडू खेळायला सज्ज आहे.










