“बजेट वगैरे ऑफिसर लोकांसाठी असतं,” अली मोहम्मद लोन म्हणतात. म्हणजेच मध्यमवर्गीय ‘सरकारी’ लोक किंवा कर्मचारी असं त्यांना म्हणायचंय. याचा एक अर्थ हाही होतो की हे बजेट त्यांच्यासारख्या लोकांसाठी नाही.
“मागच्या वर्षी २०२४ मध्ये मी पिठाचं ५० किलोचं पोचं १,४०० रुपयांना घेत होतो. आज त्याची किंमत २,२०० झालीये,” ५२ वर्षीय लोन सांगतात. तंगमर्ग तालुक्याच्या महीन गावी आम्ही बोलत होतो. “या बजेटमध्ये महागाई कमी करण्यासाठी काही असेल तर मला सांगा. नाही तर मी म्हणालो तसं, हे बजेट फक्त ऑफिसर लोकांसाठीच आहे.”
श्रीनगरहून ४५ किलोमीटरवर महीन गाव आहे. तंगमर्ग आणि द्रांग या दोन पर्यटनस्थळांच्या मधोमध. इथली २५० कुटुंबं बहुतकरुन पर्यटनावरच अवलंबून आहेत. खेचरं, लाकडाचे गाडे आणि गाइड. इथली हवा थंड असल्याने इथे जास्त करून मक्याची शेती होते.






