“आमच्या गावात मुली बिलकुल सुरक्षित नाहीयेत. रात्री ८ किंवा ९ वाजल्यानंतर त्या घराच्या बाहेर जातच नाहीत,” शुक्ला घोष सांगतात. पश्चिम मेदिनीपूर जिल्ह्यातल्या कुआँपूर गावातली गोष्ट. “मुलींना भीती असते. तरीही त्या विरोध करतात, आपली नाराजी जाहीर करतात.”
कुआँपूरच्या शुक्ला घोष आणि काही मुली कोलकाताच्या रस्त्यांवरती आपलं म्हणणं मांडत होत्या. आर. जी. कर हॉस्पिटलमध्ये काम करणाऱ्या एका तरुण डॉक्टर विद्यार्थिनीवर बलात्कार करून तिची निर्घृण हत्या करण्यात आली. त्या घटनेबद्दलचा संताप व्यक्त करण्यासाठी पश्चिम बंगालच्या अनेक गावांमधून हजारो शेतकरी, शेतमजूर आणि कष्टकरी मोठ्या संख्य़ेने कोलकात्यात आले होते.
२१ सप्टेंबर २०२४ रोजी काढण्यात आलेला हा मोर्चा कॉलेज स्ट्रीटवरून सुरू होऊन ३.५ किलोमीटर श्यामबाझारच्या दिशेने गेला.
मोर्चेकऱ्यांच्या प्रमुख मागण्या म्हणजे तात्काळ न्याय, दोषींना कठोरातली कठोर शिक्षा, कोलकाता पोलिस आयुक्तांचा राजीनामा (मोर्चेकरी डॉक्टरांनी देखील हीच मागणी केली होती आणि सरकारने ती मान्यही केली आहे) आणि आरोग्य व कुटुंब कल्याण, गृहखात्याची धुरा सांभाळणाऱ्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांचा राजीनामा.












