“आम्ही पहिल्यांदा हैद्राबादला आलो तेव्हा मिळेल ते काम केलं. आमच्या मुलीला चांगल शिक्षण देणं एवढंच आमच्या डोळ्यासमोर होतं,” गुडला मंगम्मा म्हणतात. मंगम्मा आणि त्यांचे पती गुडला कोटय्या यांनी २००० साली तेलंगणा राज्यातील महबुबनगर हे आपलं गाव सोडलं आणि ते राज्याची राजधानी हैद्राबादला आले. तेव्हा त्यांची मुलगी कल्पना नुकतीच जन्माला आली होती.
पण हैद्राबाद शहरात त्यांच्यासाठी कसलीही दयामाया नव्हती. कुठलही दुसरं काम मिळायचं नाही तेव्हा कोटय्या हाताने मैला साफ करून चार पैसे कमवायचे. त्यांनी सांडपाण्याचे नाले साफ करायला सुरुवात केली.
कोटय्या हे चकाली समाजातील (तेलंगणामध्ये इतर मागासवर्गीय प्रवर्गात समाविष्ट), पण हैद्राबादमधे त्यांच्या पारंपारिक व्यवसायाला म्हणावा तसा प्रतिसाद मिळाला नाही. "आमचा पूर्वापार व्यवसाय हा धोबीकामाचा, पण आता आम्हाला फार काम मिळत नाही. बहुतेकांकडे आजकाल वॉशिंग मशीन आणि इस्त्र्या आहेत," मंगम्मा काम न मिळाल्याचे कारण सांगतात.
कोटय्यांनी बांधकाम मजूर म्हणून देखील काम केलं. "बांधकामाच्या जागा कायम आमच्या घरापासून खूप दूर असायच्या आणि यायचा जायचा खर्च यांनाच करावा लागत होता. त्यापेक्षा नालेसफाईचे काम घराच्या जवळ मिळत असल्याने तेव्हा तेच जास्त सोयीस्कर वाटलं," मंगम्मा म्हणतात. त्यांच्या सांगण्यानुसार कोटय्या आठवड्यातून तीन वेळा तरी नालेसफाईचे काम करत व त्याचे त्यांना दिवसाचे २५० रुपये मिळत.
२०१६ च्या मे महिन्यातली ती सकाळ मंगम्माना आजही अगदी स्पष्ट आठवते. कोटय्या ११च्या सुमारास घराबाहेर पडले. गटार साफ करायला निघालोय, पाण्याची एक बादली बाहेर ठेव म्हणजे आल्यावर स्वच्छ होऊनच आत येत येईन असे त्यांनी जाताना सांगितले. "माझे पती काही महानगरपालिकेचे पूर्णवेळ सफाई कामगार नव्हते. आम्हाला पैश्याची निकड होती म्हणून ते ही कामं करायचे," मंगम्मा सांगतात.
त्या दिवशी मुकादमाने कोटय्यांना गटारसफाईसाठी सुलतान बझारमधे पाठवलं. जुन्या हैद्राबादचा हा परिसर गर्दी-गजबजाटाचा असल्याने तिथली गटारं बऱ्याच वेळा तुंबतात, आणि मग महानगपालिकेचा पाणीपुरवठा व सांडपाणी व्यवस्थापन विभाग मुकादमांमार्फत माणसं रोजंदारीवर घेऊन तुंबलेल्या गटारी साफ करून घेतो.
त्यादिवशी त्यांच्यासोबत सहकारी आणि मित्र असलेले बोंगू वीरा स्वामी सुद्धा होते. ते सफाईसाठी कोणत्याही सुरक्षा उपकरणाशिवाय गटारात खाली उतरले आणि काही मिनिटांतच बेशुद्ध होऊन कोसळले. ते बघताच सोबत काम करत असलेल्या
कोटय्यांनी देखील आपल्या मित्राला वाचवण्यासाठी अरुंद गटारात उडी
घेतली. थोड्या वेळाने ते देखील बेशुद्ध होऊन कोसळले.
दोघांनाही कंत्राटदाराने
मास्क, ग्लोव्हज किंवा
इतर कोणतीही सुरक्षा उपकरणे दिली नव्हती. या दोन मित्रांच्या मृत्यूने भारतात नाले
व गटार सफाई करताना झालेल्या मृत्यूंच्या यादीत अजून दोघांची भर पडली. भारत सरकारच्या सामाजिक न्याय विभागाच्या आकडेवारीनुसार १९९३ ते २०२२ या काळात “गटारं व मलटाक्या सफाईचं जीवघेणं काम करताना झालेल्या अपघातांमध्ये” ९७१ लोकांचा बळी गेला.
"मला त्या दोघांच्या शरीरातून गटारीच्या दुर्गंधीचा वास
तेव्हा ही येत होता," काही तासांनंतर त्या दोघांचे मृतदेह बघितलेल्या मंगम्माना आजही आठवतंय.
गुडला कोटय्या १ मे २०१६
रोजी मृत्युमुखी पडले. कामगार दिनी. जगभरात
कामगारांच्या हक्कांसाठी साजरा केला जाणारा हा
कामगार दिवस. ते आणि त्यांची पत्नी
दोघांना माहीतच नव्हतं, की हाताने नाले व मलटाक्या सफाईसाठी कामगारांना कामावर घेणं अवैध आहे. १९९३ पासूनच
हे कायद्याने प्रतिबंधित आहे आणि असं करणं हा ‘
हाताने मैला उचलणाऱ्या सफाई कर्मचाऱ्यांच्या
सेवायोजनेस प्रतिबंध आणि त्यांचे पुनर्वसन अधिनियम २०१३’
या कायद्यानुसार दखलपात्र गुन्हा आहे. या कायद्याचे पालन न केल्यास २
वर्षांपर्येंत कारावास, अथवा १ लाख रुपयांपर्येंतचा दंड, अथवा दोन्ही, अशी शिक्षा होऊ शकते.
"मला याची जरादेखील कल्पना नव्हती. यांच्या मृत्यूनंतरही मला माहित नव्हतं की कायद्याने आम्हाला नुकसान भरपाई मिळण्याचा हक्क आहे," मंगम्मा हतबल होऊन सांगतात.
इतकंच काय कोटय्यांचा मृत्यू कसा झाला हे कळल्यावर त्यांचे स्वतःचे नातेवाईक त्यांना वाळीत टाकतील हे त्यांच्या मनातही आलं नव्हतं. "ते माझी साधी विचारपूस करायला देखील आले नाहीत. माझे पती नालेसफाई करताना मेले हे कळल्यापासून त्यांनी माझ्याशी, माझ्या मुलांशी बोलणंच टाकलंय. या गोष्टीचं मला सर्वात जास्त दुःख आहे," मंगम्मा व्यथित होऊन सांगतात.
तेलुगू भाषेत सफाई कामे करणाऱ्यांना 'पाकी' असे संबोधतात. हा शब्द एखाद्या शिवीसारखा, अवमानकार म्हणून वापरला जातो. समाज वाळीत टाकेल म्हणून कि काय, पण वीरा स्वामींनी आपण नक्की काय काम करतो हे बायकोला सांगितलंच नव्हतं. "मला ते काय काम करतात याची माहितीच नव्हती," वीरा यांच्या पत्नी बोंगू भाग्यलक्ष्मी सांगतात. सतरा वर्षांचा त्यांचा संसार. आणि या संसाराच्या त्यांच्या आठवणी केवळ सुंदर आणि आनंदी आहेत. "मला त्यांचा कायम आधार होता.”
कोटय्यांसारखे वीरा स्वामी सुध्दा कामाच्या शोधात हैद्राबादमधे स्थलांतरित झाले होते. २००७ साली ते, त्यांची पत्नी भाग्यलक्ष्मी, दोन मुलं आणि आई राजेश्वरी असं सगळं कुटुंब आपलं मूळ गाव नागरकुरनूल सोडून इथे आलं. माधव आणि जगदीश आज अनुक्रमे १५ आणि ११ वर्षांचे आहेत. हे कुटुंब माडिगा आहे. तेलंगणामध्ये त्यांचा समावेश अनुसूचित जातीत केला जातो. "आमच्या जातीचं परंपरागत काम मला बिलकुल आवडत नाही. मला वाटलं होतं कि लग्नानंतर माझ्या पतींनी हे काम सोडलंय," भाग्यलक्ष्मी सांगतात.
कोटय्या आणि वीरा स्वामी गटार साफ करताना आतल्या विषारी वायूंमुळे मृत पावले. त्यांना त्या जीवघेण्या गटारीत सफाईसाठी पाठवणाऱ्या कंत्राटदाराने काही आठवड्यानंतर मंगम्मा आणि भाग्यलक्ष्मींना प्रत्येकी २ लाख रुपये दिले होते.
काही महिन्यानंतर हाताने मैला सफाई करण्याच्या प्रथेचा समूळ नायनाट करण्याच्या उद्देशाने काम करणाऱ्या ' सफाई कर्मचारी आंदोलन' या संघटनेच्या काही सदस्यांनी मंगम्माशी संपर्क केला आणि तुमचं कुटुंब १० लाख रुपयांपर्यंतच्या नुकसान भरपाईस पात्र असल्याचं सांगितलं. २०१४ च्या सर्वोच्च न्यायालयाच्या एका आदेशानुसार १९९३ पासून जे कामगार गटारं किंवा मलटाकी सफाई करताना मृत्यूमुखी पडले आहेत त्यांच्या कुटुंबांना राज्यांनी ही नुकसान भरपाई द्यायची आहे. याशिवाय शासनाच्या ‘सफाई कामगार पुनर्वसन व स्वयंरोजगार’ योजनेअंतर्गत सफाई कामगार आणि त्याचे कुटुंब यांना व्यवसायासाठी रोख मदत, १५ लाख रुपयांपर्यंतचे भांडवली अनुदान आणि व्यवसायाभिमुख तंत्रशिक्षण देणे ह्या तरतुदी समाविष्ट आहेत.
'सफाई कर्मचारी आंदोलन' संघटनेने तेलंगणा उच्च न्यायालयात याविषयीचा खटला दाखल केल्यानंतर मृत पावलेल्या ९ सफाई कामगारांच्या कुटुंबांना २०२० साली पूर्ण नुकसान भरपाई मिळाली. पण यात कोटय्या आणि वीरा स्वामी यांच्या कुटुंबांचा समावेश नव्हता. आम्ही वकिलांमार्फत या दोन कुटुंबांसाठी न्यायालयात लढतो आहोत असे संघटनेचे तेलंगणा राज्याध्यक्ष के सरस्वती यांनी सांगितले.
पण मंगम्मा या सगळ्यावर खूश नाहीत. "आम्हाला फसवलंय," त्या म्हणतात. "पहिल्यांदा नुकसान भरपाई मिळेल अशी आशा दाखवली. पण पदरी मात्र निराशाच पडली."
भाग्यलक्ष्मीही सांगतात, “खूप सामाजिक कार्यकर्ते, वकील, पत्रकार आम्हाला भेटायला यायचे. तेव्हा नुकसान भरपाई मिळेल असं वाटत होतं. पण पैसे मिळण्याची आता काहीच आशा नाही.”
*****
या वर्षी ऑक्टोबर महिन्याच्या शेवटी आम्ही जेव्हा मंगम्माना भेटायला जुन्या हैद्राबादच्या कोटी या भागात गेलो तेव्हा त्या एका रहिवासी इमारतीमधील आपल्या खोलीसमोरच्या जागेत उतारावर कत्तेला पोय्यी म्हणजेच तात्पुरती चूल उभारत होत्या. त्यांच्याकडे सहा विटा होत्या. २-२ विटा एकावर एक ठेवून त्यांनी त्रिकोणी चूल तयार केली. “कालच आमचा गॅस सिलेंडर संपला. नवीन पुढच्या महिन्याच्या सुरवातीला मिळणार. तोपर्यंत असंच या चुलीवर जेवण बनवायचं. नवरा गेल्यापासून आमचं आयुष्य हे असंच सुरू आहे,” त्या म्हणतात.
कोटय्यांना जाऊन आता ६ वर्षं झालीयेत. मंगम्मा आता वयाच्या चाळीशीत पोचल्यात. “पती गेल्यानंतर बराच काळ मी हरवल्यासारखी झाले होते. मन पार मोडून गेलं होतं.”
त्या आणि त्यांची दोन मुलं वमसी आणि अखिला एका बहुमजली इमारतीच्या तळमजल्यावर, जिन्याच्या शेजारी असलेल्या एका लहानश्या अंधाऱ्या खोलीत राहतात. २०२० च्या अखेरीस याच भागातल्या त्यांच्या जुन्या घराचं ५००० ते ७००० रुपये भाडे परवडेनासं झालं आणि ते या नवीन ठिकाणी रहायला आले. मंगम्मा या पाच मजली इमारतीच्या राखणदार म्हणून काम करतात शिवाय परिसराची साफसफाई देखील त्याच बघतात. मोबदला म्हणून त्यांना महिना ५,००० रुपये पगार मिळतो आणि कुटुंबाला राहायला तळमजल्यावरची ही खोली.
“ही जागा आम्हाला तिघांना कशीबशी पुरते,” त्या म्हणतात. सकाळच्या लख्ख सूर्यप्रकाशातही त्यांची खोली मात्र अंधारलेली आहे. रंग उडालेल्या भिंतीवर कोटय्यांचे फोटो लावलेले आहेत. आणि डोकं टेकेल अशा बुटक्या छतावर एक पंखा लटकलेला आहे. “मी माझ्या मोठ्या मुलीला, कल्पनाला इथे बोलवतच नाही. ती कशी राहील या घरात आणि कुठे बसेल?" मंगम्मा उद्वेगाने विचारतात.
२०२० साली कल्पना २० वर्षाची झाल्यावर मंगम्मानी तिचं लग्न करून द्यायचं ठरवलं. लग्नाच्या खर्चासाठी मुकादमाकडून मिळालेले २ लाख वापरले. शिवाय गोशामहालमधील एका सावकाराकडून महिना ३% व्याजावर कर्जही घेतलं.
लग्नामुळे मंगम्माचे कुटुंब कर्जबाजारी झाले आहे. “आमच्यावर सध्या ६ लाखांचं कर्ज आहे. माझा पगार घरखर्चातच संपून जातो,” त्या म्हणतात. इमारतीची साफसफाई आणि राखणदारी करतच त्या जुन्या हैद्राबादमधल्या गोशामहाल विधानसभा मतदारसंघाच्या ऑफिसमध्ये सफाईचं काम करतात. त्या कामाचा त्यांना १३,००० रुपये पगार मिळतो. यातला अर्धा पगार सावकाराचं कर्ज फेडण्यात जातो.
१७ वर्षाचा वामसी आणि १६ वर्षाची अखिला दोघेही जवळच्याच कॉलेजमध्ये शिकत आहेत. त्या दोघांची वर्षभराची फी ६०,०००/- इतकी आहे. वामसी शिक्षणाबरोबरच अर्धवेळ अकाउंटंट म्हणून आठवड्यातून तीन दिवस दुपारी ३ ते रात्री ९ काम करतो. त्याचे त्याला दिवसाचे १५० रुपये मिळतात. तो फी भरण्यासाठी ते वापरतो.
अखिलाला डॉक्टर व्हायचं आहे पण तिच्या आईला ते शक्य होईल असं वाटत नाही. "माझ्याकडे तिचे शिक्षण चालू ठेवण्यासाठी पैसे नाहीत. मी तर तिच्यासाठी नवीन कपडे पण घेऊ शकत नाही," मंगम्माच्या बोलण्यात हतबलता जाणवते.
भाग्यलक्ष्मीची मुलं लहान आहेत. त्यांच्या खाजगी शाळेची वर्षाची फी २५ हजारांच्या आसपास आहे. “दोघंही खूप हुशार आहेत. मला त्यांचा खूप अभिमान वाटतो,” त्या खूप खूश होऊन सांगतात.
भाग्यलक्ष्मीदेखील साफसफाईची कामं करतात. वीरा स्वामींच्या मृत्यूनंतर त्यांनी हे काम करायला सुरवात केली. त्याही त्यांची दोन मुलं आणि सासूसोबत कोटी भागातल्या एका निवासी इमारतीच्या तळमजल्यावरील एका खोलीत रहातात. खोलीत एका छोट्या टेबलावर अनेक वस्तूंच्या गराड्यात वीरा स्वामींचा फोटो ठेवलेला दिसतो. घरातल्या बऱ्याच वस्तू कोणीतरी दान केलेल्या किंवा दुसऱ्यांनी वापरुन फेकलेल्या... जागेअभावी घरातल्या काही गोष्टी बाहेरच वाहनतळाच्या शेजारी कोपऱ्यात ठेवलेल्या आहेत.
बाहेर ठेवलेल्या शिवणयंत्रावर कपड्यांचा आणि चादरींचा ढीग जमा झालाय. "मी २०१४ साली शिवण शिकायचे. त्यानंतर काही काळ मी शिवणकाम केलंय," भाग्यलक्ष्मी शिवणयंत्रामागचं कोडं उलगडतात. छोट्याश्या खोलीत सगळ्यांना झोपायला जागा नसल्याने दोन मुलं आत, तर भाग्यलक्ष्मी आणि सासू राजेश्वरी बाहेर प्लास्टिकच्या चटईवर झोपतात. स्वयंपाकघर इमारतीच्या दुसऱ्या बाजूला आहे आणि अगदीच लहान अंधारलेलं आहे. प्लास्टिकच्या कागदाने जरासा आडोसा तयार केलेला आहे.
इमारत परिसर साफसफाईचे भाग्यलक्ष्मींना महिना ५०००/- मिळतात. “मी मुलांच्या शिक्षणात कसूर राहू नये म्हणून मी इमारतीतील काही घरातसुद्धा काम करते,” त्या सांगतात. त्यांच्यावर साधारणपणे ४ लाखांचं कर्ज आहे. “ते फेडण्यासाठी दर महिना ८ हजार रुपये जातात.”
भाग्यलक्ष्मींचं कुटुंब इमारतीतलं सामूहिक स्वच्छतागृह वापरतं. तळमजल्यावरच्या दुकानांमधले कामगारही तेच वापरतात. “दिवसा संडास कधीतरीच मोकळा मिळतो, कारण पुरुषांची कायम ये-जा असते,” भाग्यलक्ष्मी बोलत असतात. ज्या दिवशी त्या स्वछतागृह सफाईसाठी आत जातात, "माझ्या मनात फकत ते गटार आणि माझ्या नवऱ्याचा जीव घेणारी ती विषारी दुर्गंधी असते," त्यांचा आवाज कातर होतो. "त्यांनी मला फक्त एकदा सांगायला हवं होतं की ते काय काम करतात. मी त्यांना हे मैला सफाईचं काम करूच दिलं नसतं...आणि आज ते जिवंत असते आणि मी अशी या तळघरात अडकून पडले नसते.”
या वार्तांकनासाठी
रंग दे
चे सहाय्य मिळाले आहे.