“मी माझ्या भीतीचं वर्णन कसं करु? भीतीपोटी ह्र्दय वेगानं धडधडत असतं. माझ्या डोक्यात कायम हाच विचार सुरु असतो की मी कधी एकदा परत मोकळ्या जागेत जाईन,” खेकडे आणि मासे पकडणाऱ्या ४१ वर्षीय पारुल हालदार त्यांच्या मनात गोठून राहिलेल्या भीतीबद्दल सांगतात. खेकडे पकडण्यासाठी खेकड्यांच्या शोधात सुंदरबनातील घनदाट खारफुटीच्या जंगलात जाताना मनात अशी भीती दाटून राहिलेली असते. खेकड्यांच्या हंगामात त्या त्यांची होडी घेऊन खारफुटीच्या जंगलातील नदी-नाले आणि खाड्यांमधून खाली जातात. लपून बसलेल्या वाघांची भीती सदोदित मनात असते.

लक्सबगान गावची रहिवासी असलेल्या पारुल, त्यांची लाकडी होडी घेऊन गरळ नदीत पोहचतात, तेव्हा एक तिरका दृष्टीक्षेप जाळीदार कुंपणाच्या पलीकडे टाकतात, जिथून पुढे मरिचीझापी जंगल आहे. हे जंगल साउथ २४ परगणा जिल्ह्याच्या गोसाबा तालुक्यात, त्यांच्या गावाशेजारी आहे. पारुलचे पती, ईशर रोनोजित हालदार सात वर्षांपूर्वी वाघाने केलेल्या हल्ल्यात मारले गेले.

होडीचं वल्हं त्या होडीच्या कडांवर टेकवतात. त्या आणि त्यांची ५६ वर्षांची आई, लोखी मंडल रखरखत्या उन्हात मासे धरायला पडतात. त्यांच्या मुलीप्रमाणेच लोखी सुद्धा मासेमारी करतात.

पारुल केवळ १३ वर्षांच्या होत्या, जेव्हा त्यांनी ईशर यांच्याशी लग्न केलं. त्यांच्या सासरकडचे गरीब कुटुंबातले होते, पण ते कधीच मासे किंवा खेकडे पकडण्यासाठी जंगलात गेले नव्हते. “मी त्यांना समजावलं/पटवून दिलं आणि जंगलात घेऊन आले,” त्यांना  आठवतं. “१७ वर्षानंतर त्यांचा याच जंगलात मृत्यू झाला.”

पारुल त्या क्षणी नि:शब्द होतात. ईशर तेव्हा ४५ वर्षांचे होते. आज आपल्या चार मुलींचा सांभाळ पारुल एकट्या करत आहेत.

घामाने चिंब झालेल्या पारुल आणि लोखी ते जड वल्हे पुन्हा ओढतात. या स्त्रिया खारफुटीच्या जंगलापासून सुरक्षित अंतर ठेवून होडी पुढे नेतात. या ठिकाणी सध्या मासेमारी बंद करण्यात आली आहे. खारफुटीचं जंगल मासेमारीसाठी एप्रिल ते जून, ३ महिने बंद केलं जातं. जेणेकरून माशांची संख्या वाढेल. हा काळ माशांच्या प्रजननाचा असतो. या दरम्यान, पारुल उदरनिर्वाहासाठी त्यांच्या तलावातील मासे विकतात.

Left: Parul Haldar recalls the death of her husband, Ishar Haldar.
PHOTO • Urvashi Sarkar
Right: A picture of Ishar Ronojit Haldar who was killed by a tiger in 2016
PHOTO • Urvashi Sarkar

डावीकडे: पारुल हालदार त्यांच्या पतीच्या – ईशर हालदारच्या मृत्यूबद्दल सांगताना. उजवीकडे: ईशर रोनोजित हालदार यांची तसबीर, जे सन २०१६ मध्ये वाघाने केलेल्या हल्ल्यात मारले गेले

Left: A cross netted fence, beyond which lie the Marichjhapi forests in South 24 Parganas district.
PHOTO • Urvashi Sarkar
Right: Parul (background) learned fishing from her mother and Lokhi (yellow sari foreground) learned it from her father
PHOTO • Urvashi Sarkar

डावीकडे: साउथ २४ परगणा जिल्ह्यात मरीचीझापी जंगलाच्या बाहेर लावलेलं जाळीदार कुंपण. उजवीकडे: पारुल (मागे) त्यांच्या आईकडून मासेमारी करायला शिकल्या आणि लोखी (पिवळी साडी नेसलेल्या) त्यांच्या वडिलांकडून

सुंदरबनातील बंगाली वाघांच्या हल्ल्यांच्या संदर्भात बोलताना पारुल म्हणतात, “बऱ्याच दुर्घटना घडत आहेत,” सुंदरबन हे जगातील एकमेव असं खारफुटीचं जंगल आहे, जिथं वाघ आढळतात. “कितीतरी अधिक संख्येने लोकं जंगलात शिरतायत आणि दुर्घटनांमध्ये वाढ होतीये. वन अधिकारी आम्हाला जंगलात जाण्याची परवानगी देत नाहीत त्याचं हेही एक कारण आहे.”

सुंदरबनात वाघांच्या हल्ल्यामुळे होणारे मृत्यू ही फार आगळी गोष्ट नाही, विशेषतः मासेमारीच्या काळात. सरकारी आकड्यांनुसार, २०१८ आणि जानेवारी २०२३ दरम्यान सुंदरबन टायगर रिझर्व्हमध्ये असे केवळ १२ मृत्यू झाले आहेत. पण प्रत्यक्षात हा आकडा अधिक असू शकतो, स्थानिक लोकं अशा हल्ल्यांच्या खूप जास्त घटनांबद्दल सांगत असतात.

सरकारच्या स्टेटस ऑफ़ टायगर्स रिपोर्ट (वाघांची सद्यस्थिती) या अहवालानुसार, सन २०१८ साली वाघांची संख्या ८८ होती, त्या तुलनेत २०२२ सालात सुंदरबन हे १०० वाघांचं घर होतं.

*****

पारुल २३ वर्षांच्या असल्यापासून मासेमारी करत आहेत, मासे पकडायला त्या त्यांच्या आईकडून शिकल्या आहेत.

लोखी केवळ ७ वर्षांच्या होत्या, तेव्हापासून त्यांनी मासे पकडायला सुरुवात केली. मासे पकडायला त्या त्यांच्या वडिलांबरोबर जंगलात जायच्या. त्यांचे पती, संतोष मोंडल, वय वर्षे ६४ यांचा २०१६ साली वाघाशी सामना झाला होता. त्याचा हल्ला परतवत कशीबशी सुटका करून ते जिवंत घरी परतले.

लोखी सांगतात, की “त्यांच्याकडे एक चाकू होता आणि ते वाघाशी लढले. पण त्या घटनेनंतर, त्यांचं धाडसच गळून गेलं आणि ते पुन्हा कधीच जंगलात गेले नाहीत. पण काहीही होवो, त्या थांबल्या नाहीत. पतीने जंगलात जाण्याचं थांबवल्यानंतर त्या त्यांची मुलगी आणि जावई ईशर यांच्याबरोबर जंगलात जाऊ लागल्या. काही काळानंतर त्यांच्या जावयाचा मृत्यू झाला.

त्या म्हणतात, की “माझ्यात एवढी हिंमत नाही, की मी दुसऱ्या कुणासोबत जंगलात जाईन. आणि मी पारुललाही एकटीला जाऊ देणार नाही. जोपर्यंत मी जिवंत आहे, तोपर्यंत मी तिची सोबत करेन. जंगलात केवळ रक्ताचं नातंच तुम्हाला वाचवू शकतं.”

As the number of crabs decrease, Parul and Lokhi have to venture deeper into the mangrove forests to find them
PHOTO • Urvashi Sarkar

खेकड्यांची संख्या कमी झाली, की पारुल आणि लोखी खेकड्यांच्या शोधात खारफुटीच्या जंगलाच्या आत आत जाण्याचं साहस करतात

Parul and Lokhi rowing across the River Garal
PHOTO • Urvashi Sarkar

पारुल आणि लोखी गरळ नदीत होडी चालवताना

ताळमेळ साधून दोघी जणी नाव चालवतात, एकमेकींशी काही बोलण्याचीही गरज भासत नाही. खेकडे पकडण्याचा हंगाम सुरु झाला की त्यांना वन विभागाकडून परवानगी पत्र घ्यावं लागतं आणि भाडे तत्वावर एक होडी घ्यावी लागते.

पारुल दिवसाला ५० रु. भाडे देतात. त्यांच्यासोबत एक तिसरी महिला सुद्धा असते. या तिघींना कमीत कमी १० दिवस तरी जंगलात राहावं लागतं. पारुल सांगतात, “आम्ही होडीत झोपतो, खातो आणि जेवणही तिथंच बनवतो. तांदूळ आणि डाळ, एका ड्रममध्ये पिण्याचं पाणी आणि छोटासा स्टोव्ह हे सामान सोबत घेतलेलं असतं. कोणत्याही परिस्थितीत आम्ही आमची होडी सोडून जात नाही, अगदी शौचासाठी सुद्धा नाही,” वाढत चाललेले वाघांचे हल्ले हे त्यामागचं मुख्य कारण आहे, असं त्या म्हणतात.

“अलीकडे वाघ होडी चढूनही येतात आणि माणसांना उचलून लांब घेऊन जातात. माझ्या नवऱ्यावरही होडीत असतानाच हल्ला झाला होता.”

जेव्हा मासे पकडण्यासाठी त्या दहा दिवस बाहेर राहतात, तेव्हा त्या भर पावसातही होडीतच राहतात. “होडीच्या एका कोनाड्यात खेकडे, दुसऱ्या कोनाड्यात माणसं आणि तिसऱ्या कोनाड्यात स्वयंपाक,” असं लोखी सांगतात.

"We do not leave the boat under any circumstances, not even to go to the toilet,” says Parul
PHOTO • Urvashi Sarkar

'कोणत्याही परिस्थितीत आम्ही आमची होडी सोडून जात नाही, अगदी शौचासाठी सुद्धा नाही,' पारुल सांगतात

Lokhi Mondal demonstrating how to unfurl fishing nets to catch crabs
PHOTO • Urvashi Sarkar

खेकडे पकडण्यासाठी माशाचं जाळं कसं फेकतात हे लोखी मंडोल दाखवतायत

पुरुष कायमच मासेमारीसाठी जंगलात जात असतातआणि त्यांच्याप्रमाणेच या महिलासुद्धा मासे पकडताना वाघाच्या हल्ल्याचा धोका पत्करतात. तरीही, सुंदरबनात वाघांच्या हल्ल्यामध्ये किती महिला मारल्या गेल्या आहेत याची कुठलीही आकडेवारी उपलब्ध नाही. वन्यजीव-मानव संघर्षाचं धगधगतं केंद्र म्हणजे सुंदरबन, असं म्हटलं जातं.

‘नॅशनल प्लॅटफॉर्म फ़ॉर स्मॉल स्केल फिश वर्कर्स’ चे संचालक प्रदीप चटर्जी म्हणतात, “जे मृत्यू नोंदले गेले आहेत, ते अधिककरून पुरुषांचे आहेत. महिलांवरही वाघांचे हल्ले झालेले आहेत, पण याबाबत माहिती संकलित केली गेलेली नाही. अर्थातच पुरुषांच्या तुलनेने कमी असल्या तरी स्त्रिया जंगलात जातात,” जंगलापासूनचं अंतर हेही एक महत्वाचं कारण आहे. ज्या महिलांची गावं जंगलापासून दूर वसलेली आहेत, त्या महिलांचा जंगलात न जाण्याकडे अधिक कल असतो. याव्यतिरिक्त, त्या तेव्हाच जंगलात जातात, जेव्हा इतर महिला सुद्धा जंगलात जायला निघतात.

लक्सबगान हे पारुल आणि लोखी यांचं गाव, २०११ च्या जनगणनेनुसार या गावाची लोकसंख्या ४,५०४ होती, ज्यामध्ये साधारण ४८ टक्के महिला होत्या. इथे प्रत्येक घरातील बाई गावापासून फक्त ५ किमी. अंतरावर असलेल्या मरीचझापी जंगलात जाते.

खेकड्यांना मिळणारी किंमत हे कारण देखील लोकांना हा धोका पत्करायला भाग पाडते. पारुल म्हणतात, “मासेविक्रीतून फार कमाई होत नाही. खेकड्यातून चांगलं उत्पन्न मिळतं. जेव्हा मी जंगलात जाते तेव्हा मी दिवसाला सुमारे ३०० ते ५०० रु. कमावते. मोठ्या खेकड्यांना ४०० ते ६०० रु. किलोचा भाव मिळतो आणि लहान खेकड्यांना ६० ते ८० रु. किलोचा. तीन महिला एकत्रित मिळून एका ट्रीपमध्ये २० ते ४० किलो खेकडे पकडू शकतात.

*****

वाघांच्या हल्ल्याव्यतिरिक्त, सुंदरबनात खेकडे पकडणाऱ्यांच्या समोर आणखी एक आव्हान असतं, ते म्हणजे कमी होत चाललेली खेकड्यांची संख्या. पारुल म्हणतात, “खेकडे पकडण्यासाठी आता कितीतरी लोकं जंगलात येऊ लागले आहेत. पूर्वी पुष्कळ खेकडे सापडायचे, आता खेकडे शोधायला जास्त कष्ट घ्यावे लागतात.”

जसजशी खेकड्यांची संख्या कमी होत चालली आहे, मासेमारी करणाऱ्या स्त्रियांना जंगलाच्या बरंचसं आत आत जावं लागतं आहे, ज्या ठिकाणी वाघांकडून हल्ला होण्याचा धोका वाढलेला असतो.

चटर्जी म्हणतात, या भागातील मासेमारी करणारी माणसं पुरेसे मासे आणि खेकडे शोधण्याच्या नादात, खारफुटीच्या घनदाट जंगलात आत आतमध्ये जाण्याचं साहस करतात, ज्याठिकाणी त्यांचा वाघांशी सामना होतो. चटर्जींच्या म्हणण्यानुसार, “वन अधिकारी केवळ वाघांच्या संरक्षण आणि संवर्धनावर जोर देत आहेत. पण जर मासेच जिवंत राहणार नसतील तर वाघही जिवंत राहणार नाहीत. जर नदीतील माशांची संख्या वाढली तर मानव आणि वन्यजीव संघर्ष कमी होऊ शकेल.”

नदीवरुन घरी परतल्यावर पारुल दुपारचं जेवण बनवण्यात गुंतून जातात. जेवणासाठी त्या तलावातून पकडून आणलेले मासे बनवतात, भात शिजवतात आणि आंब्याच्या चटणीत साखर घालतात.

त्या म्हणतात, त्यांना खेकडे खायला आवडत नाही. त्यांची आई, लोखीही आमच्या गप्पांमध्ये सामील होते. त्या म्हणतात, “मीच नाही तर माझी मुलगीही खेकडे खात नाही. कारण विचारलं, तर त्यावर त्या फार काही बोलत नाहीत. पण त्या “हल्ल्याचा” संदर्भ मात्र येतो. ईशरचा, त्यांच्या जावयाचा मृत्यू हे खेकडे धरतानाच झाला होता.

Parul at home in her village Luxbagan, South 24 Parganas. None of her daughters work in the forest
PHOTO • Urvashi Sarkar
Parul at home in her village Luxbagan, South 24 Parganas. None of her daughters work in the forest
PHOTO • Urvashi Sarkar

पारुल, दक्षिण २४ परगणामध्ये वसलेल्या गावात – लक्सबगानमध्ये त्यांच्या घरी. त्यांची एकही मुलगी जंगलात काम करत नाही

पारुल यांच्या चारही मुली – पुष्पिता, पारोमिता, पापिया आणि पापडी – यांच्यापैकी कुणीही जंगलात काम करत नाहीत. पुष्पिता आणि पापिया पश्चिम बंगालमध्येच इतर जिल्ह्यात लोकांच्या घरी काम करतात, पारोमिता बेंगलुरूत खाजगी कंपनीमध्ये काम करते. सगळ्यात धाकटी मुलगी पापडी १३ वर्षांची आहे, ती लक्सबगानच्या जवळच असणाऱ्या एका वसतिगृहात राहते, पण तिची तब्येत सध्या बरी नाही. पारुल सांगतात, “पापडीला टायफॉइड आणि मलेरिया झाला होता, तिच्या उपचारासाठी मला १३,००० रुपये खर्च करावे लागले. तिच्या होस्टेलसाठीही मी दरमहा २००० फी देत असते.

पारुलची स्वतःची तब्येतही बरी नाही. त्यांच्या छातीत दुखतं. यावर्षी त्या मासे किंवा खेकडे पकडायला जाऊ शकणार नाहीत. त्या आता त्यांच्या मुलीकडे – पारोमिता मिस्त्रीकडे बेंगलुरूमध्ये राहतायत.

त्या म्हणतात, “कोलकात्याच्या डॉक्टरांनी मला एमआरआय स्कॅन करायला सांगितलं, त्यासाठीचा खर्च ४०,००० रु. आहे. माझ्याकडे फारसे पैसे नाहीत.” त्यांनी बेंगलुरूत मुलगी आणि जावयासोबत राहण्याचा निर्णय घेतला. ते दोघेही खाजगी कंपन्यांमध्ये काम करतात. पारुलनी इथल्या डॉक्टरांचाही सल्ला घेतला, त्यांनी पारुलना सहा महिन्याची औषधे आणि आराम करायचा सल्ला दिला आहे.

त्या म्हणतात, “मला वाटतं की मला सतत भीती वाटते ना, खासकरुन जेव्हा मी जंगलात जाते, तेव्हा जी भीती वाटते त्याने माझ्या छातीत दुखायला लागलं आहे. माझ्या नवऱ्याला वाघाने मारून टाकलं आणि माझ्या वडलांवरही हल्ला केला. त्यामुळेच माझ्या छातीत दुखू लागलं आहे.”

Urvashi Sarkar

ଉର୍ବଶୀ ସରକାର ହେଉଛନ୍ତି ଜଣେ ସ୍ୱାଧୀନ ସମ୍ବାଦିକା ଓ ୨୦୧୬ ପରୀ ଫେଲୋ

ଏହାଙ୍କ ଲିଖିତ ଅନ୍ୟ ବିଷୟଗୁଡିକ ଉର୍ବଶୀ ସର୍କାର
Editor : Kavitha Iyer

କବିତା ଆୟାର ୨୦ ବର୍ଷ ଧରି ସାମ୍ବାଦିକତା କରି ଆସୁଛନ୍ତି। ସେ ‘ଲ୍ୟାଣ୍ଡସ୍କେପ୍ସ ଅଫ ଲସ୍ : ଦ ଷ୍ଟୋରୀ ଅପ୍ ଆନ ଇଣ୍ଡିଆ ଡ୍ରଟ୍’ (ହାର୍ପର କଲ୍ଲିନ୍ସ, ୨୦୨୧) ପୁସ୍ତକର ଲେଖିକା।

ଏହାଙ୍କ ଲିଖିତ ଅନ୍ୟ ବିଷୟଗୁଡିକ Kavitha Iyer
Translator : Prajakta Dhumal

Prajakta Dhumal is a communicator and facilitator in the field of gender equality, health and sexuality education. Based in the Purandar block of Pune district Prajakta writes, edits and translates.

ଏହାଙ୍କ ଲିଖିତ ଅନ୍ୟ ବିଷୟଗୁଡିକ Prajakta Dhumal