२०२२ साली विकत घेतलेला लाल ट्रॅक्टर म्हणजे गणेश शिंदेंचा जीव का प्राण. परभणी जिल्ह्याच्या खली गावातले गणेश भाऊ आपली दोन एकर शेती करतात. मात्र गेल्या काही वर्षांपासून कापसाचे भाव गडगडलेत त्यामुळे कमाईचा दुसरा काही स्रोत असणं गरजेचं होतं. म्हणून सरकारी बँकेतून ८ लाखांचं कर्ज काढून त्यांनी एक ट्रॅक्टर विकत घेतला.
“मी गंगाखेडून घरून ट्रॅक्टर घेऊन निघतो आणि जंक्शनला थांबतो,” ४४ वर्षीय गणेश भाऊ सांगतात. “जवळपास कुठे काही बांधकाम वगैरे सुरू असलं तर लोक माझा ट्रॅक्टर भाड्याने घेतात. रेती-वाळू वाहून न्याची असते. त्याचे दिवसाला ५०० ते ८०० रुपये मिळतात.” गंगाखेडला जाण्याआधी सकाळी एक दोन तास तरी शेतात काम असतं.
२०२५ चं केंद्र सरकारचं बजेट त्यांनी अगदी लक्षपूर्वक ऐकलंय. त्यात आपल्यासाठी काही असेल ही अपेक्षा नाही. पण गिऱ्हाइकाची वाट बघत असताना त्यांच्याकडे भरपूर वेळ असायचा. दुसरं काही काम नाही, म्हणून. “मनरेगासाठी तरतूद वाढवलेली नाही,” ते म्हणतात. गणेश भाऊ खली गावचे माजी सरपंच आहेत. त्यांचं म्हणणं आहे की प्रत्यक्षात गावात मनरेगाने काहीही फरक झालेला नाही. “रोजगार निर्माण व्हावा म्हणून पैशाचा वापर होतच नाही. सगळं फक्त कागदावर आहे.”



