प्रवाशांची घाईगर्दी, जे काही हाताला लागेल, दाराचं हँडल किंवा आतल्या एखाद्याचा हातही धरून गाडीत चढायची चढाओढ या सगळ्याच्या विपरीत अंधेरीच्या गाडीतली शांतता आणि स्तब्धता जास्तच जाणवते. जिथे पहावं तिथे लोकांची नुसती घुसळण सुरू आहे. कुणी अडखळतंय, कुणी रिकाम्या जागेसाठी धडपडतंय, कुणी कुणाला विनवतंय, कुणी हुज्जत घालतंय आणि काही जण बसलेल्यांनाच आणखी आत ढकलतायत.
याच प्रवाशांच्या लाटेतले एक आहेत ३१ वर्षांचे किशोन जोगी आणि त्यांची १० वर्षांची मुलगी भारती. मोरपंखी रंगाचा राजस्थानी घागरा आणि कुर्ता घातलेली. पश्चिम उपनगरीय रेल्वेची सात वाजताची मुंबई लोकल ही आजची त्यांची पाचवी गाडी.
गाडी वेग घेते, प्रवासी आपापल्या जागी स्थिरस्थावर होतात आणि किशन यांच्या सारंगीचे गोड सूर गाडीत पसरू लागतात.
“तेरी आँखे भूलभुलैय्या... बातें है भूल भुलैय्या...”
उजव्या हातातला बो तीनतारी वाद्यावर सफाईने फिरतो आणि मंजुळ स्वर हवेत पसरतात. वाद्याच्या दुसऱ्या टोकाला असलेला छोटासा घोषक छाती आणि डाव्या खांद्याच्या मधोमध धरलेला असतो. २०२२ साली आलेल्या भुलभुलैय्या-२ सिनेमातलं हे गाणं त्यांच्या स्वरात जास्तच गूढ भासू लागतं.
डब्यातले काही प्रवासी रोजच्या धोपट गप्पा सोडून काही काळ ही गोड गाणी लक्ष देऊन ऐकू लागतात. काही जण आपले फोन बाहेर काढून रेकॉर्डिंग सुरू करतात. काही जणांच्या चेहऱ्यावर हलकं हास्य उमटतं. पण बरेचसे लोक कानात इयरफोन घालून आपापल्या मोबाइल फोनमध्ये डोकं घालतात. छोटी भारती डब्यातल्या लोकांकडे पैसे मागते तेव्हाच त्यांचं लक्ष थोडं विचलित होतं.










