गुलमर्गच्या बर्फाच्छादित डोंगर उतारांवर स्लेजमध्ये पर्यटकांना बसवणं आणि वेगाने खाली आणणं हे अब्दुल वहाब ठोकर यांचं दर वर्षीचं काम. पण, १४ जानेवारी २०२४ रोजी आपल्या या ढकलगाडीवर बसलेल्या ठोकर यांच्या चेहऱ्यावर निराशा सोडून दुसरं काही नाही. समोरचं दृश्य धक्कादायक. बर्फच नसलेले ओकेबोके आणि मातकट डोंगर.
“चिला-इ-कालां [हिवाळ्याचं टोक] आहे
पण गुलमर्गमध्ये बर्फाचा पत्ता नाही,” ४३ वर्षीय ठोकर सांगतात. ते गेली २५ वर्षं
या बर्फात स्लेज ओढतायत आणि हा असा हिवाळा त्यांनी पहिल्यांदा पाहिलाय. “असंच सुरू
राहिलं तर आम्ही सगळे कर्जाच्या खाईत जाणार,” ते चिंतेने म्हणतात.
बर्फाने आच्छादलेल्या गुलमर्गच्या
पर्वतरांगा जगभरातल्या लाखो पर्यटकांनी फुलून गेलेल्या असतात. जम्मू काश्मीरच्या
बारामुल्ला जिल्ह्यातल्या गुलमर्गचं अर्थकारण आणि इथल्या २००० लोकांची उपजीविका या
पर्यटनावर विसंबून आहे. ठोकर यांच्यासारखे काही जण बाहेरून कामासाठी इथे येतात.
बारामुल्लाच्या कालनतारा गावाचे
रहिवासी असलेले ठोकर दररोज मिळेल त्या वाहनाने ३० किमी प्रवास करून गुलमर्गला
येतात, कामाच्या शोधात. “सध्या मला कुणी गिऱ्हाईक मिळालं तरी १५०-२०० च्या वर कमाई
होत नाही. कारण बर्फातली रपेट बंद झालीये,” ते सांगतात. “सध्या आम्ही पर्यटकांना फक्त
गोठलेल्या पाण्यावरून फिरवून आणतोय.”
“हिवाळ्यामध्ये गुलमर्ग म्हणजे एक जबरदस्त अनुभव असल्याचं जम्मू काश्मीरची
अधिकृत
वेबसाइट
म्हणते, बर्फाने आच्छादलेले हे डोंगर म्हणजे स्कीइंगसाठी नंदनवन. इथल्या डोंगरांचे
उतार नैसर्गिक आहेत, त्यामध्ये कसलाही फेरफार केलेला नाही आणि अगदी पट्टीच्या स्की
करणाऱ्यांनाही मोठं आव्हान देतात!’”
प्रत्यक्षात गुलमर्गमध्ये मात्र यातली एकही गोष्ट नजरेस पडणार नाही. या हिवाळ्यात वातावरणातल्या बदलांनी हिमालयाच्या कुशीतल्या लोकांच्या पोटावर पाय दिला आहे. पाऊसच पडला नाही तर त्याचे परिणाम किती दूरगामी असतात, परिस्थितिकी आणि अर्थकारण अशा सगळ्याच बाबतीत हे दिसतं. ज्या लोकांची उपजीविका जनावरं चारण्यावर अवलंबून आहे त्यांना बर्फाची गरज असते, कारण बर्फ पडून गेल्यानंतरच कुरणं हिरवीगार होतात. “जगभर वातावरणात बदल होतायत आणि त्याचा परिणाम काश्मीरवर देखील होतोय,” डॉ. मोहम्मद मुस्लिम सांगतात. ते काश्मीर विद्यापीठाच्या पर्यावरणशास्त्र विभागात शास्त्रज्ञ आहेत.
ठोकर यांच्याच कमाईचा विचार केला तर
पर्यटनाचा हंगाम बरा असतो तेव्हा त्यांना दिवसाला १२०० रुपये मिळू शकतात. आजकाल
मात्र रोजचा प्रवास आणि घरचा खर्च त्यांच्या कमाईहून जास्त झालाय. “इथे मला २००
रुपये मिळतायत, पण रोजचा खर्च मात्र ३०० च्या पुढे चाललाय,” ते हताश होऊन म्हणतात.
ते आणि त्यांच्या पत्नी आपलं घर आता आधीच्या बचतीतून चालवतायत. त्यांना दोन किशोरवयीन
मुलं आहेत.
या वर्षी बर्फ न पडण्याचं कारण
म्हणजे ‘वेस्टर्न
डिस्टर्बन्स’ किंवा पश्चिमी चक्रावातामध्ये झालेले
बदल, डॉ. मुस्लिम सांगतात. ही हवामानशास्त्रीय प्रक्रिया आहे. भूमध्य समुद्राच्या प्रांतात
वादळं सुरू होतात, ती हळू हळू पूर्वेकडे सरकतात. त्याला जोरदार वाऱ्यांचे प्रवाह कारणीभूत
ठरतात. आणि या घटनांचा परिणाम म्हणून पाकिस्तान आणि उत्तर भारतात पाऊस पडतो. या भागातली
शेती, पाणी आणि पर्यटन या सगळ्यांसाठीच पश्चिमी चक्रावात फार महत्त्वाची भूमिका
बजावतात.
१३ जानेवारी २०२४ रोजी राजधानी
श्रीनगरमध्ये कमाल तापमान १५ अंशापर्यंत वर गेलं होतं. गेल्या वीस वर्षांमधलं हे
सर्वात जास्त तापमान आहे. बाकी उत्तर भारत मात्र यात काळात पुरता गारठून गेला
होता.
“अजून तरी काश्मीरमध्ये कुठेही मोठी
बर्फवृष्टी झालेली नाही आणि हवा तर तापायला लागली आहे. १५ जानेवारी रोजी पहलगममध्ये
१४.१ अंश हे आजवरचं सर्वात जास्त तापमान नोंदवलं गेलं. या आधी २०१८ साली इथे १३.८
अंश तापमानाची नोंद झाली होती,” डी. मुख्तार अहमद सांगतात. ते श्रीनगरच्या वेधशाळेचे
संचालक आहेत.
सोनमर्ग आणि पहलगम इथेही मोठी
बर्फवृष्टी झालेली नाही. तापमानाचा पारा सगळीकडेच चढायला लागला आहे. हिवाळा उबदार
होत चालला आहे. अलिकडच्या काळात झालेल्या अनेक अभ्यासांमधून असं दिसून आलं आहे की
जगाच्या सरासरीपेक्षा हिमालयात तापमानवाढीचा दर जास्त आहे. वातावरण बदलांचा सर्वात
जास्त फटका बसत असलेल्या जागांमध्ये हिमालय समाविष्ट आहे.
स्थानिकांच्या भाषेत हिवाळ्यात हा प्रदेश ‘वाळवंट’ वाटू लागला आहे. आणि यामुळे पर्यटन उद्योगाचं कंबरडं मोडून गेलं आहे. हॉटेलचालक, वाटाडे, स्लेज ओढणारे, स्की-प्रशिक्षक आणि एटीव्ही (ऑल-टेरेन-व्हेइकल) चालक अशा अनेकांची परिस्थिती आज बिकट आहे.
“जानेवारी महिन्यातच बुकिंग कॅन्सल
व्हायला लागली आहेत. अशीच परिस्थिती राहिली तर त्यात भरच पडणार,” मुदसिर अहमद
सांगतो. गुलमर्गच्या खलील पॅलेस या हॉटेलमध्ये तो व्यवस्थापक आहे. “माझ्या अख्ख्या
आयुष्यात मी इतकी वाईट हवा पाहिली नाहीये,” २९ वर्षीय मुदसिर सांगतो. या वर्षी
आपलं जवळपास १५ लाखांचं नुकसान होणार असल्याचा त्याचा अंदाज आहे.
हिलटॉप हॉटेलमध्ये देखील लोक ठरल्यापेक्षा
कमी दिवस राहत असल्याचा अनुभव आहे. “बर्फ बघायला आलेल्यांची निराशाच होतीये ना. रोज
कुणी ना कुणी आपलं बुकिंग लवकर रद्द करतायत,” ३५ वर्षीय ऐजाझ भट सांगतात. हिलटॉप हॉटेलमध्ये
९० लोक कामाला आहेत आणि भट तिथे व्यवस्थापक आहेत. गुलमर्गमधल्या बहुतेक हॉटेलची
हीच गत आहे. “मागच्या वर्षी याच काळात किमान पाच ते सहा फूट बर्फ होता इथे. आणि या
वर्षी पहा, काही इंचसुद्धा नाहीये.”
जावेद अहमद रेशी स्की प्रशिक्षक आहेत. पर्यावरणात होणाऱ्या या बदलांसाठी ते
स्थानिकांनाच जबाबदार मानतात. “मी इथे येऊन गुलमर्गचं नुकसान केल्याबद्दल कुणा
पर्यटकाला बोल लावू शकत नाही,” ४१ वर्षीय रेशी सांगतात. “आम्ही आमच्या हाताने गुलमर्गची
ही दशा केली आहे.”
एटीव्ही चालक असलेला मुश्ताक अहमद भट
गेली दहा वर्षं ही वाहनं चालवतोय. हिवाळ्यात जेव्हा प्रचंड बर्फवृष्टी होते तेव्हा
एटीव्हीशिवाय पर्याय नसतो. एक ते दीड तासाच्या एका सफरीसाठी चालक दीड हजार रुपये आकारू
शकतात.
मुश्ताक अहमद भट यांच्या मते देखील
या भागात वाहनांची संख्या वाढत गेल्याने त्याचा परिणाम इथल्या सूक्ष्म वातावरणावर
झाला आहे. “अधिकाऱ्यांनी ‘गुलमर्ग बोल’ मध्ये (हवेतून पाहता गुलमर्ग एखादा वाडगा असल्याचसारखं
दिसतं) वाहनांवर बंदी घालायला पाहिजे. इथली हिरवाई संपत चाललीये आणि बर्फ पडत नाहीये
त्यामागेही हेच कारण आहे. आमच्या रोजच्या कमाईवर याचा प्रचंड परिणाम झाला आहे,” ४०
वर्षीय भट सांगतात.
गेल्या तीन दिवसांपासून त्यांच्यकडे
एकही पर्यटक आलेला नाही. मुश्ताक भाईंना आता घोर लागलाय कारण त्यांनी १० लाख खर्चून
त्यांची एटीव्ही गाडी विकत घेतलीये. गाडी घेतली तेव्हा येत्या काळात चांगला धंदा
होईल आणि आपण झटक्यात कर्ज फेडून टाकू असा विचार त्यांनी केला होता, “सध्या तर असं
वाटायला लागलंय की कर्जाची फेड काही व्हायची नाही. कुणास ठाऊन उन्हाळ्यात ही गाडीच
विकून टाकावी लागेल.”
भाड्याने कपडे आणि बूट देणारी दुकानंही
ओस पडली आहेत. फक्त इथले कर्मचारी तुम्हाला भेटतील. “आमचा सगळा धंदाच बर्फावर
अवलंबून आहे. गुलमर्गला येणाऱ्या पर्यटकांना आम्ही कोट आणि बर्फात घालायचे बूट
भाड्याने देतो. आजकाल दिवसाला ५००-१००० रुपये मिळणंही मुश्किल झालं आहे,” फयाझ
अहमद देदड सांगतो. तो टंगमर्गच्या कोट
अँड बूट स्टोअर नावाने प्रसिद्ध असलेल्या एका दुकानात काम करतो. हे गाव
गुलमर्गपासून अर्ध्या तासाच्या अंतरावर आहे.
देदड आणि इतर अकरा कर्मचारी बर्फ पडण्याची वाट पाहतायत. बर्फ पडेल आणि धंद्याला बरे दिवस येतील अशी आशा त्यांच्या मनात आहे. पर्यटन जोरात असतं तेव्हा २०० कोट किंवा जॅकेट नगाला २०० रुपयांप्रमाणे भाड्याने दिलं जायचं आणि त्याचे दिवसाला ४०,००० रुपये मिळत होते. सध्याच्या हवेत पर्यटकांना जाडजूड किंवा गरम कपड्यांची फारशी गरज भासत नाहीये.
बर्फवृष्टी झाली नाही तर त्याचा फटका
केवळ पर्यटनाच्या हंगामाला बसत नाही तर त्यानंतर वर्षभर त्याचे परिणाम जाणवणार
आहेत. “बर्फ पडलं नाही तर अख्ख्या खोऱ्यावर त्याचे परिणाम होतात. पिण्यासाठी,
शेतीसाठी पाणी नसणार. टंगमर्गच्या आसपास गावांमध्ये आतापासूनच पाण्याची टंचाई
जाणवू लागली आहे,” जावेद रेशी सांगतात.
हिवाळ्यात होणाऱ्या बर्फवृष्टीमुळे
हिमनद्या आणि सागरी हिमसाठ्यांना (हा पृथ्वीतलावरचे गोड्या पाण्याचा सर्वात मोठा
साठा मानला जातो) पाण्याचा पुरवठा होतो. अख्ख्या प्रदेशात पाण्याची परिस्थिती कशी
असणार हे या साठ्यांवर अवलंबून असतं. “हिमनद्यांमध्ये जर पाणी अपुरं असेल तर
आमच्या पाण्यावरच्या शेतीला फटका बसणार. उन्हाळ्यात काश्मीरच्या पर्वतरांगांमध्ये
वितळणारा बर्फ आमचा पाण्याचा मुख्य स्रोत आहे,” डॉ. मुस्लिम सांगतात. “पण आज पर्वतांमध्ये
बर्फच नाहीये. त्याचा त्रास खोऱ्यातल्या लोकांनाही सहन करावा लागणार आहे.”
तिथे टंगमर्गच्या कपड्यांच्या
दुकानात देदड आणि त्यांच्या सहकाऱ्यांच्या चिंतांवर आता तरी कुणाकडे काही उत्तर
नाही. “आम्ही इथे १२ जण काम करतो आणि प्रत्येकाच्या घरी ३-४ जण आहेत.” त्यांना
सध्या दिवसाला कसेबसे १००० रुपये मिळतायत आणि ते सगळ्यांमध्ये समान वाटून घ्यावे
लागतात. “घरच्यांना कसं आणि काय खाऊ घालायचं?” देदड विचारतात. “ही हवा आमचा जीव घेणारे.”