तर, आपण या जंगलात ‘सैतानाचा कणा’ शोधायला आलोय. पिरंदाई (सिसस क्वाड्रॅंग्युलॅरिस) याच नावाने ओळखली जाते. रथी आणि मी शोधत असलेल्या (पिरंदाई नावाच्या) या चौकोनी देठ असलेल्या वेलीत अनेक उत्तम गुण असतात. या वेलीचं कोवळा कोंब विशिष्ट पद्धतीने खुडतात, स्वच्छ करतात आणि लाल तिखट, मीठ आणि तिळाच्या तेलात मुरवून ठेवतात. अशा प्रकारे जर लोणचं घालून ठेवलं तर ते खराब न होता अगदी वर्षभर टिकतं. आणि भाताला लावून खाताना तर अगदी चविष्ट लागतं.
जानेवारीतली दुपार. मऊ, उबदार. जंगलाकडे निघालेली आमची वाट एका प्राचीन, कोरड्याठाक खाडीच्या मार्गाने जाते. हिचं एक उद्बोधक तमिळ नाव आहे : एलायथम्मन ओडाई. याचा शब्दश: अर्थ – जिला सीमा नाहीत अशा देवीचा प्रवाह. हे ऐकलं की आपण रोमांचित होतो. आणि कधी खडकाळ तर कधी वालुकामय, कधी रुंद वाटेवरचा तर कधी ओल्या पाणथळीतला हा प्रवास मला आणखीही रोमांच देऊ करतो.
चालता चालता रथी मला गोष्टी सांगते. काही काल्पनिक आणि मजेशीर असतात - संत्री आणि फुलपाखरांबद्दलच्या. अनेक असतात खऱ्या आणि थरारक - नव्वदच्या दशकात रोटीचं राजकारण आणि जातीय संघर्ष भडकला होता त्यावेळच्या गोष्टी. तेव्हा रथी माध्यमिक शाळेत असते. “माझ्या कुटुंबाने थूथुकुडीला पलायन केलं...’’
दोन दशकांनंतर रथी आपल्या गावी परतली आहे - एक व्यावसायिक कथाकथनकार, ग्रंथालय सल्लागार आणि कठपुतळीचे कार्यक्रम करणाऱ्या कलाकार म्हणून! ती सावकाश बोलते; भरभर वाचते. “कोरोना महामारीच्या काळात सात महिन्यांत लहान मुलांसाठीची छोटी-मोठी २२ हजार पुस्तकं मी वाचली. एका टप्प्यावर तर असं झालं की माझा साहाय्यक रोज मला ‘वाचन थांबवा’ अशी अक्षरक्ष: विनवणी करायचा. नाहीतर मी (पुस्तकातले) संवादच बोलू लागले असते.’’ ती हसते.
तिचं हसणं म्हणजे खळखळाट. जिच्यावरून तिचं नाव ठेवलंय त्या भागीरथी नदीसारखं. पण तिला सगळे ओळखतात ते रथी याच नावाने. भागीरथीची जिथे गंगा होते त्या हिमालयाच्या दक्षिणेस सुमारे ३ हजार किलोमीटर ती राहते. तामिळ नाडूच्या तिरुनेलवेली जिल्ह्यातलं थेनकलम हे गाव डोंगर आणि खुरट्या झाडाझुडपांच्या जंगलांनी वेढलेलं आहे. गावातले सगळे रथीला ओळखतात, अगदी तशीच रथीचीही इथल्या डोंगरांशी आणि जंगलांशी ओळख आहे.
“तुम्ही जंगलात कशाला जाताय?’’ एक महिला मजूर विचारते. “आम्ही पिरंदाई शोधतोय,’’ रथी सांगते. “कोण आहे ती? तुझी मैत्रीण?’’ एक गुराखी विचारतो. “हो... हो,’’ रथी हलकंसं स्मित करते, मी हात उंचावते, हलवते आणि आम्ही पुढे चालू लागतो...

















