मोहेश्वर समुआ यांना पुरामुळे पहिल्यांदा स्थलांतर करावं लागलं ती घटना आजही स्पष्टपणे आठवते. आठवून आजही त्यांच्या अंगावर काटा येतो. ते सांगतात, 'मी अवघा पाच वर्षांचा होतो. “आमच्या घरांपैकी एक घर बघता बघता पुराच्या पाण्यात वाहून गेलं आणि मग आम्हाला सुद्धा जीव वाचवण्यासाठी बोटीत बसून तिथून पळ काढावा लागला; आम्ही बेटाजवळच्या जमिनीवर आसरा घेतला,’ वयाची साठी पार केलेले समुआ सांगतात.
माजुली या आसाममधल्या बेटावर राहणाऱ्या १.६ लाख रहिवाशांची गतही समुआंसारखीच झाली आहे. सततच्या पुराचा खूप विपरीत परिणाम त्यांच्या आयुष्यावर झाला आहे. आक्रसत जाणाऱ्या जमिनींमुळे त्यांचं अस्तित्वच आता धोक्यात आलं आहे. १९५६ साली बेटाचं क्षेत्रफळ अंदाजे १,२४५ चौरस किलोमीटर होतं. तेच २०१७ मध्ये ७०३ चौरस किलोमीटर इतकं कमी झालं आहे, असे जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाच्या अहवालात म्हटलं आहे.
"हे काही पूर्वीचं खरंखुरं सालमोरा गाव नाही. पूर्वी तर आम्ही तिथे राहायचो," पाण्याने वेढलेल्या एका छोट्याश्या टापूकडे बोट दाखवत समुआ सांगतात. "सालमोरा जवळजवळ ४३ वर्षांपूर्वीच ब्रह्मपुत्रेने गिळंकृत केलं." आत्ता आपण आहोत हे गाव ब्रह्मपुत्रा आणि तिची उपनदी, सुबानसिरी या नद्यांच्या पुरामुळे तयार झालेलं नवीन सालमोरा गाव. समुआ आपली पत्नी, मुलगी आणि मुलाच्या कुटुंबासह गेल्या १० वर्षांपासून नवीन सालमोरा मध्येच रहात आहेत.
त्यांचं नवीन घर सिमेंट आणि मातीपासून बनवलेलं अर्धे-पक्कं बांधकाम आहे. बाहेर बांधलेल्या शौचालयात जायचं तर प्रत्येकाला शिडीचा आधार घ्यावाच लागतो. “दरवर्षी, ब्रह्मपुत्रा आमची जमीन हळू हळू गिळत चाललीये," उद्विग्न चेहऱ्याने समुआ म्हणतात.








