अख्खी हयातभर
रात्र
ं
दिवस ही
होडी वल्हवतोय मी
किनारा
नजरेत नसताना.
अथांग
समुद्र
आणि
भरीला ही
वादळ
ं;
मी किनारा गाठेन
असं कुणीच सांगत नाही.
पण
तरीही...
हे वल्हं खाली ठेवणं
मला जमणार नाही...
कदापि जमणार नाही.
आणि खरोखरंच त्यांनी तसं केलं नाही! फुप्फुसाच्या कर्करोगासोबतची हरत चाललेली लढाई लढत असताना अगदी आयुष्याच्या शेवटच्या क्षणीही त्यांनी तसं केलं नाही.
वेदनादायी होतं ते. श्वास घेताना त्यांना अनेकदा त्रास व्हायचा. सांधे दुखायचे. वजनात घट, रक्तक्षय... एक ना अनेक प्रश्न होते. जास्त वेळ बसल्यावर प्रचंड थकवा येऊन त्यांना एकदम गळून गेल्यासारखं व्हायचं. असं असूनही दवाखान्यातल्या खोलीत आमची भेट घ्यायला, आपलं आयुष्य आणि कविता याबद्दल बोलायला त्यांनी आम्हाला होकार दिला.
आयुष्यावर जन्मापासूनच खडतरपणाचा शिक्का. दाहोदच्या इटावा गावातल्या गरीब भिल आदिवासी समाजातला जन्म आणि आधार कार्डानुसार १९६३ हे त्यांचं जन्मसाल.
वाजेसिंह हा चिस्काभाई आणि चतुराबेन यांचा थोरला मुलगा. बालपणीचे अनुभव सांगताना वाजेसिंह यांच्या बोलण्यात एकच शब्द पुन्हा पुन्हा येत राहतो; पालुपदासारखा – ‘दारिद्र्य’. मग नि:शब्द शांतता. डबडबलेले डोळे पुसत ते चेहरा दुसरीकडे वळवतात. पण डोळ्यांपुढे तरळत असलेल्या लहानपणीच्या प्रतिमा मात्र त्यांच्या नजरेच्या टप्प्यातून दूर जायचं नाकारतात - "पोट भरायपुरतेही पैसे नसायचे घरात कधी."
आयुष्य
संपेल कधीतरी
पण
नाही संपणार
ही रोजची
वणवण
.
भाकरी
ची त्रिज्या
आहे कितीतरी मोठी
पृथ्वी
च्या त्रिज्ये
पेक्षा.
नाही इतर कुणी
केवळ भुकेलेच समजू शकतात
एक
भाकर
म्हणजे काय ते,
अखेर तिथवर
च
घेऊन जातं
सगळं
तुम्हाला
.
दाहोदच्या नर्सिंग होममधे ‘पॅलिएटिव्ह केअर’ घेत असलेले वाजेसिंह दवाखान्यातल्या खाटेवर बसून आपल्या कविता वाचून दाखवतात
"मी खरंतर असं बोलणं बरोबर नाही, पण अभिमान वाटावा असे आमचे आईवडील नव्हते," वाजेसिंह कबूल करतात. आधीच नाजूक झालेली त्यांची अंगकाठी आता वेदना आणि लाजेच्या ओझ्याखाली आणखीनच कोमेजते, "मला कळतंय, असं बोलू नये मी. पण मला वाटतं, ते माझ्याकडून नकळत बोललं गेलं." दाहोदच्या कायझर मेडिकल नर्सिंग होममधल्या छोट्याशा खोलीच्या एका कोपऱ्यात पत्र्याच्या स्टुलावर बसलेल्या ८५ वर्षांच्या त्यांच्या म्हाताऱ्या आईला ऐकू येत नाही.
"माझ्या आई-वडिलांना मी फक्त आणि फक्त खस्ता खात असलेलं पाहिलं. आईवडील शेतात मजूर म्हणून राबायचे.’’ वाजेसिंहांच्या दोन बहिणी, चार भाऊ आणि आईवडील असे सगळे गावातल्या लहानशा विटा-मातीच्या एका खोलीच्या घरात राहत होते. वाजेसिंह इटावा सोडून रोजगाराच्या शोधात अहमदाबादला आले तेव्हा थलतेज चाळीत ते भाडेकरू म्हणून राहायचे. भिंतीतलं एखादं भगदाड म्हणावं अशी ती बारकीशी खोली होती. त्यांचे अगदी जीवाभावाचे मित्रही तिथे क्वचितच आले.
मी उभा राहिलो
तर छता
ला
आदळ
तो
अंग ताणून दिलं
तर
भिंतीला.
कस
ं
बस
ं
आयुष्य घालवल
ं मी
इथे,
बंदिस्त.
काय आलं माझ्या मदतीला?
सवय
माझ्या
आईच्या
गर्भाशयात
मुटकुळं करून पहुडण्याची.
वंचिततेची ही कहाणी केवळ वाजेसिंहांची नाही. कवीचं कुटुंब राहातं त्या भागात पूर्वीपासून चालत आलेली ही तशी नेहमीची आणि सर्वसामान्य गोष्ट आहे. दाहोद जिल्ह्यात अनुसूचित जमातीची सुमारे ७४ टक्के लोकसंख्या असून त्यातील ९० टक्के लोक कृषिक्षेत्राशी निगडित आहेत.
पण थोडीच, त्यातही उत्पादन कमी देणारी जमीन आणि मुख्यतः कोरडवाहू आणि दुष्काळाचं कायमचं सावट यामुळे शेतीतून पुरेसं उत्पन्न मिळत नाही. ताज्या ‘बहुआयामी दारिद्र्य सर्वेक्षणा’नुसार या भागातील दारिद्र्याचं प्रमाण राज्यात सर्वाधिक म्हणजे ३८.२७ टक्के इतकं आहे.
"घनी तकली करीन मोटा करियास ए लोकोने धंधा करी करीन," चतुराबेन आईच्या नात्याने आपल्या आयुष्याबद्दल सांगतात, "मझुरी करिन, घरनु करिन, बिझानु करीन खवडाव्युस (खूप राबले मी. घरचं सगळं केलं, दुसऱ्यांच्या घरी काम केलं आणि कसंतरी करून त्यांच्यासाठी चार घास कमावले.)" कधी कधी पोरांनी फक्त ज्वारीच्या लापशीवर दिवस काढला, उपाशीपोटीच शाळेला गेली. पोरं वाढवणं कधीच सोपं नव्हतं, त्या सांगतात.
गुजरातमधल्या वंचित समाजाचा आवाज ठरलेल्या 'निर्धार' या मासिकाच्या २००९च्या अंकासाठी वाजेसिंह यांनी दोन भागाच्या लेखमालेतून एक स्मृतिचित्र रेखाटलं होतं. मोठ्या मनाच्या एका आदिवासी कुटुंबाची गोष्ट त्यात त्यांनी सांगितली होती. आपल्या घरी आसरा घेणाऱ्या लहान मुलांचं पोट भरावं म्हणून स्वत: उपाशी राहणाऱ्या जोखो दामोर आणि त्याच्या कुटुंबीयांची ती गोष्ट होती.
शाळेतून घरी येत असताना मुसळधार पावसात ही पाच जण अडकतात. जोखोंच्या घरी आसरा घेतात. त्या घटनेबद्दल सांगताना वाजेसिंह म्हणतात, "भादरवो हा आमच्यासाठी नेहमीच उपासमारीचा महिना असायचा." भादरवो हा साधारणपणे ग्रेगोरियन दिनदर्शिकेनुसार सप्टेंबर महिना. गुजरातमध्ये प्रचलित असलेल्या हिंदू विक्रम संवत दिनदर्शिकेत हा अकरावा महिना आहे.
"घरातलं साठवलेलं धान्य संपलेलं असायचं; शेतातलं अजून काढायला झालेलं नसायचं, आणि त्यामुळे शेत हिरवंगार असतानाही भुकेने तळमळणं हेच आमच्या नशीबात होतं. त्या महिन्यात अगदी मोजक्या घरांमध्येच दिवसातून दोनदा चूल पेटायची. आणि आदल्या वर्षी जर दुष्काळ पडला असेल तर मग अनेक कुटुंबांना उकडलेल्या किंवा भाजलेल्या मोहाच्या फळांवरच दिवस ढकलावे लागायचे. विदारक दारिद्र्याचा शाप घेऊनच आमचा समाज जन्मला.”
आत्तासारखं नव्हतं तेव्हा, वाजेसिंह सांगतात, त्या पिढीतले लोक आपलं घर आणि गाव सोडून मजुरीच्या शोधात खेडा, वडोदरा किंवा अहमदाबादला स्थलांतरित होण्यापेक्षा गळाठून जायचे आणि उपासमारीतून ओढवलेलं मरण पत्करायचे. आमच्या समाजात शिक्षणाला फारशी किंमत नव्हती.
"गुरं चारायला आम्ही गेलो काय किंवा शाळेत गेलो काय, सगळं सारखंच होतं. आमच्या आई-वडिलांना आणि शिक्षकांनाही एकच हवं होतं – मुलांनी लिहा-वाचायला शिकावं. बस्स! खूप सारं शिकून इथे कुणाला जग जिंकायचंय!"
वाजेसिंह मात्र स्वप्नं पाहायचे – वृक्षवेलींसोबत विहरण्याची, पक्ष्यांशी गुजगोष्टी करण्याची, पऱ्यांच्या पंखांवर बसून समुद्रपार जाण्याची. त्यांना आशा वाटायची - देवदेवता आपल्याला संकटांपासून वाचवतील, सत्य जिंकेल आणि असत्य हारेल- त्याचे आपण साक्षीदार असू, शांत-सौम्य-सहनशील लोकांच्या पाठीशी देव उभा राहील! त्यांना वाटायचं, असं सगळं घडेल; अगदी आजोबांनी सांगितलेल्या गोष्टीतल्यासारखं. मात्र प्रत्यक्ष आयुष्यात घडलं ते काल्पनिक कथांच्या अगदी उलट!
आणि तरी
सुद्धा
ती
आशा
जी
आजोबांनी
माझ्या बालपणी
पेर
ली
-
की
काहीतरी
अद्भुत घडणं
शक्य आहे
-
ती अढळ राहिली.
म्हणूनच जगतो
आहे
मी
हे अस
ह्य
जीवन
आजही,
दररोज
या आशेने
की
काहीतरी
विलक्षण
घडणार आहे.
याच आशेच्या जोरावर ते आयुष्यभर शिक्षणासाठी संघर्ष करत राहिले. कधीतरी अगदी अपघातानेच त्यांचं पाऊल शिक्षणाच्या वाटेवर पडलं, त्यानंतर मात्र त्यांनी शिक्षणाचा ध्यासच घेतला. सहा-सात किलोमीटर पायपीट करून शाळेत जाताना, वसतिगृहात राहताना, उपाशीपोटी झोपताना, अन्नासाठी दारोदार भटकताना, किंवा अगदी मुख्याध्यापकांसाठी दारूची बाटली विकत घेतानाही ते या ध्यासापासून ढळले नाहीत.
उच्च
माध्यमिक शाळा त्यांच्या गावात नव्हती, दाहोदला
जाण्यासाठी वाहतुकीची साधनं
नव्हती, दाहोदमध्ये राहायचं तर जागा
भाड्याने घेण्यासाठी पैसे नव्हते... तेव्हाही आपल्या शिक्षणात खंड नाही पडणार अशी खात्री त्यांनी मनोमन बाळगली होती. खर्च भागवण्यासाठी बांधकामावर राबावं लागलं, रेल्वेच्या प्लॅटफॉर्मवर रात्र काढावी लागली, दिवसरात्र भुकेलं राहावं लागलं, बोर्डाच्या
परीक्षेला जायच्या वेळी तयार होण्यासाठी
सार्वजनिक स्वच्छतागृहाचा वापर करावा लागला. तरीही त्यांनी शिक्षणाचा वसा टाकला
नाही.
आयुष्याच्या लढाईत पराभूत न होण्याचा निर्धार वाजेसिंह यांनी केला होता :
जगताना
अनेकदा
मला
घेरी
येते.
हृदया
चा ठोका चुकतो
आणि मी कोसळतो.
तरीही प्रत्येक वेळी
माझ्या आत
उमलतो
न मरण्याचा
चैतन्यदायी
निर्धार
आणि मी
माझ्या पाया
ं
वर उ
भा
राह
तो
पुन्हा पुन्हा
जगण्यासाठी
.
वाजेसिंह यांच्या आयुष्यात खरा आनंददायी शैक्षणिक टप्पा आला तो त्यांनी नवजीवन कला व वाणिज्य महाविद्यालयात गुजराती भाषेत बी.ए. करण्यासाठी प्रवेश घेतल्यानंतर. त्यांनी पदवी मिळवली आणि मग पदव्युत्तर शिक्षणासाठी नाव नोंदवलं. मात्र, पहिलं वर्ष झाल्यावर वाजेसिंह यांनी एम. ए. सोडलं आणि त्याऐवजी बी.एड. करायचं ठरवलं. पैशांची गरज होती आणि शिक्षक व्हायचं त्यांच्या मनात होतं.
नुकतं नुकतंच बी.एड. पदरात पडलेलं असतं. अशातच भांडणातल्या एका बेसावध क्षणी तरुण आदिवासी वाजेसिंह यांच्या जबड्यात आणि मानेत गोळी घुसते. होत्याचं नव्हतं होतं. आयुष्य आरपार बदलून जातं. आवाजावर आघात होतो. ७ वर्षं उपचार, १४ शस्त्रक्रिया, न पेलवेलसं कर्ज... असं सारं. वाजेसिंह त्यातून कधीच सावरत नाहीत.
दुहेरी धक्का होता तो. ज्या समाजाला स्वत:चा असा फारसा आवाज नाही, अशा समाजात जन्माला आलेला हा माणूस. अलौकिक देणगी लाभलेला. त्यावरच घाला. आता शिक्षक होण्याच्या स्वप्नाला तिलांजली द्यावी लागते. वाजेसिंह यांना ‘सरदार पटेल इन्स्टिट्यूट ऑफ इकॉनॉमिक अँड सोशल रिसर्च’मधल्या कंत्राटी कामावर जावं लागतं आणि पुढे मुद्रित शोधनाकडे वळावं लागतं. मुद्रित शोधनाचं काम करता करता त्यांना त्यांचं पहिलं प्रेम पुन्हा गवसतं... भाषेवरचं प्रेम! दोन दशकात लिहिलं गेलेलं बरंच काही त्यांना वाचायला मिळतं.
त्यांची निरीक्षणं काय सांगतात?
"मला भाषेबद्दल काय वाटतं ते मी तुम्हाला अगदी मोकळेपणाने सांगतो," ते उत्साहाने बोलू लागतात, “गुजराती साहित्यिक भाषेबाबत पूर्णत: बेफिकीर आहेत. शब्दांच्या वापराविषयी कवी किंचितही संवेदनशीलता दाखवत नाहीत. त्यातील बहुतेक जण फक्त गझला लिहितात आणि भावनांची काळजी वाहतात. तेच महत्त्वाचं आहे असं त्यांना वाटतं. शब्दबिब्द ठीक आहेत; ते आहेतच."
शब्दांविषयीचं हे सूक्ष्म आकलन, त्यांची रचना आणि विशिष्ट अनुभव व्यक्त करण्याची त्यांची ताकद हेच सारं वाजेसिंहांनी त्यांच्या स्वत:च्या कवितेत आणलं. दोन भागात संकलित करण्यात आलेल्या वाजेसिहांच्या कवितेची साहित्याच्या मुख्य प्रवाहाने ना दखल घेतली; ना ती कौतुकास पात्र मानली.
"मला वाटतं, लिहिण्यात अधिक सातत्य असणं गरजेचं आहे," कवींमध्ये आपली कधीच का गणना झाली नाही, याविषयीचा वाजेसिंहांचा तर्क हा असा. "मी एक-दोन कविता लिहिल्या तर कोण लक्ष देणारे त्याकडे? हे दोन्ही संग्रह अलीकडचे आहेत. प्रसिद्धीसाठी मी काही लिहिलं नाही. नियमित लिहिणंही मला जमलं नाही. मी फारशा गांभीर्यानं लिहीलं नाही, असंही मला वाटतं. भूकेची नाळ आमच्या आयुष्याशीच जोडली गेली होती, त्यामुळे मी त्याबद्दल लिहिलं.’’
“ती अगदी सहज आतून आलं होतं.’’ आमच्याशी बोलत असताना ते जणू दुसऱ्याच्या नजरेतून स्वत:कडे पाहात असतात – कुणालाही दोष देत नाहीत, जुन्या जखमांवरची खपली काढू पाहात नाहीत, आपल्या प्रकाशाचा वाट्यावर हक्क सांगू मागत नाहीत. पण त्यांना पूर्ण जाणीव असते की...
नक्कीच
कुणीतरी
गिळंकृत के
ला
आहे
आमचा
प्रकाशाचा वाटा,
कारण
सूर्याच्या
सोबतीने
आम्हीही
जा
ळत राहतो
स्वत:ला
आयुष्यभर
आणि तरीही
कधीच
काहीच
हो
त नाही
प्रकाशमान.
मुद्रित शोधक म्हणून व्यावसायिक आयुष्यात वाजेसिंहांना आलेल्या अनुभवांवर पूर्वग्रहदूषित, कौशल्यांचं अवमूल्यन करणाऱ्या आणि भेदभावावर आधारित वागणुकीचा अमीट ठसा उमटला. एकदा एका माध्यमसमूहात 'अ' श्रेणीसह प्रवेशपरीक्षा उत्तीर्ण होऊनही त्यांना 'क' श्रेणीने उत्तीर्ण झालेल्यांना दिल्या जाणाऱ्या वेतनश्रेणीपेक्षाही खूप खालच्या वेतनश्रेणीची ऑफर देण्यात आली. अस्वस्थ झालेल्या वाजेसिंहांनी त्या निर्णयाच्या मुळाशी असलेल्या तत्त्वांवरच प्रश्नचिन्ह उमटवलं आणि अखेरीस ती ऑफर नाकारली.
वाजेसिंहांनी अहमदाबादमधल्या वेगवेगळ्या माध्यम समूहांसोबत छोट्या छोट्या करारांवर काम केलं; अगदी फुटकळ मोबदल्यापोटी. किरीट परमार जेव्हा पहिल्यांदा वाजेसिंहांना भेटले तेव्हा ते ‘अभियान’साठी लिहीत होते. ते सांगतात, "२००८मध्ये जेव्हा मी ‘अभियान’मध्ये सामील झालो होतो, तेव्हा वाजेसिंह ‘संभाव’ मीडियामध्ये काम करत होते. तसं पाहता ते मुद्रित शोधक होते, पण आम्ही जर त्यांना एखादा लेख दिला तर ते (फक्त मुद्रित शोधन करणार नाहीत) कॉपी एडिट करतील हे पक्कं ठाऊक होतं आम्हाला.
त्या मजकुराच्या आशयावर काम करता करता ते त्याची रचना करत, त्याला आकार देत. भाषेवरही त्यांची कमालीची पकड होती. पण त्या माणसाला त्याच्या पात्रतेला साजेसं, हक्काचं असं जे जे म्हणून मिळायला हवं होतं ते कधीच मिळालं नाही.
'संभाव'मध्ये त्यांना महिन्याला जेमतेम सहा हजार रुपये मिळायचे. कुटुंबाचा सांभाळ करण्यासाठी, भावाबहिणींच्या शिक्षणासाठी आणि अहमदाबादमध्ये तगून राहण्यासाठी ती मिळकत कधीच पुरी पडली नाही. त्यांनी ‘इमेज पब्लिकेशन्स’सोबत फ्रीलान्स काम करायला सुरुवात केली. तासंतास ऑफिसमध्ये काम करून घरी आल्यानंतर पुन्हा घरूनही काम केलं.
"वडील गेल्यानंतर तो माझा भाऊ राहिला नाही; बाप झाला," वाजेसिंह यांचा ३७ वर्षीय धाकटा भाऊ मुकेश पारगी सांगतो. “अतिशय खडतर काळातही माझ्या शिक्षणाचा सगळा खर्च वाजेसिंहने उचलला. मला आठवतंय, तो थलतेजमधल्या एका मोडक्यातोडक्या लहानशा खोलीत राहत होता.’’
त्याच्या खोलीवरच्या पत्र्याच्या छतावर रात्रभर कुत्री हुंदडायची; आम्हाला ते ऐकू यायचं. पाच-सहा हजारांच्या कमाईतून तो स्वत:ची देखभालही नीट नाही करू शकायचा. पण आमच्या शिक्षणाचा खर्च भागवण्यासाठी त्याने इतर कामं केली. मी ते विसरू शकत नाही."
मुद्रित शोधनाची सेवा देणाऱ्या अहमदाबादमधल्या एका खासगी कंपनीत अलीकडच्या पाच-सहा वर्षांत वाजेसिंह रुजू झाले. "आयुष्यातला बराचसा काळ मी कंत्राटावर काम केलं. सगळ्यात अलीकडचं काम होतं ते ‘सिग्नेट इन्फोटेक’साठी केलेलं. गांधीजींच्या ‘नवजीवन प्रेस’चा त्यांच्याशी करार होता. त्यामुळे त्यांनी प्रकाशित केलेल्या पुस्तकांवर मी काम केलं. ‘नवजीवन’च्या आधी मी इतर प्रकाशनांसोबत काम केलं," वाजेसिंह सांगतात, “पण गुजरातमधल्या कोणत्याही प्रकाशनसंस्थेत मुद्रित शोधकाला कायमस्वरूपी स्थान नाही.’’
आपले मित्र आणि लेखक किरीट परमार यांच्याशी संवाद साधताना वाजेसिंह म्हणतात, "गुजराती भाषेत
चांगले मुद्रित शोधक मिळणं इतकं अवघड का आहे; याचं एक
कारण म्हणजे तुटपुंजं मानधन. मुद्रित शोधक हा भाषेचं पालकत्व निभावतो. तो भाषेचा
संरक्षक असतो, पुरस्कर्ता असतो. अशा कामाचा आदर करावा, त्यासाठी योग्य तो मोबदला द्यावा असं आपल्याला वाटत कसं नाही?
आम्ही एक लुप्त होत जाणारी प्रजाती बनत चाललो आहोत. आणि यात तोटा कुणाचा आहे, तर गुजराती भाषेचा.’’ गुजराती माध्यम समूहांची दयनीय अवस्था वाजेसिंह यांनी पाहिली. भाषेला तिथे सन्मानाने वागवलं जायचं नाही आणि लिहिता-वाचता येणारं कुणीही तिथे मुद्रित शोधक म्हणून चालून जायचं.
वाजेसिंहांच्या मते, “साहित्यविश्वात प्रचलित असलेली एक खोटी कल्पना म्हणजे मुद्रित शोधकापाशी ज्ञान, क्षमता किंवा सर्जनशीलता नसते." वास्तवात वाजेसिंह स्वत: गुजराती भाषेचे संरक्षक, पुरस्कर्ते आणि पालक ठरले.
"गुजरात विद्यापीठाने कोशामध्ये ५,००० नवे शब्द समाविष्ट करण्यासाठी सार्थ जोडणी कोश [एक सुप्रसिद्ध शब्दकोश] पुरवणी प्रकाशित केली," आठवणींना उजाळा देत किरीट भाई सांगतात, "आणि त्यात भयंकर चुका होत्या – फक्त ऱ्हस्व दीर्घाच्या नाही; तर तथ्य आणि तपशीलांच्या चुका होत्या. वाजेसिंह यांनी त्या सगळ्याची काळजीपूर्वक नि काटेकोर नोंद तर घेतलीच शिवाय त्याची जबाबदारीही घेतली.
वाजेसिंह यांनी ज्या प्रकारचं काम केलं, तसं काम करणारं आज गुजरातमध्ये मला कुणी दिसत नाही. राज्य मंडळाच्या इयत्ता सहावी, सातवी, आठवीच्या शालेय पाठ्यपुस्तकांमध्ये त्यांना ज्या चुका आढळलेल्या त्याबद्दलही त्यांनी लिहिलं.’’
अंगी प्रतिभासंपन्नता आणि क्षमता असूनही प्रतिकूलता होती वाजेसिंहांच्या पाचवीला पूजलेली. आणि तरीही त्यांनी लिहिलं ते आशेविषयी... तगून राहण्याविषयी! आपल्याला आपल्याच जीवावर जगायचंय, हे त्यांना ठाऊक होतं. ईश्वराचा त्याग त्यांनी फार पूर्वीच केला होता.
जन्माला आलो
तेव्हा
एका हातात भूक
होती
आणि
दुसऱ्यात
श्रम,
ईश्वरा
सांग...
कुठून मिळेल
मला तिसरा हात
तुझी उपासना करा
यला
?
ईश्वराची जागा वाजेसिंहाच्या जीवनात अनेकदा कवितेने घेतली. २०१९ मध्ये ‘आघियानू अजवाळो’ (काजव्यांचा प्रकाश) आणि २०२२ मध्ये ‘झाकळना मोती’ (दवबिंदूंचे मोती) हे दोन कवितासंग्रह आणि पंचमहाली भिली या त्यांच्या मातृभाषेतील काही कविता प्रकाशित झाल्या.
अन्याय, शोषण, भेदभाव आणि वंचनेने भरलेल्या आयुष्याच्या शेवटाकडेही त्यांच्या कवितांमध्ये ना असते नाराजीची वा संतापाची कोणतीही खूण. ना कोणतीही तक्रार. "मी कुणाकडे केली असती तक्रार? समाजाकडे? आम्ही समाजाकडे तक्रार नाही करू शकत; ते मान मुरगाळतील आमची," वाजेसिंह म्हणतात.
आपल्या वैयक्तिक परिस्थितीच्या पलीकडे जाऊन मानवी स्थितीविषयीच्या वास्तवदर्शी सत्याशी वाजेसिंहांनी नातं जोडलं ते कवितेच्या माध्यमातून. आजच्या आदिवासी आणि दलित साहित्याचं अपयश दडलंय ते त्यातील व्यापकतेच्या अभावात, असं त्यांचं मत.
"थोडंबहुत दलित साहित्य वाचल्यावर माझ्या लक्षात आलं की अवघ्या मानवजातीला साद घालण्यात ते कमी पडतंय. त्यांच्यावर झालेल्या अत्याचारांबद्दल तक्रार करणं हे त्यात ठासून भरलंय. पण तिथून पुढे जायचं कुठे? आदिवासींचा आवाज तर आत्ता कुठे ऐकू यायला लागलाय. तेसुद्धा स्वतःच्या आयुष्याबद्दल भरभरून बोलतात. व्यापक प्रश्न कधीच उपस्थित केले जात नाहीत," वाजेसिंह सांगतात.
दाहोदमधले कवी आणि लेखक प्रवीणभाई जादव सांगतात, "बालपणी मी पुस्तकं वाचायचो तेव्हा मला प्रश्न पडायचा - आपल्या समाजात, आपल्या भागात कुणी कवी का नाही? २००८ मध्ये मला पहिल्यांदा एका संग्रहात वाजेसिंह यांचं नाव दिसलं. आणि अखेरीस तो माणूस शोधायला मला चार वर्षं लागली! ते मुशायऱ्यांचे कवी नव्हते. त्यांच्या काव्यातून आमच्या वेदनेला, उपेक्षितांच्या जगण्याला हुंकार मिळाला.”
महाविद्यालयीन जीवनात वाजेसिंहांची कवितेशी नाळ जुळली. कुठल्या तरी ध्येयाचा पाठपुरावा किंवा प्रशिक्षण अशासाठी उसंत नव्हती. “माझ्या मनात दिवसभर कविता रेंगाळायची,’’ ते समजावून सांगतात, “ती आहे माझ्या अस्तित्वाबद्दलची अस्वस्थ अभिव्यक्ती... कधी कधी गवसते... अभिव्यक्त होते; कधी अलगद निसटून जाते. त्यामुळे त्यातलं बहुतांश अव्यक्तच राहून गेलं. एखादी लांबलचक प्रक्रिया मी मनात रेंगाळत ठेवू शकत नाही. त्यामुळे कविता मला जवळची वाटली. आणि तरीही अनेक कविता लिहायच्या राहूनच गेल्या.’’
फुफ्फुसाचा कर्करोग या जीवघेण्या आजाराने गेल्या दोन वर्षांत या अलिखित कवितांची यादी लांबत गेली. साऱ्या व्यथा-वेदनांच्या पार्श्वभूमीवरचं वाजेसिंहांचं आयुष्य आणि कर्तृत्व पाहताना आपसूक आकळतं - काय लिहायचं राहून गेलं ते! 'काजव्यांचा लुकलुकता प्रकाश' जो त्यांनी फक्त स्वत:च्या नाही तर आपल्या संपूर्ण समाजाच्या मनात तेवत ठेवला; तो मात्र अलिखित राहिला.
शिंपल्याचं संरक्षक कवच नसतानाही झळाळून उठलेले त्यांचे 'दवबिंदूंचे मोती' अलिखित राहिले. या निर्दयी आणि क्रूर जगात करुणा आणि सहानुभूती टिकवून ठेवणारा हा विलक्षण आवाज अलिखित राहिला. आपल्या भाषेतल्या उत्कृष्ट कवींच्या यादीत वाजेसिंह पारगी हे नावही ‘अलिखित’ राहिलं.
परंतु वाजेसिंह हे काही ‘क्रांतीचे कवी’ नव्हते. शब्द त्यांना ठिणगीसमानही वाटले नाहीत.
मी इथे वाट बघत पडून आहे
येईल एखादी वाऱ्याची झुळूक
मी राखेचा ढिगारा असलो
तरी काय झालं
मी आग नाही
गवताचं पातंही मी जाळू शकत नाही.
पण मी त्यांच्या डोळ्यात शिरेन.
खुपेन,
आणि
एखाद्याचे डोळे तरी
होतील
चोळून लाल
.
आणि आता... सुमारे ७० अप्रकाशित कविता मागे उरल्या आहेत... आपल्या डोळ्यांना आणि आपल्या विवेकबुद्धीला खुपत आहेत... आपणही वाऱ्याच्या त्या झुळकेची वाट पाहत आहोत.
झुलडी
मी लहान असताना
बापाने मला झुलडी आणून दिली
पहिल्या धुण्यानंतर ती आकसली,
तिचा रंग उडाला,
आणि धागे उसवले.
मग ती मला आवडेनाशी झाली.
मी त्रागा केला -
मला नकोय ही झुलडी.
डोक्यावरून हात फिरवत
आईने समजूत घातली,
"अगदी फाटेपर्यंत वापरावी बाळा.
मग नवी
आणू
, बरं..."
आज हा देह लटकलाय
मला न आवडणाऱ्या
त्या झुलडीसारखा
सगळीकडे सुरकुत्या पडल्यात,
सांधे वितळतायत,
थरथरतोय
मी श्वास घेताना
आणि माझं मन त्रागा करतंय -
नकोय
हा देह मला आता!
त्या विचारचौकटीतून बाहेर येता
येता
मला
आठवते माझी आई आणि तिचं गोड बोलणं -
"अगदी फाटेपर्यंत घाल, बाळा!
एकदा ती गेल्यावर...
झुलडी म्हणजे भरतकाम केलेली अंगी किंवा सदरा. आदिवासी समाजातील मुलं तो घालतात.
वा जेसिंह पारगी निधना पूर्वी काही दिवस आमच्याशी बोल ले , त्या बद्दल लेखिका कृतज्ञ आहे . मुकेश पारगी, कवी व सामाजिक कार्यकर्ते कांजी पटेल, ‘ निर्धार ’ चे संपादक उमेश सो लं की, वा जेसिंह यांचे मित्र व लेखक किरीट परमार आणि ग ला लियावाड प्राथमिक शाळेचे शिक्षक सतीश परमार यांचेही आभार. त्यांच्या सहकार्याशिवाय हा लेख लिहिणं शक्य झालं नसतं.
या लेखात वापरलेल्या सर्व कविता वा जेसिंह पारगी यांनी गुजराती भाषेत लिहिल्या असून प्रतिष्ठा पंड्या यांनी त्यांचा इंग्रजीत अनुवाद केला आहे.