कोल्लिडा नदीचा वाळूमय काठ. तिन्ही सांजा होण्याची वेळ. श्रीरंगमच्या आपल्या तिळाच्या शेतापासून १० मिनिटांच्या अंतरावर नदीकिनारी वडिवेलन मला किती तरी गोष्टी सांगत होते. १९७८ साली त्यांच्या जन्मानंतर १२ दिवसांनी नदीला कसा पूर आला होता ते. त्यांचं गाव आणि कसे सगळेच शेतकरी तिथे ‘येल्ल’ म्हणजेच तिळाची शेती करतात. याच तिळापासून मधाच्या रंगाचं, जिभेवर वेगळी चव देणारं तेल निघतं. इतकंच नाही, केळ्याची दोन मोठी पानं उपडी टाकून पोहायला कसं शिकलो ते आणि कावेरीच्या तीरावर राहणाऱ्या प्रियाच्या प्रेमात कसे पडलो ते. वडलांच्या विरोधात जाऊन तिच्याशी लग्न कसं केलं तेही. आपल्या दीड एकरातल्या भात, ऊस, उडीद, तिळाच्या शेतीच्या गोष्टी तर अनेकानेक...
यातल्या पहिल्या तीन पिकांत थोडा तरी पैसा आहे. “भातातून येणारा पैसा उसात घालायचा. आणि त्यातून येणारा परत शेतीतच.” तिळाची लागवड तेलासाठी. लाकडी घाण्यावर तिळाचं तेल काढलं जातं. याला तमिळमध्ये नल्लेण्णइ म्हणतात. मोठ्या भांड्यात ते भरून ठेवलं जातं. “स्वयंपाकात, लोणच्यात सगळ्यात हेच वापरलं जातं,” प्रिया सांगते. “ते तर रोज तेलाची गुळणी पण करतात.” वडिवेलन हसतात आणि म्हणतात, “आणि तेल लावून स्नान, ते तर माझं सगळ्यात आवडतं.”
वडिवेलन यांना आवडणाऱ्या अशा किती तरी गोष्टी आहेत. आणि खरं तर त्यांना अगदी छोट्या छोट्या गोष्टीत आनंद सापडतो. लहानपणी नदीतली मासेमारी, मित्रांबरोबर भाजून खाल्लेले ताजे ताजे मासे, पंचायत प्रमुखाच्या घरी जाऊन पाहिलेला गावातला एकमेव टीव्ही. “काय सांगू? मला टीव्हीचं इतकं वेड होतं, की प्रक्षेपण नीट नसताना येणारा ऑइं आवाजसुद्धा मी ऐकत बसायचो!”
सूर्य कलतो आणि त्या रम्य आठवणीही हवेत विरून जातात. “आजकाल केवळ शेतीवर विसंबून राहणं शक्यच नाही,” वडिवेलन सांगतात. “मी कॅब देखील चालवतो म्हणून आमचं भागतंय.” आम्ही त्यांच्याच टोयोटा इटियॉसमध्ये बसून श्रीरंगम तालुक्यातल्या तिरुवळरसोलईमधल्या त्यांच्या घरून इथे नदीवर आलो होतो. गाडीचा हप्ता महिन्याला २५,००० इतका आहे. पैशाची अडचण कायमचीच, दोघंही म्हणतात. अनेकदा गरज भागवण्यासाठी एखादा डाग गहाण ठेवावा लागतो. “कसंय, आम्ही जर घर बांधण्यासाठी कर्ज काढायचं ठरवलं तर दहा चपला झिजतील इतक्या खेटा मारायला लावतात आमच्यासारख्यांना!”
आकाशात आता गुलाबी, निळा आणि काळ्या रंगाचे फटकारे दिसू लागलेत. जणू एखादं तैलचित्र असावं. दुरून कुठून तरी मोराचा आवाज येतोय. “या नदीत पाणमांजरं आहेत,” वडिवेलन सांगतात. आणि आमच्यापासून हाकेच्याच अंतरावर काही मुलं स्वतःच पाणमांजरं असल्यासारखी पाण्यात डुबक्या मारत असतात. “मीसुद्धा हे असंच करायचो. कारण आम्ही लहानाचे मोठं झालो तेव्हा करमणूक म्हणून दुसरं काहीही नव्हतं.”






































