भारतातल्या जवळपास सगळ्या शेतकऱ्यांना इंग्रजी भाषेतले काही शब्द नक्की माहित असतील. स्वामिनाथन रिपोर्ट किंवा स्वामिनाथन कमिशन. आणि या आयोगाने, अहवालाने केलेली शिफारस तर त्यांना तोंडपाठ असेलः किमान आधारभूत मूल्य म्हणजेच हमीभाव = लागवडीच्या एकूण खर्चाच्या दीडपट (सी२+५०%).
सरकार दरबारी, प्रशासकीय यंत्रणेत आणि खासकरून विज्ञानविषयक संस्थांमध्ये त्यांची स्मृती जागवली जाईलच. पण त्यांच्या अध्यक्षतेखालील राष्ट्रीय शेतकरी आयोगाच्या अहवालाची अंमलबजावणी करण्याची मागणी करणाऱ्या करोडो शेतकऱ्यांच्या मनात मात्र ते कायम जिवंत असतील.
हे अहवाल आयोगाने तयार केले असले तरी डॉ. स्वामिनाथन यांनी अध्यक्ष म्हणून त्यासाठी केलेलं काम इतकं भरीव आहे की शेतकऱ्यांसाठी आजही हे अहवाल म्हणजे ‘स्वामिनाथन रिपोर्ट’ आहेत.
या अहवालांची कर्मकहाणी ही की संयुक्त पुरोगामी आघाडी (यूपीए) आणि राष्ट्रीय लोकशाही आघाडी (एनडीए) या दोन्ही सरकारांनी हे अहवाल दडपून ठेवले आणि आयोगाच्या उद्दिष्टांशीच प्रतारणा केली. पहिला अहवाल २००४ मध्ये सादर करण्यात आला आणि पाचवा किंवा शेवटचा अहवाल ऑक्टोबर २००६ मध्ये दाखल करण्यात आला. खरं तर शेतीवरील अरिष्टासंबंधी संसदेचं एक विशेष सत्र बोलावण्याची गरज असताना एका तासाची देखील विशेष चर्चा शेतीबद्दल घडवून आणलेली नाही. आयोगाचा पहिला अहवाल सादर झाला त्याला १९ वर्षं उलटून गेली आहेत.
२०१४ साली मोदी सरकार सत्तेत आलं त्याला थोड्या अंशी का होईना स्वामिनाथन अहवाल, त्यातही त्यातलं हमीभावाचं सूत्र कारणीभूत ठरलं असं म्हणणं वावगं ठरू नये. तसं असतानाही सत्तेत आलेल्या या सरकारने सर्वोच्च न्यायालयात प्रतिज्ञापत्र दाखल केलं की असं केल्यास बाजारभावांमध्ये चढउतार येतील आणि त्यामुळे सरकार हे सूत्र वापरण्यास असमर्थ आहे.
कदाचित हे अहवाल जास्तच शेतकरी-स्नेही आहेत असं संपुआ आणि रालोआ सरकारला वाटत असावं. कारण दोन्ही सरकारांना शेती कॉर्पोरेट क्षेत्राच्या घशात घालण्यातच रस होता. स्वातंत्र्यानंतर पहिल्यांदाच शेतीक्षेत्रासाठी ठोस आणि सकारात्मक योजना या अहवालाने मांडली होती. कारण या आयोगाच्या अध्यक्षस्थानी अशी एक व्यक्ती बसली होती जिला एक वेगळी चौकट तयार करायची होती. शेतीक्षेत्रातील वाढ मोजताना केवळ पिकाचा उतारा किती वाढला हे न पाहता शेतकऱ्याच्या उत्पन्नात किती वाढ झाली हे पाहिलं जावं असं डॉ. स्वामिनाथन मांडू पाहत होते.






