दिवे विझू नये याची खात्री करण्यासाठी एक तरुण पडद्यामागे धावताना दिसतो. या तासाभराच्या सादरीकरणात त्याला अनेकदा ही कसरत करावी लागते. हे सर्व करताना साधनसामग्री आणि त्याच्या सहकाऱ्यांना त्रास होणार नाही याचीदेखील काळजी घ्यावी लागते.
हे सगळे थोलपावकोथ कलाकार असून, ते पडद्याआड राहून ही कला सादर करतात.
एका पांढऱ्या सुती पडद्याच्या आड हे कठपुतळी कलाकार हातात चामड्याचे बाहुले घेऊन सतत फिरताना दिसतात. त्यांच्या पायाजवळ सुमारे ५० ते ६० इतर कठपुतळ्या ठेवलेल्या असतात, ज्या पुढील सादरीकरणासाठी तयार केलेल्या असतात. वक्त्यांद्वारे ही कथा कथन केली जाते आणि सावल्यांद्वारे दाखवली जाते.
या कलेचे स्वरूप असे आहे की, त्याच्या खऱ्या कामाकडे लक्षच जात नाही. म्हणूनच जेव्हा २०२१ मध्ये कठपुतळी कलाकार रामचंद्र पुलावर यांना देशातील चौथा सर्वोच्च नागरी पुरस्कार म्हणजे पद्मश्री पुरस्कार प्रदान करण्यात आला तेव्हा तो उत्सव साजरा करण्याचे कारण आणि पोचपावती मिळण्याचा दिवस होता. आपल्या भाषणात थोलपावकोथ कलाकार पुलावर म्हणाले, “या पुरस्काराचे सर्व श्रेय या कठपुतळी कलेचे अस्तित्व सुनिश्चित करण्यासाठी कलाकारांच्या पथकाने केलेल्या सामूहिक प्रयत्नांना जाते.”
हे यश म्हणजे पुलावर आणि त्यांच्या संघाच्या कामाची खरी पावती ठरले आहे. समीक्षक आणि भक्तांनी त्यांच्यावर ह्या कलेचे व्यवसायात रुपांतर केल्याचा आरोप केला. रामचंद्रांना मात्र टीकेची फारशी चिंता नाही. “आम्हाला जगण्यासाठी आणि पोट भरण्यासाठी हा व्यवसाय हवा आहे”, असे ते म्हणतात. “जर अभिनेते आणि नर्तक त्यांची कला सादर करण्यासाठी पैसे घेऊ शकतात, तर मग कठपुतळी कलाकार का घेऊ शकत नाहीत?”




