सुमारे २०० वर्षांहून पुरातन वास्तूच्या पायऱ्या आम्ही उतरू लागलो आणि श्री भदरिया माता जी मंदिराच्या प्रवेशद्वारावरच्या गाणाऱ्यांचा आवाज हळूहळू क्षीण होत गेला. एका क्षणी आवाज पूर्णपणे थांबला. आता आम्ही जमिनीच्या सुमारे २० फूट खाली पोहोचलो आहोत.
१५,००० चौ.फूट जागेत विस्तारलेलं वाचनालयाचं दालन आमच्या समोर खुलं झालं. पुस्तकांच्या ५६२ फडताळांची रचना अशी की मधून जाणारा केवळ एक अरुंद मार्ग. ठराविक अंतरावर ठेवलेल्या या फडताळांमध्ये २ लाखांहून अधिक पुस्तकं विसावलेली आहेत. यात चामड्याचं वेष्टन असलेले ग्रंथ, झाडांच्या सालींवर लिहिली गेलेली हस्तलिखितं, जुन्या ग्रंथांच्या आवृत्त्या आणि हिंदू धर्म, इस्लाम, ख्रिस्ती धर्म अशा विषयांवरील लिखाण यात समाविष्ट आहे. या ग्रंथांव्यतिरिक्त कायदा आणि औषध विज्ञान, तत्त्वज्ञान, भूगोल, इतिहास आणि न जाणो कितीतरी विषयांवर लिहिलेली पुस्तके इथे पाहता येऊ शकतात. साहित्यातल्या अजरामर कलाकृतींसोबत अलिकडच्या काही वर्षांत लिहिलेल्या कादंबऱ्यांनी साहित्य विभाग संपन्न झाला आहे. वाचनालयातील बहुतांश पुस्तकं हिंदी भाषेतली आहेत. यात काही इंग्रजी आणि संस्कृत भाषेतील ग्रंथही आहेत.
हे वाचनालय उभारण्याची कल्पना पंजाबचे धार्मिक चिंतनकर्ते हरिवंश सिंग निर्मल यांची होती. मंदिर परिसरात असणाऱ्या एका गुहेत २५ वर्षे ते एकट्याने राहिल्याचं सांगितलं जातं. आणि तिथे त्यांनी हे वाचनालय उभारण्याचं ठरवलं. निर्मल यांचा २०१० साली मृत्यू झाला परंतु त्याच्या बऱ्याच आधीपासून शिक्षण आणि पशुकल्याण विषयक कामांसाठी निधी जमवण्याचं काम त्यांनी सुरु केलं होतं.
“ते पक्के मानवतावादी होते. सगळ्या धर्माांचा संदेश एकच आहे: माणसाची त्वचा आणि केसांचा रंग वेगवेगळा असू शकतो. मात्र, आतून आपण सगळे एकसारखेच असतो,” जुगल किशोर सांगतात. मंदिर आणि वाचनालयाचं काम पाहणाऱ्या श्री जगदंबा सेवा समिती या न्यासाचे ते सचिव आहेत. हाच न्यास गोशाळेची व्यवस्थाही पाहतो. इथे ४०,००० हून अधिक गायी-गुरं आहेत.
वाचनालयाच्या निर्मितीचे काम १९८३ मध्ये सुरु झालं. याची रचना १९९८ मध्ये तयार झाली. यानंतर ग्रंथालयातली पुस्तकं गोळा करण्याचं काम सुरु झालं. “त्यांना (निर्मल) हे वाचनालय ज्ञानाचं केंद्र आणि विश्वविद्यालयाच्या रुपात विकसित करायचं होतं,” किशोर सांगतात. “महाराजजींना वाटत होतं की लोकांनी दूरदूरून या ठिकाणी यावं. ज्ञानाच्या शोधात भटकणाऱ्यांना इथे त्यांना हवे ते मिळावं.”
वाचनालयाच्या स्थापनेसाठी तळघरातील या जागेची निवड करण्यात आली त्याचं मुख्य कारण धूळ आणि इतर नुकसान कमी व्हावं हेच असल्याचं वाचनालयाचे प्रशासक सांगतात. भारतीय सैन्याचं गोळीबाराचं सराव मैदान पोखरण, इथून केवळ १० किमी अंतरावर आहे. जेंव्हा राजस्थानाच्या माळरानांवर सोसाट्याचा वारा सुटतो तेंव्हा सर्वत्र धूळ पसरते.
अशोक कुमार देवपाल ग्रंथालयाच्या देखभालीचं काम करतात. ते सांगतात, या वाचनालयात सहा मोठाले एक्झॉस्ट पंखे आहेत. त्याद्वारे आतलं हवामान कोरडं ठेवलं जातं. त्यासाठी नियमितपणे कापूरही जाळला जातो. बुरशीपासून वाचण्यासाठी, “आम्ही पुस्तकांना वेळोवेळी मोकळी हवा मिळावी अशी तजवीज करतो. आमच्यातील सात- आठ जण दोन महिन्यांपेक्षाही अधिक काळ हेच काम करत असतात.”
मंदिराच्या न्यासाकडे सव्वा लाख बिघा ( म्हणजेच साधारण २०,००० एकर ) जमिनीची मालकी आहे. भदरिया ओरण (पवित्र वनराई) परंपरेनुसार इथे “झाडाची फांदीही कापली जात नाही.” गोशाळेतील ४०,००० हून अधिक गायी-गुरांच्या देखभालीसाठी काम करणारे सत्तरीतील किशोर सांगतात. इथे दरवर्षी साधारण २-३ लाख लोक येतात. शिवाय, वर्षातून चार वेळा होणाऱ्या उत्सवादरम्यान राजपूत, बिश्णोई आणि जैन समुदायातूनही बरेच लोक इथे जमतात. वाचनालयाचं उदघाटन झालेलं नसलं तरी पर्यटकांना खाली उतरून सहज फिरण्याची परवानगी असते.
वाचनालयाशिवाय इथे एक विशाल गोशाळा आहे. गीर, थारपारकर, राठी आणि नागौरी अशा प्रजातींच्या हजारो गायी आणि बैलांची देखभाल या गोशाळेत केली जाते. त्यासाठी १५० कर्मचाऱ्यांचा एक वेगळा गट आहे. ”ओरण हे पशु- पक्ष्यासांठीच आहे,” न्यासाचे प्रशासक अशोक सोदाणी सांगतात. इथे येणारी गुरं भाकड झालेली असतात. ९० टक्के बैल आहेत. आमच्या गोशाळेत १४ विंधन विहिरी आहेत. न्यास दर वर्षी प्राण्यांच्या चाऱ्यावर साधारण २५ कोटी रुपये खर्च करतो. सोदाणी सांगतात, “हरियाणा, पंजाब आणि मध्यप्रदेश सारख्या दूरच्या राज्यातून चाऱ्याने भरलेले ३- ४ ट्रक दररोज इथे येतात,” ते सांगतात. यासाठी लागणारा पैसा देणगीतून उभा राहतो.
जमिनीच्या खालून आम्ही वर स्वच्छ सूर्यप्रकाशात आलो तेव्हा ढोली समुदायाचे प्रेम चौहान आणि लक्ष्मण चौहान पेटी वाजवत होते. भदरिया देवीच्या भजनांचा आवाज निनादत होता. श्री भदरिया माता केवळ या मंदिराची अधिष्ठातीच नाही तर या आजूबाजूच्या संपूर्ण क्षेत्रावर आणि सभोवतालही तिचीच हुकूमत असल्याचे त्यांच्या गाण्यात वर्णिलेलं होतं.