“पंखे वाले [पवनचक्क्या], ब्लेड वाले [सोलर फार्म] आमच्या ओरणवर कब्जा करतायत,” सनवाटा गावचे रहिवासी सुमेर सिंह भाटी सांगतात. ते एक शेतकरी आणि पशुपालक असून त्यांचं घर जैसलमेर जिल्ह्यातील डेग्रे ओरणला लागून आहे.
ओरण म्हणजे देवराई, जे सर्वसामान्यांना खुलं असं नैसर्गिक संसाधन आहे. प्रत्येक ओरणमध्ये एक देवता असते जिची जवळपासचे गावकरी पूजा करतात आणि त्या भोवतालची जमीन अलंघ्य मानण्यात येते- इथे झाडं तोडता येत नाहीत, फक्त गळून पडलेलं लाकूड सरपण म्हणून वापरल्या जाऊ शकतं, इथे बांधकामाला मनाई असते, आणि इथले जलकुंभ पवित्र मानण्यात येतात.
पण, सुमेर सिंह म्हणतात, “त्यांनी [नवीकरणीय ऊर्जा कंपन्यांनी] शेकडो वर्षं जुनी झाडं तोडली, गवत आणि झुडपं उपटून टाकली. असं वाटतं की त्यांना कोणीही रोखू शकत नाही. ”
जैसलमेरमधील शेकडो गावांतील रहिवाशांनी सुमेर सिंह सारखाच संताप व्यक्त केला, कारण त्यांचे ओरणही नवीकरणीय ऊर्जा (आरई) कंपन्यांनी ताब्यात घेतल्याचं आढळून आलंय. ते म्हणतात की, गेल्या १५ वर्षांत या जिल्ह्यातील हजारो हेक्टर जमीन पवनचक्की आणि कुंपण घातलेल्या सोलर फार्म्सना देण्यात आलीय, तसंच हाय टेंशन पॉवर लाइन्स आणि मायक्रोग्रीड्स याद्वारे वीज जिल्ह्याबाहेर नेण्यात येतेय. या सर्वांमुळे स्थानिक पर्यावरणाला प्रचंड त्रास होतोय आणि या देवराईवर अवलंबून असणाऱ्या लोकांची उपजीविका नष्ट करतंय.
“चरायला जागाच उरली नाही. गवत एवढ्यातच [मार्चमध्ये] गायब झालंय आणि आता आमच्या जनावरांना चरायला फक्त केर आणि केजरीची पानं बाकी आहेत. त्यांना पोटभर अन्न मिळत नाही आणि म्हणून ते कमी दूध देतात. दुधाचं प्रमाण दिवसाला ५ लिटरवरून २ लिटरवर घसरलंय,” पशुपालक जोरा राम सांगतात.
समशुष्क ओरण इथल्या समाजासाठी कल्याणकारी आहेत - ते त्यांच्या आजूबाजूला राहणाऱ्या हजारो लोकांना चारा, गवत, पाणी, अन्न आणि सरपण पुरवतात.





























