आसामी खोलाचे खालचे (बास) स्वर बंगाली खोलापेक्षा अधिक खालचे असतात. ढोलाची पट्टी नगाऱ्यापेक्षा जास्त वरची असते. गिरीपोद बाद्योकार यांना हे अगदी व्यवस्थित ज्ञात आहे. हा तालवाद्यांचा निर्माता आपल्या दैनंदिन कारागिरीत हेच सारं ज्ञान वापरत असतो.
“तरुण मुलं मला त्यांचे स्मार्टफोन दाखवतात आणि एखाद्या विशिष्ट पट्टीशी जुळवून घ्यायला सांगतात,’’ आसाममधल्या माजुली इथले हे ज्येष्ठ कारागीर सांगतात, “आम्हाला ॲप लागत नाही.’’
ट्यूनर ॲप वापरायचं म्हटलं तरी पट्टी झट की पट लागत नाही. जुळवत राहावं लागतं, कधी चुकतं मग दुरुस्ती करत पुन्हा जुळवून पहावं लागतं. तालवाद्यात वापरलेला चामड्याचा पडदा योग्य पद्धतीने आणि घट्ट लावलेला असणं त्यासाठी आवश्यक ठरतं,’’ असं गिरीपोद समजावून सांगतात, “तसं असलं तरच ट्यूनर ॲप काम करतं.’’
गिरीपोद आणि त्यांचा मुलगा पोदुम हे पिढीजात बाद्योकार (किंवा बाद्यकार). धुली किंवा शब्दोकार म्हणूनही हा समाज ओळखला जातो. वाद्य निर्मिती आणि दुरुस्ती यासाठी प्रसिद्ध असलेला हा समाज त्रिपुरा राज्यात अनुसूचित जातीत गणला जातो.
पोदुम आणि गिरीपोद प्रामुख्याने ढोल, खोल आणि तबला बनवतात. “इथे खूप सारे सत्रा (वैष्णव पंथाचं एक प्रकारचं प्रार्थना घर) आहेत. त्यामुळे आम्हाला वर्षभर काम मिळतं,’’ पोदुम सांगतात, “आणि त्यातून आमचं भागतं!’’













