पाकिस्तानच्या सीमेपासून सुमारे चार किलोमीटर अंतरावर, समशेर सिंग त्याच्या भावाच्या गॅरेजमध्ये कामात मग्न आहे आणि आपली अवजारं शोधतोय. गेल्या तीन वर्षांपासून तो मेकॅनिक म्हणून इथे काम करत असला तरी हे काही त्याच्या पसंतीचं काम नाही.
हमाल म्हणून काम करणारी शमशेरची ही तिसरी पिढी. ३५ वर्षीय शमशेर एकेकाळी भारत आणि पाकिस्तानमधील अटारी-वाघा सीमेवर कामाला होता. त्याचं कुटुंब राज्यातील इतर मागासवर्गीय (OBC) म्हणून गणना केलेल्या प्रजापती समाजातील आहे.
पाकिस्तानला लागून असलेल्या पंजाबच्या सीमेवर, सिमेंट, जिप्सम आणि ड्रायफ्रुट्सचे शेकडो ट्रक दररोज भारतात यायचे. टोमॅटो, आलं, लसूण, सोयाबीनचा अर्क आणि कापसाचे धागे यासह इतर माल घेऊन जाणारे ट्रकही अशाच प्रकारे पाकिस्तानला जातात.
इथे काम करणाऱ्या जवळपास १,५०० हमालांपैकी एक शमशेर. त्यांचं काम म्हणजे "हा माल ट्रकमधून उतरवायचा किंवा लादायचा आणि सीमेवरून पुढील प्रवासासाठी पाठवायचा". या परिसरात कोणतेही कारखाने किंवा उद्योग नाहीत; अटारी-वाघा सीमेच्या २० किमी परिघात असलेल्या गावांमधील भूमिहीन रहिवासी त्यांच्या उदरनिर्वाहासाठी सीमापार व्यापारावर मोठ्या प्रमाणात अवलंबून असतात.









