ज्या घरांमध्ये रेशीमकिडे पाळले जातात, त्या घरातली मुलं आपल्या आईकडून हे काम शिकतात असं माजुलीमध्ये राहणाऱ्या यामिनीनं सांगितलं. मला कापड विणणं किंवा धाग्यापासून रिळं तयार करणं ही कामं कोणी शिकवली नाहीत. माझ्या आईचं काम पाहूनच मी शिकले.
बऱ्याच बायका स्वतःच्या हातानं विणलेल्या रेशमी कापडाचेच पोशाख वापरत असत कारण त्यावेळी यंत्रावर विणलेलं कापड आजच्याइतकं सहज उपलब्ध होत नसे. स्त्रिया एरी, नूनी किंवा मोगा रेशमापासून बनवलेले सदोर मेखला वापर असत आणि जिथे जातील तिथं त्या टाकुरी आपल्यासोबत घेऊन जात असत असं यामिनी म्हणाली.
यामिनी म्हणाली, मी तेव्हाच ठरवलं होतं की मी एरी रेशीमकिड्यांची शेती करेन आणि इतरांनाही त्याचं शिक्षण देईन. सध्या यामिनी माजुलीतल्या २५ महिलांना विणकाम व वस्त्रोद्योगाचं प्रशिक्षण देतेय. तिने विणलेल्या वस्त्रांचं प्रदर्शन देशपरदेशात भरवलं जात आहे. ब्रिटीश संग्रहालयातही तिने विणलेलं एरी रेशमाचं कापड ठेवण्यात आलंय.
एरी रेशमाच्या कपड्यांना खूप मागणी आहे पण आम्ही ते पारंपरिक पद्धतीनंच तयार करतो असं यामिनीनं सांगितलं. ती म्हणाली, एरी रेशमी कामड यंत्रमागावरही विणलं जाऊ शकतं आणि बिहारमधल्या भागलपूर रेशमानं सध्या आसाममधली बाजारपेठ व्यापलीय.
हातमागावर विणलेल्या कापडाची किंमत त्यासाठी वापरलेल्या धाग्याचा प्रकार, तंत्रज्ञान तसंच गुंतागुंतीची कलाकुसर यावरुन ठरते. पारंपरिक कलाकुसर असलेला हातमागावर विणलेला एरी रेशमाची शाल साडेतीन हजारांपेक्षा जास्त किमतीची असू शकते. हातमागावरच्या सदोर मेखलाची बाजारातली किंमत 8 हजारांपासून सुरू होते आणि स्थानिक बाजारात ही किंमत 15 ते 20 हजारांच्या दरम्यान असू शकते.
पूर्वी आसाममधल्या मुली आपल्या प्रियकरासाठी गमुसा, रुमाल, उशीचे अभ्रे विणायच्या आणि आमच्या मिशिंग मुली गलुकसुद्धा विणायच्या अशी माहिती यामिनीनं दिली. लोकांनी आपल्या पारंपरिक पद्धती सोडून दिल्या आणि त्या पुढच्या पिढ्यांपर्यंत पोहोचवल्या नाहीत, तर हा समृद्ध सांस्कृतिक वारसा नष्ट होईल अशी भीती तिनं व्यक्त केली. त्यामुळेच माझी जबाबदारी समजून, ही कला मला जमेल तसं पुढच्या पिढीपर्यंत पोचवण्यासाठी मी प्रयत्न करतेय असं यामिनी म्हणाली.
या वार्तांकनासाठी मृणालिनी मुखर्जी फौंडेशनचे अर्थसहाय्य मिळाले आहे.