पुजारी अंजनेयुलु एका शेतातून चालत चाललेत. हाताच्या तळव्यावर नारळ. हाच नारळ गोल फिरणार, एका कडेला झुकणार आणि खाली पडणार. त्याच क्षणाची ते वाट पाहतायत. आणि जिथे हे घडेल त्या जागेवर फुलीची खूण करायची, ते आम्हाला खात्रीने सांगतात. “इथे पाणी लागणार तुम्हाला. इथेच बोअर पाडा आणि बघा तुम्हीच,” अनंतपूरमधल्या मुद्दलापुरम गावी आमचं हे संभाषण सुरू होतं.
शेजारच्याच एका गावात रायुलु धोमथिम्मण्णा दुसऱ्या एका शेतात खाली वाकून काही तरी करतायत. रायलप्पादोड्डीमधल्या या शेतात त्यांच्या हातातलं लाकडाची बेचकीच त्यांना पाण्यापाशी घेऊन जाणार आहे. “ही फांदी वरती उडते, तिथेच पाणी लागणार,” ते सांगतात. आपला अंदाज “९० टक्के” खरा निघत असल्याचंही ते अगदी साधेपणाने सांगून टाकतात.
अनंतपूरच्या दुसऱ्या एका तालुक्यात चंद्रशेखर रेड्डींना वेगळाच प्रश्न सतावतोय. त्यांनाच नाही, अनेक तत्त्ववेत्त्यांनी युगानुयुगे यावर खल केलाय. मृत्यूनंतर जीवन असतं? रेड्डींच्या मते त्यांना याचं उत्तर सापडलंय. “पाणी म्हणजेच ते जीवन आहे,” ते म्हणतात. एका मसणवट्यात त्यांनी चार बोअर पाडल्या आहेत. त्यांच्या शेतात ३२ बोअर आहेत, त्या सोडून या चार. जंबुलदिने गावातल्या आपल्या या सगळ्या जलस्रोतांना जोडण्यासाठी त्यांनी ८ किलोमीटरची पाइपलाइनसुद्धा केलीये.
अंधश्रद्धा, दैवी शक्ती, देव, सरकार, तंत्रज्ञान किंवा चक्क नारळ. अनंतपूरमध्ये पाण्याच्या शोधात वणवण फिरणाऱ्या लोकांनी मिळेल त्या गोष्टीचा आधार घेतलेला दिसतो. या सगळ्यांचं एकत्रित यशही तसं फारसं काही नाही. पुजारी अंजनेयुलुंचा दावा मात्र सगळ्यांपेक्षा वेगळा आहे.
या हसऱ्या, मृदू स्वभावाच्या गृहस्थाचं म्हणणं आहे की त्यांची पद्धत हमखास यशस्वी ठरते कारण त्यांच्या हाताचं कौशल्य थेट भगवंताकडून त्यांना मिळालेलं आहे. “लोकांनी मला चुकीच्या वेळी पाणी शोधायला लावलं की सगळी गडबड होते आणि माझा अंदाज फक्त तेव्हाच चुकू शकतो,” ते सांगतात.









