राम अवतार कुशवाहा अहरवानीत शिरतात आणि निसरड्या वाटांवरून आपली मोटर सायकल सावकाश पुढे नेतात. पाड्याच्या मध्यभागी आल्यावर ते आपली १५० सीसी मोटरसायकल बंद करतात.
अगदी पाचच मिनिटात त्यांच्याभोवती बाळगोपाळांचा गराडा पडतो. चिल्ली पिल्ली, थोडी मोठी आणि काही मिसरुड फुटू लागलेली. सगळी सहरिया आदिवासी मुलं हातात नाणी किंवा दहा रुपयाच्या नोटा घट्ट धरून आपापसात गप्पा मारत उभी असतात. वाट पाहत. चाउमेनची प्लेट आपल्या हातात कधी येते याची. नूडल्स आणि भाज्या परतून केलेलं चटपटीत चाउमेन.
आता शांत असलेली ही लेकरं थोड्याच वेळात गलका करायला लागणार याची राम अवतार यांनी पुरती कल्पना आहे. म्हणून ते पटापट आपलं सामान बाहेर काढतात. सामानही फार काही नसतंच. दोन प्लास्टिकच्या बाटल्या, “एकीत लाल सॉस [चिली] आणि दुसरीत काळा [सोया सॉस],” ते सांगतात. इतर सामान म्हणजे कोबी, सोललेले कांदे, ढब्बू मिरची आणि उकडून ठेवलेल्या नूडल्स. “मी विजयपूरमध्ये माझी सगळी खरेदी करतो.”
संध्याकाळचे सहा वाजायला आलेत आणि राम अवतार याआधी तीन गावांमध्ये जाऊन आलेत. इतर कोणकोणत्या पाड्यांवर ते नेहमी जातात त्याची यादीच ते पटकन सांगतात. लडर, पंडरी, खजुरी कलान, सिलपारा, परोंड. विजयपूर तहसिलातल्या गोपालपुरा गावाचा पाडा म्हणजे सुत्तयपुरा. या पाड्याच्या ३० किलोमीटरच्या परिघात हे सगळे पाडे आहेत. या गावपाड्यांवर नूडल्स सोडून खाण्यासाठी तयार पदार्थ म्हणजे बटाटाचे वेफर्स आणि बिस्किटं.
ते अहरवानीला आठवड्यातून किमान २-३ वेळा येतात. या आदिवासी बहुल पाड्याची लोकसंख्या अंदाजे ५०० असावी. ही वस्ती तशी नव्यानेच वसलीये. १९९९ साली सिंहांसाठी दुसरा अधिवास तयार करण्याच्या योजनेत त्यांना कुनो अभयारण्यातून विस्थापित करण्यात आलं आणि ते इकडे येऊन वसले. वाचाः कुनोत चित्त्यांना पायघड्या आणि आदिवासींना नारळ






