कोल्हापूर एक पुरोगामी शहर म्हणून ओळखलं जातं. शाहू, फुले आणि आंबडेकरांच्या विचारांचा मोठा वारसा या क्षेत्राला लाभला आहे. आणि हा पुरोगामी वारसा जतन करण्यासाठी आजही इथले लोक जाती-धर्माच्या भिंती तोडत आहेत. वेगवेगळ्या संस्कृतीच्या लोकांमध्ये एकमेकांप्रती आदर आणि मैत्री फुलावी यासाठी काम करत आहेत.
पण जाती-धर्मांमध्ये समन्वय घडवून
आणणाऱ्या या विचारांच्या अगदी विरोधात काम करणाऱ्या धर्मांध विचारांचं मोठं आव्हान
उभं राहू लागलं आहे. विचारांचा प्रतिवाद विचारांनीच केला पाहिजे. तारदाळचे शरफुद्दिन
देसाई आणि सुनील माळी यांच्यासारखे भले लोक आज समाजात सलोखा रहावा यासाठी मोठं काम
करत आहेत.
कोल्हापूर जिल्ह्याच्या तारदाळचे
रहिवासी असलेले देसाई आणि माळी एका वेगळ्या वाटेने निघाले आहेत. शरफुद्दिन
देसाईंनी हिंदू गुरू केला आहे तर सुनील माळी मुस्लिम गुरूचे मुर्शीद झाले आहेत.