दुपार होत आलीये. गोलपी गोयारी तयार होऊन घरी वाट बघत बसलीये. पिवळे पट्टे असलेलं दोखोना वस्त्र नीटनेटकं करून घेत असतानाच शाळेत जाणाऱ्या आठ जणी तिच्याकडे येतात. त्यांनी देखील तिच्यासारखीच दोखोना नेसलीये आणि लाल रंगाच्या आरोनिया घेतल्या आहेत. आसामच्या बोडो समुदायाचं हा परंपरागत वेष.
“मी या मुलींना बोडो नृत्य शिकवते,” गोलपी सांगते. ती स्वतः बोडो आहे आणि बक्सा जिल्ह्याच्या गोआलगावमध्ये राहते.
बक्सा, कोक्राझार, उदलगुडी आणि चिरांग या चार जिल्ह्यांचा मिळून बोडोलँड प्रदेश तयार होतो. या प्रदेशाचं अधिकृत नाव बोडोलँड टेरिटोरियल रीजन असं आहे. आसामच्या आदिम जमातींपैकी एक असलेले बोडो आदिवासी इथे राहतात. भूतान आणि अरुणाचल प्रदेशाच्या पर्वतरांगांच्या पायथ्याशी असलेला हा प्रदेश ब्रह्मपुत्र नदीच्या किनाऱ्यावर आहे.
“त्या स्थानिक उत्सव आणि समारंभांमध्येही आपली कला सादर करतात,” तिशी पार केलेली गोलपी सांगते. पारीचे संस्थापक संपादक पी. साईनाथ यांना नोव्हेंबर २०२२ मध्ये एकोणिसावा यूएन ब्रह्मा सोल्जर ऑफ ह्युमॅनिटी हा पुरस्कार देण्यात आला होता. त्या निमित्ताने बोडो नृत्य सादर करण्यासाठी गोलपीने मोठ्या मनाने आपल्या घरी सगळी तयारी केली होती.


