महुआचा हंगाम कमी कालावधीचा असतो, जेमतेम २-३ महिने तो असतो. उन्हाळ्याच्या सुरुवातीला, मध्य भारतात आढळणाऱ्या ह्या उंच झाडांच्या बहुमूल्य फुलांचा सडा जमिनीवर पडतो.
छत्तीसगडमध्ये मोहाची फुलं गोळा करणं म्हणजे जणू काही एखादा सण असतो. हलक्या पिवळ्या रंगाची फुलं जंगलातून गोळा केली जातात, अख्खं कुटुंब या कामात जुंपून जातं, अगदी लहान मुलंही जंगलात जाऊन जमिनीवर पडलेली ही फुलं गोळा करून आणतात. “हे काम मेहनतीचं आहे” भूपिंदर म्हणतो. “आम्ही महुआ गोळा करायला सकाळी लवकर आणि परत संध्याकाळी जातो.” तो धमतरी जिल्ह्यातील चनागावमधून आपल्या पालकांसह इथे आला आहे. सण असल्यासारखं सगळीकडे उत्सवाचं वातावरण आणि गर्दी आहे.
हंगामाच्या वेळी महुआच्या फुलांचा सुगंध आसमंतात पसरतो. रायगड जिल्ह्यातील धरमजाईगड ते छत्तीसगडची राजधानी रायपूर असा प्रवास करत शेकडो गावकरी मोहाच्या झाडाखाली फुलं गोळा करण्यात व्यस्त दिसतात. ही फुलं सुकवून साठवली जातील आणि त्याचा वापर पीठ, दारू आणि इतर बरचं काही बनविण्यासाठी केला जाईल.
“आम्ही जंगलातून जे काही गोळा करतो त्यात महुआ आमच्यासाठी सर्वात महत्वाची वस्तू आहे. उपासमारीच्या काळात महुआ अन्न म्हणून वापरली जाते. जर एखाद्याला पैशाची गरज असेल तर ते महुआ विकू शकतात,” अंबिकापूर येथील सामाजिक कार्यकर्ते आणि आदिवासी नेते गंगाराम पाइंकरा म्हणतात. रोजगार वगैरे मिळत नाही त्या कठीण काळात लोकांना पोटासाठी याच फुलांचा आधार असतो त्याबद्दल ते सांगतात.
'जंगलातून जे काही गोळा करतो त्यात महुआ सर्वात महत्वाची आहे. उपासमारीच्या काळात महुआ खाल्ली जाते. एखाद्याला पैशाची गरज असेल तर महुआ विकता येते'
“आदिवासी लोक या फुलांपासून बनवलेल्या दारूचा आस्वाद घेतात, ही फुलं आमच्या परंपरांचा, पूजाविधींचा एक अविभाज्य भाग आहेत,” गंगाराम सांगतात.
तासंतास महुंआ गोळा करणं त्रासदायकही असतं. “आमचे हात, पाय, पाठ, मनगट आणि गुडघे दुखतात,” भूपिंदर सांगतो.
छत्तीसगड सरकारने मोहाच्या फुलासाठी किमान आधारभूत किंमत निश्चित केली आहे. १ किलोग्रॅमला ३० रुपये व एक क्विंटल वाळलेल्या फुलासाठी ३००० रुपये.
मध्य भारतातल्या छत्तीसगड व्यतिरिक्त मध्य प्रदेश, झारखंड, ओडिशा, महाराष्ट्र, तेलंगणा, आंध्र प्रदेश आणि अगदी म्यानमार, नेपाळ, श्रीलंका आणि बांग्लादेशातही मोहाची झाडं आहेत.