२०२१ चा जुलै महिना होता. सकाळ धुक्यात हरवली होती. भीमाशंकर अभयारण्याला लागून असलेल्या आपल्या वावरात शिवराम गवारींनी पाय ठेवला आणि पाहतात तर काय पाच गुंठ्यातली भाताची रोपं अर्धवट खाल्ल्यासारखी आणि बाकी जमीनदोस्त झाली होती.
“जनावरांमुळे पिकांचं इतकं नुकसान मी पहिल्यांदाच पाहिलं,” आजही तेव्हाचा धक्का त्यांच्या मनातून गेलेला नाही. जनावराच्या पावलाच्या ठशांचा माग काढत ते जंगलात गेले आणि अचानक गवाच त्यांच्या समोर आला. गुरांमधला हा सर्वात मोठा प्राणी. नर अगदी सहा फुटांहून उंच असतात आणि वजन ५ ते १० टन असतं.
अशा गबरू गव्यांचा कळप जेव्हा रानात येतो तेव्हा त्यांच्या चालण्याने शेतात चंद्रावरची विवरं वाटावीत असे खड्डे पडतात. मग त्यात कुठलीच रोपं, पिकं तगू शकत नाहीत. “गव्यांनी तीन वर्षं लगातार माझ पीक तुडवलंय. शेती टाकून देण्याशिवाय माझ्याकडे दुसरा पर्यायच नाहीये,” घरच्या अंगणात बसलेले शिवराम काका सांगतात. त्यांच्या डोण गावात २०२१ सालापासून गवे यायला लागले आहेत.














