जिल्हा उद्योग व उद्योजकता विकास केंद्राच्या (DIPEDC) अंदाजानुसार मेरठमध्ये क्रिकेटचे चेंडू तयार करणारे ३४७ कारखाने आहेत. यामध्ये औद्योगिक क्षेत्रात उभारण्यात आलेले मोठे कारखाने आहेत तसंच मेरठ जिल्ह्याच्या शहरी आणि ग्रामीण वस्त्यांमध्ये सुरू असणारी छोटी-मोठी युनिट देखील आहेत.
पण यामध्ये सुटं सुटं काम करणारी अनेक छोटी मोठी केंद्रं गणली जात नाहीत. घरगुती पातळीवर जिथे अख्खे चेंडू तयार होतायत किंवा अख्ख्या प्रक्रियेतलं एखादंच काम होतं अशा उत्पादन केंद्रांचा यात समावेश नाही. यामध्ये मेरठ जिल्ह्यातल्या जंगेठी, गागुल आणि भवानपूरसारख्या गावांमध्ये अशा पद्धतीचं उत्पादन होतं. “आज गावों के बिना बिलकुल पूर्ती नही होगी मेरठ में,” मदन म्हणतात.
“गावात काम करणारे किंवा शहरातल्या मोठ्या कारखान्यांमधले बहुतेक कारागीर जटाव आहेत. क्रिकेटचे चेंडू चामड्याचे असतात ना,” ते सांगतात. १९०४ च्या जिल्हा गॅझेटनुसार मेरठमध्ये चामड्याच्या वस्तू उद्योगामध्ये काम करणाऱ्या कारागिरांमध्ये सगळ्यात जास्त संख्या जटाव किंवा चमार (उत्तर प्रदेशात अनुसूचित जातीत समाविष्ट) जातीच्या लोकांची होती. “क्रिकेटचा चेंडू चामड्याचा चालतो, त्याचं कुणाला काही वाटत नाही. पण चामड्याचं काम म्हटल्यावर लोक नाक मुरडतात,” ते म्हणतात.
त्यांच्या कुटुंबाचा शोभापूरमध्ये स्वतःच्या मालकीचा कातडं कमावण्याचा कारखाना आहे. क्रिकेटचे चेंडू तयार करण्यासाठी तुरटीचा वापर करून कातडं कमावण्याचं काम फक्त इथेच होतं (Read: Meerut's leather workers: not out, still batting ). “तुरटी वापरून कमावलेल्या कातड्याची मागणी वाढतच जात होती. तेव्हा मी अंदाज बांधला की क्रिकेटच्या चेंडूंच्या मागणीत कधीच खंड पडणार नाही,” ते सांगतात. आणि त्याच जोरावर वीस वर्षांपूर्वी त्यांनी मे. बी. डी. अँड सन्स हा कारखाना सुरू केला. या भागात क्रिकेटचे चेंडू तयार करणाऱ्या दोन युनिटपैकी एक.
एक चेंडू तयार करण्यासाठी किती वेळ लागतो असं नक्की सांगणं मुश्किल असल्याचं मदन म्हणतात. कारण किती तरी प्रक्रिया एकत्रित केल्या जातात. कोणता ऋतू सुरू आहे, चामडं कसं आहे यावरही किती वेळ लागणार हे ठरतं. “दो हफ्ते लगते हैं एक गेंद को तय्यार होने में कम से कम,” ते म्हणतात.
मदन यांच्या कारखान्यात सगळ्यात आधी तुरटी वापरून कातडं कमावण्याचं काम केलं जातं. त्यानंतर त्याला लाल रंग दिला जातो. उन्हात सुकवल्यावर त्याला चरबीने मालिश केली जाते. लाकडी हातोडीचा वापर करून ते चांगलं मऊ केलं जातं. “पांढऱ्या चेंडूसाठी रंगकामाची गरज नसते. कारण तुरटीने कमावलेलं कातडं पांढरंच असतं. त्या चामड्याची मालिश गाईच्या दुधापासून तयार केलेल्या दह्याने केली जाते,” मदन सांगतात.