“ही मझार तात्पुरती बांधलीये. सावला पीरची मूळ मझार आहे ना ती भारत -पाकिस्तानाच्या समुद्री सीमेवर आहे,” फकिरानी जाट समुदायाचे जाणते गुरू ७० वर्षीय आगा खान सावलानी सांगतात. ते ज्या तात्पुरत्या जागेचा उल्लेख करतात तो म्हणते लखपत तालुक्यातल्या पिपर वस्तीजवळच्या मोकळ्या मैदानाच्या मधोमध उभा असलेला एकटा, साधासा दर्गा. छोटा, हलक्या हिरव्या रंगाचा. आता शांत दिसत असलेल्या या दर्ग्यात थोड्याच वेळात सावला पीर उरुस साजरा करण्यासाठी मोठी गर्दी उसळेल.
मूळ दर्गा एका छोट्याशा बेटावर आहे. २०१९ सालापासून सुरक्षेच्या कारणास्तव तिथे प्रवेश बंद केला आहे. सध्या तिथे सीमा सुरक्षा दलाचं ठाणं आहे. “स्वातंत्र्याआधी कोटेश्वरच्या पलिकडे कोरीच्या खाडीत एका बेटावर सावला पिराचं ठाणं होतं तिथे मोठा उरूस भरायचा. आताच्या पाकिस्तानातल्या सिंध प्रांतातले पशुपालक बोटीने तिथे यायचे आणि नमाज अदा करायचे” असा उल्लेख बायोकल्चरल कम्युनिटी प्रोटोकॉल या दस्तावेजात सापडतो.
या भागातले हिंदू आणि मुसलमान या जत्रेत येतात आणि आपली उपासना करतात. फकिरानी जाट समुदाय जर वर्षी ही जत्रा भरवतो. गुजराती पंचांगानुसार चैत्र महिन्याच्या तिसऱ्या आणि चौथ्या दिवशी. साधारण मार्च-एप्रिल महिन्यात.
“सावला पिराकडे कुणीही येऊन डोकं टेकवू शकतो. कसलीही आडकाठी नाही. कुणीही यावं, भलं कर म्हणावं. तुम्ही संध्याकाळपर्यंत थांबा आणि स्वतःच बघा,” चाळिशीचे सोनू जाट मला सांगतात. ते कच्छच्या पिपर वस्तीवर राहतात. इथे फकिरानी जाटांची सुमारे ऐंशी कुटुंबं राहतात.


















