फार फार वर्षांपूर्वीची गोष्ट. एका आटपाट नगरात देव-राजा भयेंद्र नामी दडपशाहीने राज्य करत होता. तो काही खात नसे, कोणाला खाऊ देत नसे. त्यामुळे सगळ्यांची (अ)क्षमता वाढली होती. एक अक्षर हरवलंय का? अरे, ते तर लिलावात त्या पश्चिमेच्या बुटकबैंगण राजाने, उत्तम गडामीने घेतलं!
एक दिवस राजाच्या दुष्ट पुजार्याला, Dत माहीला एक भीतीदायक स्वप्न पडलं, डोंगरचा कुणी एक नकुल राही राजाचं सिंहासन बळकावण्याच्या तयारीत आहे. खूपच भयंकर गोष्ट होती ही. हा नकुल राही अशा एका जमातीचा होता, जे लोकशाही आणि तिच्यासारख्या खूप भयानक प्रथा आणि परंपरा पाळत. ताबडतोब राज्यातल्या जादुगारांची सभा बोलावण्यात आली. आणि काय सांगता! त्यांनी या नकुल राहीच्या कर्तृकावर जादुई उपाय शोधला… धार्मिक सौहार्द आणि सामंजस्याचं प्रतीक असलेली, देवीइतकी पवित्र असलेल्या मोगातेच्या अत्यंत पवित्र अशा शेणापासून १०८ फूट लांबीची उदबत्ती तयार करायची!
मोगातेची आतडी स्वच्छ केली गेली. सर्व आवश्यक सामुग्री एकत्रित केली गेली आणि शेवटी अगरबत्ती लावली गेली. पण तिचा सुगंध! शेतकर्यांच्या तिरस्काराचा आणि जुमलाप्रेमाचा मधुर गंध होता तो! असं सांगितलं जातं की, त्यानंतर त्या उदबत्तीचा धूर भुकेने ढगाळलेल्या आकाशात पसरला आणि राजा भयेंद्र नामी, सहित माही आणि उत्तम गडामी यांच्यासह आनंदाने नाचला. यामुळे अपशकुन टळला… किंवा नसेलही टळला, काय सांगावं? आपल्या सर्वांनाच माहिती आहे, आटपाट नगर त्यानंतर सु(दुः)खाने राहू लागलं.


