“मला प्रत्येत मडकं साधारणपणे ३००० वेळा लाकडानं थापटावं लागतं,” असं सांगून मीनाक्षी ते काम पुढे सुरु ठेवतात . ‘हे कच्चं मडकं’ (भट्टीत न भाजलेलं ) स्वंयपाकाच्या इतर कुठल्याही भांड्यांसारखंच दिसतं . पण ह्या मडक्यापासून त्या एक वाद्य बनवणार आहेत. मातीपासून बनलेलं ताल वाद्य. त्या ते मडकं मांडीवर ठेवतात आणि एका थापटण्यानं त्याच्या बाहेरच्या बाजूवर हळूहळू थापटायला लागतात. हे काम पूर्ण झालं की या मडक्याचं ‘घटम’मधे रूपान्तर होईल. कर्नाटकी संगीताच्या मैफलीत नेहमी वाजवलं जाणारं एक अव्वल दर्जाचं संगीत वाद्य. मीनाक्षी केसवन घटम बनवणाऱ्या एक तज्ज्ञ कारागीर आहेत. ६३ वर्षांच्या मीनाक्षी आणि त्यांचं कुटुंब ‘मनमदुराई ‘ नावाचं खास घटम बनवणारं एकमेव कुटुंब असावं.
मनमदुराई हे मीनाक्षींचं गाव तमिळनाडूमध्ये मदुराईपासून गाडीने एक तासाच्या अंतरावर आहे. त्या सांगतात की पंधराव्या वर्षी त्यांचं लग्न झालं. त्यांच्या सासरचं कुटुंब गेल्या चार पिढ्या घटम बनवण्याचं काम करत होतं . हे कसब त्या आपला नवरा आणि सासरे यांच्याकडून शिकल्या. त्यांचा मुलगा रमेश सांगतो, “ या कामावर प्रभुत्व मिळवायला सहा वर्ष लागतात.” पण ते सुद्धा जलद शिकणाऱ्यासाठी . “ तुम्ही कुंभारकाम केलं नसेल तर तुम्हाला त्याहून जास्त काळ लागतो.”
“ घटममधून निघणारा नाद सुधारणं हे सर्वात कौशल्याचं काम आहे,” मीनाक्षी उजव्या हातानं घटमवर थापट्या मारत आम्हाला समजावून सांगतात. त्याच वेळी त्या डाव्या हातानं घटमच्या आतल्या बाजूला एक गोल दगड फिरवत असतात. “ (थापटताना ) घटमच्या भिंती कोसळू नयेत म्हणून हे करायला लागतं.” असं सांगत त्या क्षणभर विश्रांती घेतात. गेली चार दशकं चिखलाला आकार देऊन देऊन त्यांचे हात सारखे दुखत असतात. ही वेदना त्यांच्या थकलेल्या खांद्यांपासून बोटांपर्यंत कशी पोहोचते वर्णन करता करताच त्या परत लाकडाचा घोटा उचलतात. आपल्या मांडीवर घटम नीट ठेवतात आणि घटम थापटण्याचा आवाज सुरु होतो.







