२७ मार्चला मध्यरात्री एकच्या सुमारास हिरा मुकणे त्यांच्या ठाणे जिल्ह्यातील शहापूर तालुक्यातील दळखण गावाबाहेरील घरी पोहचल्या होत्या. त्यांचा मुलगा मनोज आणि सून शालू यांनी १०४ किलोमीटरचा प्रवास पायी केला होता, मध्ये कुठेही न थांबता. पालघर जिल्ह्यातील डहाणू तालुक्यातल्या गंजड गावाजवळच्या एका वीटभट्टीवर ते कामासाठी गेले होते.
“गाडी-घोडं काही नव्हतं. मग सगळा दिवस चालत आलो. तसं गंजड गावापासून एसटी जाते, शहापूरकडे”, ४५ वर्षीय हिरा सांगतात. मार्चच्या २६ तारखेला पहाटे ४ वाजता, हिरा आणि शालूनी कपड्यांचं गाठोडं आणि भांड्यांची गोणी डोक्यावर लादली आणि घरची वाट धरली. मनोजनेही १२ किलोच्या तांदळाची गोणी डोक्यावर आणि ८ किलो नाचणीच्या पीठाची गोणी हातात सावरत २१ तासांचा प्रवास केला होता. “पायाच्या दुखन्याचं काय नाय, तसं पन लय चालतोच आमी, एसटी तर काय टायमात येत नाय. पन कमाई नसली तर दुखतं,” त्या म्हणते.
वीटभट्टीवर काम करण्यासाठी २ मार्चला हिरांनी घर सोडलं, सोबत २७ वर्षांचा मनोज आणि २५ वर्षांची शालूदेखील होती, ते मे महिन्यातच घरी परतणार होते. पण २४ मार्चच्या देशव्यापी टाळेबंदीमुळे त्यांचा वेळेचा हिशोबच चुकला. “मार्च पासनं मे पर्यंत ५०, ००० तरी कमावायचं व्हतं,” हिरांनी मला फोनवर सांगितलं. “पन मालकानं कामच बंद केलं, आनी गावाकडे जायला सांगितलं. तीन आठोड्याचं दिलं ८, ०००.”
ते तिघं जण जेव्हा अगदी अचानकच मार्च अखेर घरी पोहचले, तेव्हा हिराचा नवरा विठ्ठल, ५२ आणि त्यांची १५ वर्षांची मुलगी संगिता चकितच झाले– हिराला त्यांना कळवताच आलं नव्हतं की ते लवकर घरी परत येत आहेत म्हणून. विठ्ठल यांना सिकल सेलचा त्रास आहे, ज्यामुळे त्यांना अवजड काम करता येत नाही, म्हणून सगळे गंजडला गेले असताना, ते संगीतासोबत घरीच थांबले होते.
माझी हिरांबरोब जुलै, २०१८ मध्ये भेट झाली होती, कुणा एका शेतकऱ्याच्या शेतात त्या रात्रीच्या घरी जेवणासाठी न्यायला म्हणून भाजी खुडत होत्या. त्या कातकरी आहेत – महाराष्ट्रात या समाजाची विशेषत: बिकट स्थितीतील आदिवासी समूह (Particularly Vulnerable Tribal Group) म्हणून नोंद आहे.






