थेट पोलिस स्टेशनच्या बाहेरच आपल्या बायकोवर हात टाकायला त्याला काहीच वाटत नव्हतं. हौसाबाई पाटलांच्या दारुड्या नवऱ्याने तिला निर्दयपणे मारायला सुरुवात केली. “तसला मार खाऊन माझी पाठ दुखायला लागली,” त्या सांगतात. “हे घडलं [सांगलीतल्या] भवानी नगरच्या लहानशा पोलिस चौकीच्या बाहेर.” चौकीतल्या चारपैकी दोनच पोलिस जागेवर होते. “दोघं जेवायला गेले होते.” मग त्यांच्या झिंगलेल्या नवऱ्याने “एक मोठा दगड उचलला. ‘आता हितंच या दगडानं तुझा जीव घेतो बघ,’ तो गुरकावला.”
त्याचा हा आरडाओरडा ऐकून चौकीतले दोघं पोलिस बाहेर आले. “त्यांनी आमचं भांडण सोडवायचा प्रयत्न केला.” तेव्हाच हौसाबाई तिथेच असलेल्या त्यांच्या भावाला विनवून सांगू पाहत होत्या की त्यांना असल्या मारकुट्या नवऱ्याकडे नांदाया जायचं नाही म्हणून. “मी म्हटलं की मी जाणार न्हाई. न्हाईच. मी हितं राहीन, तुझ्या घराशेजारीच मला छोटी जागा घेऊन दे. नवऱ्याबरोबर जाऊन मरण्यापेक्षा, मी हितंच राहीन, काहीबाही करून, जे मिळेल त्यावर गुजराण करीन... पण आता याफुडं मला त्याचा मार खायाचा न्हाई.” पण त्यांच्या भावानं काही त्यांचं ऐकलं नाही.
पोलिसांनी किती तरी वेळ त्या दोघांना समजावयचा प्रयत्न केला. अखेर पोलिसांनी समझौता घडवून आणला आणि या जोडप्याला त्यांच्या गावी जाणाऱ्या गाडीत बसवून दिलं. “आमची तिकिटंदेखील त्यांनीच काढली अन् माझ्या हातात दिली. ते माझ्या नवऱ्याला म्हटलं – आता तुला तुझी बायको पाहिजे न्हवं का, सांभाळ तिला. आन् भांडू नगा.”
हे सगळं घडत असताना तिकडे हौसाबाईंच्या साथीदारांनी पोलिस चौकी लुटली होती, तिथे असलेल्या चारही रायफली पळवल्या होत्या. आणि ते सगळं करता यावं म्हणूनच हौसाबाई, आणि त्यांच्या तोतया ‘पतीने’ आणि ‘भावाने’ हा सगळं खरंच वेदनादायी नाटक वठवलं होतं, जेणेकरून पोलिसांचं लक्ष विचलित होईल. साल होतं १९४३, हौसाबाईंचं वय होतं १७, लग्नाला तीन वर्षं झाली होती. इंग्रज राजवटीच्या विरोधात कारवायांसाठी बाहेर पडताना त्या त्यांच्या तान्ह्या मुलाला, सुभाषला आत्यापाशी ठेऊन बाहेर पडत असत. आज, ७४ वर्षांनंतरही त्या तोतया नवऱ्यावरची त्यांची नाराजी मात्र कायम आहे, त्यांचं भांडण खरं वाटावं म्हणून त्याने किती जोरात मारलं होतं त्यांना. आज ९१ व्या वर्षी सांगली जिल्ह्याच्या विट्यात त्या आम्हाला ही सगळी कहाणी सांगतायत. “आज काल डोळ्याला, कानाला जरा त्रास व्हायलाय, पर मीच सगळं सांगते तुमाला.”







