कोविड-१९ चा संसर्ग झाल्यानंतर आठच दिवसांत रामलिंग सानप उपचार सुरू असलेल्या हॉस्पिटलमध्ये मरण पावले. पण त्यांचा मृत्यू संसर्गामुळे मात्र झाला नाही.
त्यांच्या मृत्यूच्या काही तास आधीच ४० वर्षीय रामलिंग यांनी आपल्या पत्नीला, राजूबाईला हॉस्पिटलमधून फोन केला होता. “त्यांच्या उपचारावर किती खर्च यायलाय ते त्यांना समजलं होतं आणि ते रडत होते,” त्यांचा २३ वर्षांचा भाचा रवी मोराळे सांगतो. “हॉस्पिटलचं बिल भरायला त्यांना आपली दोन एकर जमीन विकायला लागेल असाच विचार त्यांच्या मनात आला होता.”
महाराष्ट्राच्या बीड शहरातल्या दीप हॉस्पिटलमध्ये १३ मे रोजी रामलिंग सानप यांना दाखल करण्यात आलं होतं. त्यांच्या उपचारासाठी १ लाख ६० हजार रुपयांचं बिल केलं होतं, राजूबाईंचे भाऊ प्रमोद मोराळे सांगतात. “आम्ही कसं तरी करून दोन हप्त्यात ते फेडलं. पण हॉस्पिटलने आणखी दोन लाखांची मागणी केली,” ते सांगतात. “त्यांनी घरच्यांना न सांगता पेशंटला सांगितलं. त्यांना कशासाठी त्रास दिला?”
बिलाचा आकडा कुटुंबाच्या वार्षिक उत्पन्नाच्या दुप्पट होता. आणि तेच रामलिंग यांना सहन झालं नाही. २१ मे रोजी पहाटे ते कोविड वॉर्डातून बाहेर आले आणि हॉस्पिटलच्या व्हरांड्यात त्यांनी गळफास घेतला.
२० मे रोजी रात्री त्यांचा फोन आला तेव्हा राजूबाईंनी त्यांची समजूत घालण्याचा खूप प्रयत्न केला होता. आपली मोटरसायकल विकू किंवा पश्चिम महाराष्ट्रातल्या ज्या साखर कारखान्यात ते दोघं कामाला जायचे तिथनं उचल घेऊ असं सगळं त्यांनी सांगून पाहिलं. 'तुमची तब्येत सुधारायला पाहिजे, बाकी काही नको', त्या सांगत होत्या. रामलिंग यांना मात्र इतका सगळा पैसा कसा उभा करायचा याचा घोर लागला असावा.
दर वर्षी रामलिंग आणि राजूबाई बीड जिल्ह्यातल्या केज तालुक्यातल्या आपल्या वाडीवरून पश्चिम महाराष्ट्रात ऊसतोडीसाठी जायचे. नोव्हेंबर ते एप्रिल असे सहा महिने अंग पिळवटून टाकणारी मेहनत केल्यानंतर त्यांच्या हातात दोघांचे मिळून ६०,००० रुपये यायचे. तोडीवर जाताना त्यांची ८ ते १६ वर्षं वयाची तिघं मुलं रामलिंग यांच्या वडलांपाशी सोडून जात. रामलिंग यांची आई या जगात नाही.











