एका नजरेत त्यांना खऱ्या सोन्याची पारख करता येते. “एखादा दागिना निस्ता माझ्या हातात ठेवा, तो किती कॅरटचा आहे मी सांगतो ना तुम्हाला,” रफिक पापाभाई शेख सांगतात. “मी एक ‘जोहरी’ आहे” (जवाहिऱ्या, दागिने घडवणारा कारागीर). शिरूर-सातारा महामार्गावर पडवी गावामध्ये आमच्या या गप्पा चालू होत्या, आणि इथेही कदाचित त्यांच्या हाती सोनंच लागलंय. या वेळी एका सुरू होऊ घातलेल्या एका हॉटेलच्या रुपात.
पुणे जिल्ह्याच्या सीमेवर असणाऱ्या दौंड तालुक्यातून आम्ही प्रवास करत होतो जेव्हा आम्ही हे हॉटेल पार केलं. एकदम भडक रंगानी रंगलवलेलं एखाद्या टपरीसारखं – ‘हॉटेल सेल्फी’. हॉटेलचं नाव दारावरती गडद हिरव्या आणि लाल रंगात लिहिलं होतं. ते पाहताच आम्ही तिथेच मागे वळलो. हे हॉटेल न पाहून कसं चालेल?
“मी खरं तर हे हॉटेल माझ्या लेकासाठी टाकलंय,” रफिक सांगतात. “मी तर जवाहिऱ्याचंच काम करतोय. पण मग मी विचार केला, लेकासाठी, या लाइनमध्ये येऊन पहायला काय हरकत आहे? हायवेला या भागात गर्दी असते आणि लोक चहा-नाश्त्यासाठी थांबतात.” बाकीच्या काही हॉटेल्सप्रमाणे त्यांनी हायवेला लागून हॉटेल बांधलं नव्हतं, समोर प्रशस्त जागा ठेवली होती. लोकांना गाडी लावता यावी म्हणून – आम्हीही तेच केलं होतं.



