रूपेश्वर बोडो आम्हाला उत्साहाने हूलॉक गिबनच्या हावभावांची नक्कल करून त्यांचे किस्से सांगत आहेत. ते या प्रायमेटचा आवाज काढण्याचा प्रयत्न करतात आणि ते एका झाडावरून दुसऱ्या झाडावर कशा उड्या मारतात, हे हातवारे करून दाखवतात.
आम्ही बोडोंना लोहारघाट क्षेत्राधिकार कार्यालयात भेटलो; ते वन विभागात ड्रायव्हरचं काम करतात. मात्र, त्यांनी कधीच गिबन पाहिला नसल्याची ते कबुली देतात. "माझ्या घरातून बरेचदा माकडांची हुपहुप कानावर यायची. पण ते आमच्या गावाजवळ कधीच फिरकले नाहीत. आम्हाला दूरवरच्या डोंगरांतूनच त्यांचा आवाज ऐकू येतो," ते सांगतात. आसाममधील कामरूप जिल्ह्यातील त्यांचं गाव मुडुकी हे राणी वन क्षेत्राहून साधारण ३५ किमी दूर आहे.
मात्र, मागील वर्षी ८ डिसेंबर रोजी राणी वनक्षेत्राच्या नजीक असलेल्या बारदुआर राखीव जंगलात सफर करायला निघालेल्या गोआलपाडा फोटोग्राफिक सोसायटीच्या सदस्यांना वेस्टर्न हूलॉक गिबनची (हूलॉक हूलॉक) जोडी दिसून आली होती. स्थानिक बोलीत बोन मनुह अर्थात 'वन्यमानव' म्हणून ओळखलं जाणारी ही लांब हाताची वानरं आसाम-मेघालय सीमाक्षेत्रात क्वचितच पाहायला मिळतात.
ही गिबनची प्रजाती ईशान्य भारतातील राज्यं तसंच पूर्व बांगलादेश आणि वायव्य म्यानमारमधील जंगली भागांमध्ये वास्तव्याला असून आंतरराष्ट्रीय निसर्ग संवर्धन संघाच्या (आययूसीएन) संकटग्रस्त प्रजातींच्या लाल सूचीत समाविष्ट आहेत. ईस्टर्न हूलॉक गिबन (हूलॉक ल्यूकोनेडिस) ही प्रजात अरुणाचल प्रदेश आणि आसामच्या पट्ट्यांमध्ये, आणि दक्षिण चीन आणि ईशान्य म्यानमारमध्ये वास्तव्याला असून आययूसीएनच्या सूचीत 'असुरक्षित' म्हणून नोंदवण्यात आली आहे.
"लांब व सडपातळ हात असलेली हूलॉक वानरं चपळ असून ती जमिनीवर क्वचितच पाय ठेवतात," असं वर्ल्ड वाईड फंड फॉर नेचर-इंडियाने नमूद केलंय. "ते एका झाडावरून दुसऱ्या झाडावर एक प्रकारची हालचाल करतात जिला बाहुगमन म्हणतात आणि ताशी ५५ किमी इतक्या वेगाने बाहुगमन करत ती सहा मीटरपर्यंतचं अंतर एकाच उडीत मागे टाकतात!"







