गेल्या दहा वर्षांत आपण किती दवाखाने पालथे घातले त्याची मोजदाद सुपारी पुतेल यांनी ठेवलेली नाही.
किती तरी वर्षं त्या आपल्या १७ वर्षांच्या मुलाच्या उपचारासाठी ओडिशा आणि छत्तीसगढमधील रुग्णालयांमध्ये जात होत्या. आणि नंतर काही काळ त्यांचे पती सुरेश्वर यांना घेऊन मुंबईत.
दोघंही २०१९ मध्ये चार महिन्यांच्या कालावधीत मरण पावले, आणि सुपारींच्या दुःखाला पारावार उरला नाही.
त्यांचे पती सुरेश्वर केवळ ४४ वर्षांचे होते. सप्टेंबर २०१९ मध्ये ते आणि सुपारी ओडिशाच्या बालांगीर जिल्ह्यातील त्यांच्या घराहून साधारण १४०० किमी दूर मुंबईला निघून आले होते. एका स्थानिक दलालाने त्यांना एका बांधकामावर कामाला ठेवलं होतं. "आम्ही आमचं कर्ज फेडायला अन् घर [इमारतीचं बांधकाम] पूर्ण करायला गेलो होतो," सुपारी म्हणाल्या. दोघांची एकत्रित रोजंदारी रू. ६०० होती.
"एक दिवस सायंकाळी मुंबईच्या साईटवर काम करताना माझ्या नवऱ्याला अचानक खूप ताप आला," ४३ वर्षीय सुपारी सांगतात. त्या तुरेकेला तालुक्यातल्या ९३३ वस्ती असलेल्या हियाल गावातल्या आपल्या मातीच्या घराच्या अंगणात बसल्या आहेत. त्या व त्यांचं कुटुंब माळी या इतर मागासवर्गीय प्रवर्गातील आहेत.
सुपारी आणि बांधकामाच्या ठिकाणी असलेल्या मुकादमाने मिळून सुरेश्वर यांना रिक्षा आणि अँब्युलन्स करून तीन रुग्णालयांमध्ये हलवलं, अखेर ते उत्तर-मध्य मुंबईतील सायनमधील लोकमान्य टिळक महानगरपालिका सर्वसाधारण रुग्णालयात येऊन पोहोचले.
"[त्यावेळी] आमच्याकडे आधार कार्ड अन् बाकीचे कागद नसल्यामुळे प्रत्येक दवाखाना आम्हाला दुसरीकडे पाठवत होता," सुपारी म्हणतात. "त्याला कावीळ झाला होता [लक्षणे होती]. कमरेखालचं शरीर पांगळं झालं होतं, म्हणून मी सारखे त्याच्या पायाचे तळवे घासत होते," त्या म्हणतात. नेमक्या आजाराची त्यांना कल्पना नाही. पुढल्याच दिवशी, ६ नोव्हेंबर, २०१९ रोजी सुरेश्वर रुग्णालयात मरण पावले.








