“माझा जन्म झाला ना, तेव्हापासनं हे असंच आहे, मजुरीच सुरू आहे,” रत्नव्वा एस. हरिजन सांगतात. ऑगस्ट महिन्यातल्या एका सकाळी आम्ही त्यांच्या घरून ज्या शेतात त्या मजुरीला जातात तिथे निघालो होतो. आजूबाजूला धुकं पसरलेलं होतं. सडपातळ बांध्याच्या, पाठीला थोडा बाक आलेल्या रत्नव्वा इतक्या झपाझप चालतात त्यांना थोडंसं लंगडत चालावं लागतं हे लक्षात सुद्धा येत नाही.
शेतात पोचल्यावर कामावर घालायचे कपडे त्या पिशवीतून काढतात. सर्वात आधी त्या साडीवरूनच एक चुरगळलेला निळा शर्ट घालतात. त्यानंतर एक लांबसर पिवळा गाऊन कंबरेला बांधतात, जेणेकरून परागकणांचा स्पर्श होणार नाही. मग एका झिरझिरीत हिरव्या कापडाचा ओचा त्या कंबरेला बांधतात ज्यात भेंडीची 'गांडु हावु' (नर फुलं) ठेवता येतात. डोक्याला विटलेला पांढरा पंचा बांधतात आणि ४५ वर्षीय रत्नव्वा डाव्या हाताच्या करंगळीला धागे बांधून कामाला सज्ज होतात.
एकेक फुलाच्या पाकळ्या वाकवून नर फुलाच्या पुंकेसरावरचे परागकण स्त्री केसरावर चोळतात. परागीकरण झालेल्या मादी फुलाला खूण म्हणून धागा बांधून ठेवतात. ओणवं उभं राहून भेंडीच्या सरीतल्या प्रत्येक रोपावरच्या प्रत्येक फुलाचं असं परागीकरण त्या करतात. या कामात त्या एकदम पटाईत आहेत. लहान असल्यापासून त्या हे काम करतायत.
रत्नव्वा माडिगा समाजाच्या आहेत. हा कर्नाटकातला दलित समाज आहे. त्या कर्नाटकाच्या हावेरी जिल्ह्यातल्या राणीबेन्नूर तालुक्यात कोननताळी गावाच्या मडिगारा केरी (मडिगा वस्ती) मध्ये राहतात.












